Skip to main content
x

देवरे, सुधीर तुकाराम

      आंतरराष्ट्रीय जगताचे आकलन, राजकारणाची एक अंगभूत जाणीव, देशाची वकिली करण्याची कुशलता या तीन घटकांनी बनलेले रसायन म्हणजे विदेशनीती. अशा या चाणक्याच्या विश्वात गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवणे ही कामगिरीच काहीशी असामान्य! भारताचा राजदूत त्या देशातला भारताचा सर्वोच्च प्रतिनिधी असतो. मराठी माणसाने हे पद मिळवणे म्हणजे अवघड काम होय. त्यात जी निवडक माणसे यशस्वी झाली, त्यांत सुधीर देवरे हे एक महत्त्वाचे नाव आहे. तुकाराम आणि सुमती देवरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र सुधीर तुकाराम देवरे यांचा जन्म सोलापूर येथे झाला. वडिलांचे देवरे घराणे मराठवाड्यातल्या करडखेड इथले, तर मातोश्रींचे एकबोटे घराणे तुळजापूर या क्षेत्रस्थानाचे.

      सुधीर देवरे यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील नूतन मराठी शाळेतून झाले, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षणात सुधीर केवळ अभ्यासातच नव्हे, तर वक्तृत्वामध्येही आघाडीवर राहिले. त्यांनी आंतरशालेय वादविवाद स्पर्धांमध्ये सतत बक्षिसे मिळवली. १९५० साली मॅट्रिकला गुणवत्ता यादीत आठव्या क्रमांकावर येऊन सुधीर देवरे यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले, तर १९५९ साली मॅट्रिकला त्यांची धाकटी बहीण सुधा, बोर्डात पहिली आली. या बहीण-भावंडांची नावे मॉडर्न हायस्कूलच्या पटलावर नोंदली गेली. मात्र दोघांचे हे यश बघायला वडील हयात नव्हते. पुणे येथील वाडिया महाविद्यालयात उपप्राचार्यपदाची धुरा सांभाळत असतानाच त्यांचे निधन झाले.

       सुधीर देवरे यांनी पुण्यातील वाडिया महाविद्यालय, नंतर मुंबईतील पार्ले महाविद्यालय व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून भूगोल व रसायनशास्त्र हे विषय घेऊन बी.एस्सी.च्या परीक्षेत उच्च गुण प्राप्त केले. या काळात पार्ले महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सी.बी. जोशी यांचा प्रशासन सेवेबद्दल सुधीर यांच्या मनात आवड निर्माण करण्यात मोठा वाटा होता. १९५४ साली सुधीर यांची आय.ए.एस.च्या परीक्षेत निवड झाली. त्यांना लहानपणापासून राजकारणामध्ये रुची होतीच. सर्व विषयांचा चौफेर अभ्यास करण्याचीही आवड होती. घरातले कौटुंबिक वातावरणही त्यासाठी पोषक असेच होते. प्रखर देशभक्तीचे उपजतच बाळकडू मिळालेले! आंतरराष्ट्रीय विश्वासंबंधीचे कुतूहल, टेनिस, बॅडमिंटन, ब्रिज यांसारखे खेळ यांची पार्श्वभूमी वाडिया महाविद्यालयाच्या परिसरात तयार झालेली होतीच. आय.ए.एस.च्या परीक्षेला बसण्याची तयारी चालू असताना चीनने आक्रमण केले, त्यामुळे देशभक्तीची लाट उफाळली होती. आय.ए.एस.मध्ये निवड झाल्याने देशसेवेची संधी मिळाली. त्यांनी विदेशसेवा हे क्षेत्र आणि रशियन भाषेचे सुरुवातीपासून आकर्षण वाटत असल्याने ती निवडली.

       १९६५ साली डॉ. ना.र. देशपांडे यांची कन्या हेमा हिच्याशी विवाहबद्ध होऊन सुधीर देवरे मॉस्कोला रवाना झाले. भाषा शिक्षण आणि विदेशसेवेचे प्रशिक्षण यांची सुरुवात सोबतच झाली. इंदिरा गांधींची १९६६ सालची मॉस्को भेट हा विदेश सेवेतला पहिला अध्याय होता. पुढे वॉशिंग्टन, सिक्किम, जिनिव्हा, ब्रह्मदेश, दक्षिण कोरिया, जर्मनी, युक्रेन आणि इंडोनेशिया अशा अनेक ठिकाणी देवरे यांच्या बदल्या झाल्या. युरोप आणि आशिया असा क्रम राहिला. त्या देशांशी भारताचे राजनैतिक व आर्थिक संबंध वृद्धिंगत करणे आणि दोन्ही देशांना आपल्या कार्याने जवळ आणणे हा त्यांचा प्रयत्न प्रत्येक देशात कायम राहिला.

      १९७० ते १९७४ हा सिक्किममधला काळ भारताच्या इतिहासातला फार महत्त्वाचा टप्पा ठरला. या काळातच तिथली राजसत्ता संपुष्टात येऊन लोकशाही आली आणि त्यानंतर सिक्किम भारताचे एक राज्य बनले. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही फार मोठी घटना होती. तेथील घडलेल्या घडामोडींमध्ये अप्रत्यक्षरीत्या देवरे यांना फार मोठी भूमिका बजावावी लागली.  विदेश मंत्रालयात जॉइंट सेक्रेटरी म्हणून त्यांनी १९८२-१९८५ या काळात श्रीलंका, बांगलादेश, मालदीव व म्यानमार या शेजारी देशांबरोबरचे नाजूक संबंध हाताळले होते.

      त्यांची दक्षिण कोरियामध्ये १९८५ साली राजदूत म्हणून पहिली नेमणूक झाली. त्या वेळी भारत आणि कोरिया यांचे संबंध फार जुजबी स्वरूपाचे होते. ‘बुद्धाचा देश’ हीच भारताची प्रतिमा तोपर्यंत कोरियात होती. १९८५ ते १९८९ या काळातील देवरे यांच्या वास्तव्यात भारत-कोरिया संबंधांचा पूर्ण आराखडा तयार झाला. ह्युन्देई, देऊ, सॅमसंग ह्या कंपन्यांची नावे आज भारताच्या घराघरांमध्ये पोहोचली आहेत. त्या संबंधांची पायाभरणी त्या काळात झाली. कोरियामध्ये लोकशाही आली. आशियाई खेळ व ऑलिम्पिक्स त्याच काळात झाले. त्या सर्वांच्या व्यवस्थापनात राजदूताची भूमिका आणखी महत्त्वाची झाली. १९८९ ते १९९२ या कालावधीत फ्रँकफर्टला काउन्सिल जनरल असण्याचा अनुभव आणखीनच वेगळा. जर्मनीमधल्या व्यापार संबंधात औद्योगिक प्रदर्शनांचा भाग मोठा असे. भारतातल्या उद्योजकांना प्रोत्साहन देऊन जर्मनीत त्यांचा सहभाग वाढवण्याची कामगिरी काउन्सिल जनरलची असायची. दोन्ही जर्मनींचे एकीकरण झाल्यावर ही जबाबदारी वाढली.

       पुढे सोव्हियत युनियनची शकले झाली आणि १९९२ साली युक्रेन या स्वतंत्र देशाचा पहिला राजदूत म्हणून सुधीर देवरे यांची नेमणूक झाली. नव्याने राजनैतिक संबंध निर्माण करणे हे काम दुर्गम  तसेच आव्हानात्मक होते. युक्रेनबरोबर आर्मेनिया आणि जॉर्जिया या देशांच्या राजदूतपदाची जबाबदारीही त्यांना सांभाळायची होती. दूतावासाची उभारणी हा अनुभव अनोखा व त्यातून चेर्नोबिलचा बागुलबुवा भेडसावणार्‍या कीव्हसारख्या ठिकाणी तो उभारणे आणि दूतावासाचे मनोबल कायम ठेवणे याचाही ताण होता. दोन वर्षांत संबंधांना जेव्हा स्थिरता आली. राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांची युक्रेन भेट, सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पातॉन यांची भारतभेट आणि युक्रेन शेअरची भारताला येण्याची सुरुवात या देवरेंच्या तेथील वास्तव्यात घडलेल्या महत्त्वाच्या घटना होत्या. देवरे यांनी सातत्याने सरकारबरोबर राजनैतिक संवाद साधून भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधील विद्यापीठात मोफत शिक्षणाच्या सवलती परत मिळवून दिल्या. त्यामुळे जवळजवळ एक हजार विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, वैद्यकीय शास्त्र इत्यादी विषयांत आपले शिक्षण पूर्ण करणे शक्य झाले.

       १९९५ साली सुधीर देवरेंची इंडोनेशियात भारताचे राजदूत म्हणून नेमणूक झाली. हे फार वरिष्ठ पद समजले जाते. एक विस्तृत देश, जगात सर्वांत अधिक मुस्लीम लोकसंख्येचा देश, ‘आसियान’मधली मुख्य सत्ता व भारताशी अनेक सूत्रांनी प्राचीन काळापासून जोडलेला देश. जकार्ता हे आसियानचे मुख्य कार्यालय आहे. आसियानबरोबर संबंध प्रस्थापित करण्यात, ‘आसियान रीजनल फोरम’मध्ये भारताचा समावेश करण्यात व आसियानबरोबरची ‘संवाद भागीदारी’ (डायलॉग पार्टनरशिप) यांत देवरे यांचा फार महत्त्वपूर्ण कार्यभाग होता. या काळात भारत व इंडोनेशिया दरम्यान अनेक करार झाले व संबंध खूप दृढ झाले.

      १९९८ साली सुधीर यांची विदेश मंत्रालयात अर्थसंबंधी सचिवपदी नियुक्ती झाली. विदेश मंत्रालयात एकूण तीन सचिव असतात व ते विदेश धोरणाची धुरा सांभाळत असतात. १९९८ ते २००१ या साडेतीन वर्षांच्या दीर्घ काळात सुधीर देवरे विदेश मंत्रालयात सचिव पदावर होते. आशिया, आफ्रिका यांतले देश, अनेक आंतरराष्ट्रीय संस्था यांबाबतची त्यांच्यावर थेट जबाबदारी होती. अनेक परिषदांत ते भारताचे प्रतिनिधित्व करीत असत. त्या काळात ‘लुक ईस्ट’ हे पौर्वात्य देशांवरचे नवे धोरण प्रस्थापित झाले, त्यात देवरेंचा मोठा हातभार होता. ते धोरण यशस्वी झाले असून आज भारताला फार उपयोगी पडत आहे.

      फिजी या पॅसिफिक महासागरातल्या देशात २००० साली, जेव्हा पुंडगिरीमुळे भारतीय वंशाच्या पंतप्रधानास पदच्युत केले गेले व हिंसेचे वातावरण निर्माण झाले, तेव्हा भारत सरकारतर्फे फिजीतल्या भारतीय समाजासोबत संवाद चालू ठेवण्यासाठी देवरे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती.

      २००१ साली देवरे यांची विदेश मंत्रालयातली कारकीर्द संपली; पण नंतरच्या दहा वर्षांत त्यांनी भारतातल्या व परराष्ट्रांतल्या अनेक नामवंत संस्थांमध्ये उच्च पदांवर काम केले व आजही ते  करीत आहेत.

     २००१ ते २००३ या काळात देवरे ‘राष्ट्रीय सुरक्षाविषयक सल्लागार मंडळ’ (नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅडव्हायजरी बोर्ड) या आपल्या देशातल्या सर्वोच्च सिक्युरिटी संस्थेचे सदस्य होते. २००२ साली दिल्लीच्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ते अभ्यागत प्राध्यापक होते. पूर्व आशिया अध्ययनाविषयी ते मार्गदर्शन करीत असत. आर.आय.एस. ह्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधाबाबतच्या दिल्लीतल्या सुप्रसिद्ध संस्थेचे २००२ ते २००६ या काळात ते उपाध्यक्ष होते.

      २००३ मध्ये त्यांना सिंगापूरच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ साउथ-ईस्ट एशियन स्टडीज’ने ‘व्हिजिटिंग सीनियर फेलो’ म्हणून सिंगापूरला आमंत्रित केले.  देवरे यांनी तिथे २००६ पर्यंत काम केले. या काळात त्यांनी दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांवर काम केले. ‘इंडिया अ‍ॅण्ड साउथ-ईस्ट एशिया : टोवर्ड्स सिक्युरिटी कन्व्हर्जन्स’  हे पुस्तक त्यांनी २००५ मध्ये लिहिले व ‘ए न्यू एनर्जी फ्रॉण्टियर : दी बे ऑफ बेन्गॉल रीजन’  हे पुस्तक संपादित केले. सिंगापूरमध्ये असताना त्यांनी अनेक लेख लिहिले व भाषणे दिली. २००७ मध्ये अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना ‘फेलो’ म्हणून आमंत्रित केले. एक वर्ष त्यांनी त्या विद्यापीठात काम केले.

       भारतात परत आल्यावर २००९ साली ‘इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स’ या नामवंत संस्थेने (पंडित नेहरूंच्या प्रेरणेतून १९४३ साली ही संस्था निर्माण झाली. भारतातील आंतरराष्ट्रीय अभ्यासाबाबतची ही सर्वांत जुनी व प्रसिद्ध संस्था आहे) त्यांना महासंचालक या पदाची धुरा सांभाळण्यासाठी खास आमंत्रण दिले. सुधीर आजही तिथे कार्यरत आहेत. भारताचे उपराष्ट्रपती या संस्थेचे अध्यक्ष आहेत. गेल्या ६७ वर्षांच्या संस्थेच्या इतिहासात सुधीर देवरे हे पहिलेच मराठी ‘डायरेक्टर जनरल’ आहेत.

      - हेमा देवरे

देवरे, सुधीर तुकाराम