Skip to main content
x

चौगुले, भाऊसाहेब आप्पासाहेब

          भाऊसाहेब आप्पासाहेब चौगुले यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदगाव या खेडेगावी एका शेतकरी कुटुंबात झाला. जात्याच हुशार असल्याने आणि शिक्षणाची गोडी असल्याने त्या काळी रोज ८ ते १० मैल प्रवास करून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी १९४४मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी संपादन केली. या पदवी परीक्षेत ते प्रथम वर्गात, विशेष सन्मानासह प्रथम आले. त्या वेळपर्यंतच्या पदवी परीक्षेतील हा एक उच्चांक होता. पुढील शिक्षणासाठी त्यांना कृषी विभागामार्फत कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे पाठवण्यात आले. त्या विद्यापीठातून ते एम.एस. व पीएच.डी. या पदव्या उत्तम रीतीने उत्तीर्ण होऊन भारतात परत आले. त्यांची शैक्षणिक कारकिर्दीतील प्रगती पाहून त्यांची नेमणूक कृषिविद्या विषयाचे प्राध्यापक म्हणून कृषी महाविद्यालय, धारवाड (कर्नाटक) येथे झाली. पुढे राज्य पुनर्रचनेनंतर १९५५मध्ये डॉ. चौगुले पुणे येथील कृषी महाविद्यालयात कृषिविद्या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. या ठिकाणी त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. कृषिविद्या विषयात त्यांनी नवीन विचार आणला.

          तंबाखू पिकाची अनावश्यक कायिक वाढ रोखण्यासाठी स्वयंप्रेरकांचा वापर हरळीसारख्या तणांच्या बंदोबस्तासाठी योग्य उपाय व पिकांची फेरपालट सुचविली. वांगी पिकाची रोपे तयार करताना जर पाण्याचा ताण (म्हणजे नेहमीप्रमाणे पाणी न देता मुद्दामहून उशिरा पाणी देणे) दिला, तर त्यांची कायिक वाढ जरी कमी झाली; तरी मुळांची विपुल वाढ होऊन त्यांचे स्थलांतर केले, तर हीच रोपे अधिक उत्पादन देतात. त्या काळी उपलब्ध पिकांच्या जातींपैकी खरीप ज्वारीची काळबोंडी जात टोकन पद्धतीने केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते, हे त्यांनी संशोधनाद्वारे दाखवून दिले. या त्यांच्या संशोधनावर आधारित ‘पुणेरी पद्धतीने खरीप ज्वारीची लागवड’ या तंत्राची कृषी विभागाने सर्व खरीप ज्वारीसाठी शिफारस केली. हळद पिकाची लागवड सरी वरंबे पद्धतीने न करता गादी वाफ्यावर केली, तर उत्पादन वाढ होते, हे त्यांनी दाखवून दिले.

डॉ. चौगुले यांनी कृषी विभागात विविध पदांवर कार्य केले. डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला येथे त्यांनी कुलगुरू पदावर कार्य करून काही सुधारणांचा पाया घातला. निवृत्त झाल्यावर त्यांनी भा.कृ.अ.प.(नवी दिल्ली) यांच्यामार्फत चारा प्रकल्प व कोरडवाहू शेती प्रकल्पांच्या मूल्यमापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले.

- डॉ. नारायण कृष्णाजी उमराणी

चौगुले, भाऊसाहेब आप्पासाहेब