Skip to main content
x

दांडेकर, शंकर वामन

दांडेकर मामासाहेब, दांडेकर सोनोपंत

    शंकर वामन दांडेकर यांना सर्व जण ‘सोनूमामा’ म्हणून ओळखत. गुरुवर्य जोग महाराजांचे लाडके शिष्य अशीही त्यांची ओळख होती. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सोनोपंतांना चार मोठ्या बहिणी व एक मोठा भाऊ होता. सोनोपंत अवघे दीड वर्षाचे असतानाच त्यांना मातृवियोग झाला. त्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या मोठ्या भगिनी काशीबाई कर्वे यांनी केला. काशीबाई या विधवा होत्या. त्यांनी सोनोपंतांचा आईसारखा सांभाळ केला व त्यांच्या शिक्षणासाठी त्या पुण्यात येऊन बिऱ्हाड  करून राहिल्या. या बहिणीची मुले सोनोपंतांना ‘सोनूमामा’ म्हणत होती. पुढे तेच नाव सर्वत्र रूढ झाले. सोनूमामांचे मूळ घराणे कोकणातील वायंगणीचे. पुढे ते केळवे-माहीमला स्थलांतरित झाले आणि नंतर ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे दांडेकर परिवार कायमचा स्थायिक झाला. सोनूमामाची बहीण काशीबाई ऊर्फ जिजी या स्वत: अत्यंत धार्मिक होत्या. त्या निष्ठावंत वारकरी होत्या. वारकरी संप्रदायातील थोर निरूपणकार विष्णुपंत जोग महाराज यांच्या प्रवचन-कीर्तनास त्या नित्यनेमाने जात होत्या. त्यांनी सोनूमामांना प्रथम जोग महाराजांकडे नेले व त्यांचा परिचय करून दिला. विष्णुपंत जोग हे पुण्यातील नामवंत पैलवान होते. ते एका तालमीचे उस्ताद होते. तद्वतच त्यांचा ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा हा जीवन-निष्ठेचा विषय होता. हळूहळू सोनूमामांचा विष्णुपंतांकडे ओढा वाढत गेला. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी, १९०८ साली सोनूमामांना गुरुवर्य विष्णुपंतांचा अनुग्रह लाभला व सोनूमामा तुळशीची माळ धारण करून वारकरी झाले.

मामा सोळा वर्षांचे असताना त्यांचे वडील निधन पावले. ते १९१७ साली पदवीधर झाले. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांना थोर चिंतक, तत्त्वज्ञ गुरुदेव रानडे यांचा अध्यापक म्हणून सहवास लाभला.

गुरुदेवांच्या देशी व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास व व्यासंग होता. त्यामुळे सोनूमामांना तत्त्वज्ञानाची आवड निर्माण झाली. गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली मामांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानांचा अभ्यास केला आणि एम.ए.ची पदवी प्राप्त केली.

शिक्षण पूर्ण होताच शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेत ते प्राध्यापक म्हणून नोकरीस लागले. नोकरीच्या अध्यापनाचा वेळ सोडून राहिलेला सर्व वेळ त्यांनी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अशा संत वाङ्मयाच्या प्रचारार्थ वेचला. वारकरी संप्रदायाच्या कार्यासाठी समर्पित भावाने खर्च केले. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी ते खेडोपाडी कीर्तन-प्रवचनासाठी जात. त्यांचे विचार, त्यांचा आचार, त्यांचे दर्शन पाहणाऱ्या-ऐकणाऱ्यास प्रसन्न करणारे होते. नि:स्पृहता, सेवाभाव, निष्ठा यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता.

अत्यंत साधे, स्वच्छ, टापटीप राहणे हीच त्यांची खरी ओळख होती. प्राचार्य म्हणून कार्यरत असतानाही त्यांची साधुवृत्ती सदैव जागृत होती. अनेक गरीब विद्यार्थ्यांची फी आपल्या पगारातून भरणारे ते एक साधुतुल्य प्राचार्य होते. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचा मामांनी ओवीश: सुलभ गद्य भावानुवाद केला व ज्ञानेश्वरी खेडोपाडी, घराघरांत नेली. ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ हे मामांचे वारकरी समाजावर फार मोठे अक्षय ऋण आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असली तरी, ‘मामा दांडेकरांची ज्ञानेश्वरी’ म्हणून ‘सार्थ ज्ञानेश्वरी’ प्रत समस्त वारकरी संप्रदायात व अभ्यासकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. त्याशिवाय ‘ईश्वरवाद’, ‘प्लेटो आणि ज्ञानेश्वरी’, ‘वारकरी संप्रदायाचा इतिहास’ असे मोजकेच पुस्तक लेखन त्यांच्या हातून घडलेले आहे. ‘प्रसाद’ या मासिकात त्यांनी खूप लेखन केले. गुरुवर्य जोग महाराज यांच्यावर मामांची अढळ निष्ठा होती. जोग महाराजांनी आळंदी येथे सुरू केलेली ‘वारकरी शिक्षण संस्था’ पुढे अनेक वर्षे सोनूमामांनी सेवाभावाने चालविली. तेथे ते वारकरी विद्यार्थ्यांना शिकवत असत.

मामासाहेब दांडेकर व धुंडामहाराज देगलूरकर यांना वारकरी संप्रदायातील राम-लक्ष्मणाची जोडी म्हटले जात. त्या दोघांनी बैलगाडीतून हजारो गावांचे दौरे केले. कीर्तन-प्रवचनांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. नेवासा येथे बांधण्यात आलेल्या ज्ञानेश्वरी मंदिराच्या शिखरावर कळस बसवण्याचा मान सर्व संतांनी एकमुखाने मामांना दिला होता. त्यांनी कीर्तन-प्रवचन या सेवेबद्दल कधीही मानधन, बिदागी घेतली नाही. त्यांच्या निधनानंतर पुुण्यातून त्यांची अंत्ययात्रा आळंदीस नेण्यात आली. इंद्रायणीकाठी अंत्यसंस्कार करून तेथेच त्यांची समाधी बांधण्यात आली.

विद्याधर ताठे

दांडेकर, शंकर वामन