Skip to main content
x

चिन्मुळगुंद, पांडुरंग जयराव

       पांडुरंग जयराव चिन्मुळगुंद यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील चिन्मुळगुंद हे त्यांचे मूळ गाव होते. त्यांचे वडील मुंबई प्रांतामध्ये न्यायाधीश होते. त्यांच्या आईचे नाव सीताबाई होते. पांडुरंग चिन्मुळगुंद यांचे शिक्षण पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. फर्ग्युसन महाविद्यालयामधून त्यांनी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विषयांत बी.ए. पूर्ण केले. ते संस्कृत या विषयाचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा ज्ञानेश्वरीचा विशेष अभ्यास होता.

      १९३८ मध्ये चिन्मुळगुंद आय.सी.एस.ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि प्रशासकीय सेवेमध्ये मुंबई प्रांतात त्यांची नियुक्ती करण्यात आली.

       स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील इतर संस्थानांप्रमाणेच सांगलीच्या पटवर्धनांच्या संस्थानाचेही स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्यात आले. सांगली संस्थानामधून दक्षिण सातारा जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. (सध्याच्या सांगली जिल्ह्यास पूर्वी दक्षिण सातारा असे म्हणत असत.) १९४८ ते १९५० या कालावधीत या जिल्ह्याचे ते पहिले जिल्हाधिकारी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा हा काळ संक्रमणाचा होता. विशेषत: संस्थानातील प्रजेला प्रशासकीय प्रक्रियेची माहिती करून देणे याची जबाबदारी चिन्मुळगुंद यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. १९५० ते १९५४ या चार वर्षांच्या कालावधीत चिन्मुळगुंद सहकार निबंधक या पदावर कार्यरत होते. महाराष्ट्रात सहकार खात्याची नुकतीच सुरुवात करण्यात आली होती. धनंजयराव गाडगीळ, विठ्ठलराव विखे-पाटील यांच्यासह चिन्मुळगुंद यांनी सहकार विभागाची रचना, कायदे, नियम तरतुदी यांच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले. आज महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सहकार क्षेत्र आघाडीवर आहे. हे चिन्मुळगुंद यांनी केलेल्या सहकारविषयक मूलभूत कामाचे फलित आहे.

       १९५४ नंतर ते शिक्षण खात्याचे सचिव होते. त्या वेळी सांस्कृतिक खातेदेखील शिक्षण खात्यामध्येच समाविष्ट होते. चिन्मुळगुंद शिक्षण सचिव म्हणून काम करत असताना शासनाने पुणे येथील राजा दिनकर केळकर संग्रहालय चालवण्यास घेतले. या कामाचा संपूर्ण आराखडा आणि नियोजन चिन्मुळगुंद यांनी केले होते. विद्वान वैदिक घनपाठी ब्राह्मणांना शासनाकडून पुरस्कार आणि मानपत्र देण्याची योजना त्यांनी सुरू केली.

        त्यांनी मोठ्या कलावंतांना वृद्धापकाळामध्ये निवृत्तिवेतन देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्या वेळी बालगंधर्व यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला. चिन्मुळगुंद नगरविकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव होते.

       १९६८ मध्ये गृहसचिव या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. संस्कृत भाषेचा व्यासंग असल्यामुळे अनेक विद्वान व्यक्तींशी त्यांचा स्नेह होता.

        निवृत्तीनंतर चिन्मुळगुंद यांनी वैदिक अध्ययन आणि सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांच्या भारतीय चरित्रकोश मंडळाच्या कामाला वाहून घेतले. भारतीय चरित्रकोश मंडळाचे ते अध्यक्ष होते. समाजातील उत्तम गुणांची पारख करणे आणि स्वत:चे मोठेपण विसरून समाजातील विद्वज्जनांचा आदर करणे ही त्यांच्या व्यक्तित्वाची वैशिष्ट्ये होती. फलटण येथील सत्पुरुष गोविंद महाराज उपळेकर यांना ते गुरुस्थानी मानत.

        भारतीय नाणकशास्त्र विभागाचे ते अध्यक्ष होते. चिन्मुळगुंद यांचा स्वत:चादेखील प्राचीन नाण्यांचा मोठा संग्रह होता. अवकाश निरीक्षण हादेखील त्यांचा छंद होता. त्यांनी स्वत: महाविद्यालयात शिकत असताना आकाशनिरीक्षणासाठीची दुर्बीण तयार केली होती.

       प्रशासकीय सेवेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण कामामुळे भारतीय चरित्रकोश मंडळाच्या ट्रस्टकडून चिन्मुळगुंद यांच्या नावाने प्रशासनात शाश्वत, नावीन्यपूर्ण आणि झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी १९८६ पासून पुरस्कार देण्यास सुरुवात केली गेली. सरकारकडून या पुरस्काराला मान्यता देण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव या पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष असत.

        प्राचीन भारतीय प्रशासक चाणक्य यांची मूर्ती आणि “न्याययुक्तं प्रशासकम् मातरं मन्यंते प्रज:” हे चाणक्यनीतीतील सुभाषित कोरलेले सोन्याचे नाणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

      वैदिक संस्कृती आणि संस्कृत या विषयावरच्या काही अभ्यासपूर्ण पुस्तकांचे लेखन चिन्मुळगुंद यांनी केले आहे. या पुस्तकांचे प्रकाशन भारतीय चरित्रकोश मंडळाकडून करण्यात आले.

       अशा या विद्वान आणि कार्यकुशल प्रशासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू लंडन येथे झाला.   

- संध्या लिमये

चिन्मुळगुंद, पांडुरंग जयराव