Skip to main content
x

चित्रे, कृष्णराव महादेव

       ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात हयातभर काम केलेले कृष्णराव महादेव चित्रे गुरुजी ठाणे जिल्ह्यात व आसपासच्या परिसरात सुपरिचित आहेत. १९४१ मध्ये त्यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘आदिवासी सेवा मंडळ’ या संस्थेचे एक छात्रालय आदिवासी मुलांसाठी सुरू केले. हा त्यांच्या सामाजिक सेवेचा श्रीगणेशा ठरला. आचार्य भिसे, बाळासाहेब खेर व द. न. वांद्रेकर हे त्यांचे मार्गदर्शक होते. आरंभी त्यांनी वाडा येथे मुलामुलींचे छात्रालय, मोखाडा येथे कन्या छात्रालय व तलासरी येथे वनवासी तक्रार निवारण केंद्र सुरू केले. मुंबई प्रांतातली पहिली आश्रमशाळा जव्हार तालुक्यात तलवाडा येथे सुरू करण्यात चित्रे गुरुजींचा मोठा वाटा होता. बावेरा येथे ‘बांधिल गड्यां’ची बाँडेड लेबर परिषद भरवली. त्यांच्या प्रचारासाठी गुरुजी आचार्य भिसे यांचे समवेत १५ दिवस गावोगावी खूप फिरले.

     आदिवासी सेवा मंडळाचे पूर्णवेळ काम चार दशकांहून अधिक काळ करीत असतानाच चित्रे गुरुजींनी ठाणे जिल्हा सहकारी बँकेत संचालक या नात्याने चार वर्षे काम केले. ठाणे जिल्हा औद्योगिक सहकारी संघाचे उपाध्यक्ष म्हणून दहा वर्षे काम केले. ठाणे जिल्हा सहकारी बोर्डामध्ये संचालक पदी २५ वर्षे काम केले. सहकार हे आवडते क्षेत्र असल्याने वनवासींमध्ये सहकाराची भावना वाढावी म्हणून अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. संयमशील व शांत वृत्तीच्या गुरुजींना केवळ निःस्वार्थ सेवा प्रिय आहे. ठाणे जिल्हा जंगल कामगार संघ, डहाणू तालुका खरेदी विक्री संघ - संस्थांमध्ये त्यांनी २५ वर्षे सभापती म्हणून काम केले.

- वि. ग. जोशी

चित्रे, कृष्णराव महादेव