Skip to main content
x

धर्माधिकारी, शंकर त्र्यंबक

आचार्य दादा धर्माधिकारी

     महात्मा गांधींनी चालविलेल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात महाराष्ट्रातील जे अनेक नामवंत सहभागी झाले होते, त्यांपैकी एक म्हणजे शंकर त्र्यंबक उर्फ आचार्य दादा धर्माधिकारी हे विदर्भातील थोर नेते होत. त्यांचा जन्म त्या वेळच्या मध्य प्रांतात मूलतापी या गावी झाला. धर्माधिकारी यांचे घराणे मुलताई (जि. बैतुल, मध्य प्रांत) येथील प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे वडील त्र्यंबक धुंडिराज एल्एल.बी. असून सरकारी मुन्सफ या पदावर काम करीत. सरकारी नोकरीतील नियमांनुसार त्यांच्या बदल्या वारंवार होत. त्यामुळे दादा धर्माधिकारी यांच्यावर त्यांचे चुलते भाऊसाहेब धर्माधिकारी यांचा अधिक प्रभाव होता. विशेषत: भगवद्गीता व ज्ञानेश्वरी यांचा सांगोपांग अभ्यास त्यांनी भाऊसाहेबांच्या जवळ बसून केला. लोकमान्य टिळक हयात असतानाच १९१८च्या आसपास देशस्वातंत्र्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा त्यांनी केली होती. भारतीय तत्त्वज्ञान, हिंदू धर्म व संस्कृती यांविषयीचे सखोल मनन-चिंतन त्यांनी याच काळात सुरू केले. महात्मा गांधींचे शिष्य व सुप्रसिद्ध विचारवंत विनोबा भावे यांच्याशी त्यांचा अखंड पत्रव्यवहार चाले. पारतंत्र्याच्या काळात तत्कालीन मोठे नेते ज्या प्रकारचा आचारधर्म पाळत त्याच्या अनुकरणातून गांधी व विनोबा यांच्याशी त्यांचे गोत्र अधिक प्रमाणात जुळले. त्यामुळेच महाविद्यालयीन शिक्षण मध्येच सोडून देऊन गांधींच्या प्रखर स्वतंत्रतावादी तरीही शांतता व अहिंसा यांच्या मार्गाने जाणार्‍या राष्ट्रकार्यात ते हिरिरीने उतरले. त्यांना वेळोवेळी तुरुंगवासही भोगावा लागला. त्यानंतर उर्वरित आयुष्यात त्यांनी स्वत:ला गांधीवादी विचारसरणीला वाहून घेतले.

दादा धर्माधिकारी यांनी भरपूर स्फुट-लेखन केलेले आहे आणि त्या सर्व लेखनावर गांधी व विनोबा यांच्या विचारांची छाप आहे. ‘अहिंसेची साधना’ (१९४५) या पुस्तकानंतर ‘सर्वतोमुखी क्रांतिकारक’ व ‘भारतीय जीवनाचे प्रयोगी प्रतिनिधी’ या त्यांच्या दोन लेखांचे मिळून ‘गांधीजी एक दर्शन’ (१९४६) हे पुस्तक प्रकाशित झाले. ‘पाकिस्तानी वृत्तीचा प्रतिकार’ हा त्यांच्या निवडक लेखांचा, वामन चोरघडे यांनी संपादित केलेला लेखसंग्रह १९४८मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातील ‘जात-जमातवाद’, ‘धार्मिक कलह’, ‘अहिंदू आणि गोवधबंदी’, ‘हिंदुत्ववाद की शबल राष्ट्रवाद’, ‘मानवतेचा मानदंड’ इत्यादी लेखांमधून त्यांच्या विचार-विश्वाचा परिचय घडतो. राजकारण, स्त्री-शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचे बदल व्हावयास हवे, असा त्यांचा आग्रह होता. या दृष्टीने त्यांनी केलेली मांडणी १९४८मध्ये प्रकाशित झालेल्या ‘क्रांतिनिष्ठा’ या लेखसंग्रहात आढळते.

दादा धर्माधिकारी हे घटना परिषदेचे एक सदस्य होते. त्यांनी ‘आपल्या गणराज्याची घडण’ हे घटना परिषदेचे व तिच्या कार्यपद्धतीचे विवेचन करणारे पत्रात्मक लेखांचे पुस्तक १९५१मध्ये सिद्ध केले. यांखेरीज ‘अंतरीचे उमाळे’ (१९५३), ‘साम्ययोगाच्या मार्गावर’ (१९५५), ‘क्रांतीचे पुढचे पाऊल’ (१९५६) ही त्यांची पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. महाराष्ट्रात स्त्रीवादी चळवळीचा आरंभ होण्यापूर्वीच आधुनिक सुधारक विचारवंतांनी स्त्री-सुधारणेविषयी जे विचार मांडले होते त्यापेक्षा वेगळे विचार मांडून स्त्री-पुरुष परस्परसंबंधांविषयी, कुटुंबसंस्थेविषयी नवे भान उत्पन्न करणारे ‘स्त्री-पुरुष सहजीवन’ (१९७३) हे पुस्तक त्यांनी लिहिले. स्त्रियांच्या स्थितीविषयी व समस्यांविषयी  त्यांच्या मनात अतिशय कळवळा होता. स्त्रीचे महत्त्व व विशिष्टत्व त्यांनी आपल्या लेखनातून वारंवार सुस्पष्ट केले आहे.

विनोबा भावे यांच्या सर्वोदयवादी विचारसरणीचे अधिकारी भाष्यकार म्हणून धर्माधिकारी ख्यातनाम आहेत. ‘सर्वोदयदर्शन’ (१९५७) हा त्यांच्या व्याख्यानांचा संग्रह सर्वोदयाची विचारसरणी स्पष्ट करणारा आहे. आपल्या व्याख्यानांतून त्यांनी हिंदू समाजातील वेगवेगळे दोष आणि जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेले प्रश्न त्यांनी सुस्पष्ट केले आहेत. त्या काळातल्या सगळ्याच विचारवंतांप्रमाणे दादांनीही मार्क्स वाचलेला होता, तथापि गांधींच्या विचारांनी ते इतके भारावलेले होते की, ते विचार मार्क्सच्याही पुढे जाणारे आहेत याविषयी ते नि:शंक होते. त्यांच्या लेखनाला विनोबांच्या लेखनाप्रमाणेच एक आध्यात्मिक व विधायक अंग आहे. त्यांची भाषा प्रासादिक व परिणामकारक आहे. मराठीतील वैचारिक स्वरूपाच्या निबंधवाङ्मयात दादा धर्माधिकारी यांच्या लेखनामुळे मोलाची भर पडली आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व ऋजू, त्यागी, तपस्वी व मायाळू होते. कोणत्याही सत्तेचा मोह नसल्यामुळे ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात सक्रिय राजकारणात सहभागी झाले नाहीत.

- प्रा. डॉ. विलास खोले

धर्माधिकारी, शंकर त्र्यंबक