Skip to main content
x

ढसाळ, नामदेव लक्ष्मण

          नामदेव साळूबाई ढसाळ आणि नामदेव लक्ष्मण ढसाळ अशी दोन पूर्ण नावे ढसाळ यांनी दिली आहेत. सर्वसाधारणतः नामदेव ढसाळ या नावाने ते परिचित आहेत. यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर (पूर्वीचा खेड) तालुक्यातील कनेसरपूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या जोडगावातील ‘पूर’ या गावात झाला. वडिलांची मुंबईच्या कत्तलखान्यांशी संबंधित नोकरी असल्याने, इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण गावी घेतल्यावर पुढल्या शिक्षणासाठी मुंबईत भायखळा हेन्स रोडला प्रवेश. कामाठीपुरा किंवा गोलपिठा या मुंबईतल्या ‘रेडलाइट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या परिसरात आरंभीचा काळ. त्या काळच्या एस.एस.सी.पर्यंतच्या शिक्षणानंतर काही काळ टॅक्सी चालवली. काही काळ पाटबंधारे खात्यात शिपायाची नोकरी केली. याच काळातल्या आणि गोलपिठ्याच्या अनुभवविश्वाशी संबंधित कवितांचा पहिला संग्रह ‘गोलपिठा’ (१९७२) प्रकाशित झाला. या संग्रहाच्या आरंभी विजय तेंडुलकर लिहितात, “पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी ‘नो मॅन्स लॅन्ड’- निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरू होतो, तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील, ‘गोलपिठा’ नावाने ओळखले जाणारे जग सुरू होते.”

‘गोलपिठा’ या पहिल्याच संग्रहातून नामदेव ढसाळ यांनी त्यांच्या पूर्वकालीन आणि समकालीन कविता-व्यवहारातले भाषिक संकेत, विषयांचे संकेत आणि कविता-मांडणीचेही संकेत पार उद्ध्वस्त केले. त्या काळात ‘रसाळ नामदेव ते ढसाळ नामदेव’ असा त्यांचा अधिक्षेपही करण्यात आला. ‘गोलपिठा’ (१९७२) ते ‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ (२००६) या काळात त्यांचे मराठी कवितांचे एकूण नऊ संग्रह प्रकाशित झाले आहेत.

ढसाळांच्या कवितेने आरंभीच ‘गोलपिठा’ या संग्रहात प्रस्थापित कविता-संकेतांना जसे उद्ध्वस्त केले, तसेच त्या पुढच्या स्वतःच्या प्रत्येक नव्या संग्रहात स्वतःच्या कवितांच्या संकेत समूहांनाही सातत्याने उद्ध्वस्त केले आहे. मात्र हे सर्व होत असताना एक सूत्र त्यांनी सातत्याने आपल्या कवितेत जपले आहे, अधोरेखित केले आहे. ते सूत्र ‘गोलपिठा’च्या आरंभीच असे व्यक्त झाले आहे : ‘सर्वसामान्य माणसाला सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठा यांपासून वंचित ठेवणार्‍या शोषण व्यवस्थेला सुरुंग’ लावण्याचे. या सूत्राची अभिव्यक्ती ‘गोलपिठा’ या संग्रहातील ‘माणसाने’ या दीर्घ कवितेत अशी झाली आहे: “माणसाने  पहिल्या प्रथम स्वतःला। पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे।” पुढे जाऊन या उद्ध्वस्त होण्याच्या करण्याच्या अनेक परी खास ढसाळांच्या शब्दशैलीत पाहाव्यात अशा आहेत. “हे सारे सारे विश्वव्यापू गळूप्रमाणे फुगू द्यावे। अनाम वेळी फुटू द्यावे रिचू द्यावे।” असे म्हणत, ‘एक तीळ सर्वांनी करंडून खावा। माणसावरच सूक्त रचावे। माणसाचेच गाणे गावे माणसाने ।’

नामदेव ढसाळांची आजवरची कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत आणि कवितेत सर्वार्थाने रिचविले आहेत. ‘गोलपिठा’चे प्रकाशनवर्ष १९७२ असले, तरी कवितालेखनाचा काळ साठीच्या दशकाचा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कृतीचा आधार घेत उभे राहिलेले पूर्वाश्रमीचे महार आणि महारेतर अस्पृश्य; धर्मांतरानंतरचे बौद्ध समाजातील नवशिक्षित यांच्या विद्रोही उठावाचा काळ आहे. याच प्रेरणेतून मराठी साहित्यात, विशेषतः आणि काही प्रमाणात भारतीय साहित्यातही आणि नंतरच्या काळात जागतिक साहित्यातही ‘दलित साहित्य’ ही संकल्पना विचाराच्या पातळीवर रूढ झाली आहे. इथे हेही नमूद करणे गरजेचे आहे की बाबूराव बागूल, दया पवार, प्र.ई.सोनकांबळे, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, यशवंत मनोहर, प्रकाश जाधव, भुजंग मेश्राम, अरुण काळे, प्रज्ञा दया पवार आणि यांच्यासोबत लिहिणार्‍या खणखणीत नाण्यासारख्या मराठी भाषक साहित्यिकांना केवळ ‘दलित साहित्यिक’ अशा राखीव बिरुदावलीत समाविष्ट करणे, मराठी साहित्य परंपरेतील संतकवी मंडळींचे योगदान विचारात घेता, अन्यायकारक आहे.

ढसाळांनी ‘या सत्तेत जीव रमत नाही’ (१९९५) यात डॉ.आंबेडकरांना संबोधित करत म्हटले आहे - “आज आमचे जे काही आहे। ते सर्व तुझेच आहे। हे जगणे आणि मरणे। हे शब्द आणि ही जीभ। हे सुख आणि दुःख। हे स्वप्न आणि वास्तव। ही भूक आणि तहान। सर्व पुण्याई तुझीच आहे।” ढसाळांच्या लेखनामागे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि कृतींचा पाया आहे, हे निर्विवाद आहे. किंबहुना १९६०नंतरच्या अनियतकालिकांच्या उठावालाही बळ देण्यात इतर परिमाणांबरोबर हेही एक परिमाण आहे. हे बळ नसते, तर बहुजनांतले कितीतरी आवाज मुके राहिले असते. हे आवाज साहित्याच्या प्रस्थापित वर्तुळातून बाहेर तरी फेकले गेले असते किंवा प्रस्थापित साहित्य व्यवस्थेत त्यांच्याही नकळत सामावले गेले असते. ढसाळांच्या लेखनाचा विचार करताना हे विशेषत्वाने नोंदवायला हवे. कारण त्यांनी त्याचा उच्चार वेळोवेळी जाहीरपणे केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतच गौतम बुद्ध, चार्वाक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कार्ल मार्क्स, जेनी मार्क्स, रमाबाई आंबेडकर, लेनिन, हो चि मिन्ह, माओ त्से तुंग, फिडेल कॅस्ट्रो, चे गेव्हारा, मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला या आणि अशा शोषणाविरुद्ध लढणार्‍या भारतातल्या आणि जगभरातल्या माणसांचा उच्चार त्यांच्या लेखनात आहे. त्यांच्या कवितासंग्रहांच्या अर्पणपत्रिका आणि कविता याची साक्ष देतात.

‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हालविले’ (१९९५) या संग्रहाला ‘माझी भूमिका’ असे प्रस्तावनावजा लेखन आरंभी आहे. तो त्यांचा लेखनविषयक ‘जाहीरनामा’च आहे. “माझ्या कवितेची जमीन ही सर्व हारावर्गाची आहे... मी आणि माझी कविता माझ्या वर्गाच्या जीवननिष्ठांशी प्रामाणिक आणि एकरूप आहे... माझी राजकीय कविता मी कष्टकरी जनतेच्या हाती देत आहे.

‘दलित पॅन्थर’ स्थापन करण्यात पुढाकार. पॅन्थरच्या स्थापनेपासूनच सामाजिक व राजकीय चळवळीत अतिशय सक्रिय सहभाग. एकूणच साहित्य व साहित्यबाह्य जीवनात प्रखर विद्रोहाची भूमिका.

नामदेव ढसाळांची कविता आणि त्यांचे खासगी व राजकीय चरित्र ह्या परस्परांत गुंतलेल्या गोष्टी आहेत. त्यातून प्रवास करणे आणि त्यांना समजून घेणे सोपे नाही. ‘अनुष्टुभ्’ जुलै-ऑगस्ट १९७७ च्या नामदेव ढसाळ विशेषांकात तसा प्रयत्न झाला आहे; पण तो पुरेसा नाही. त्यांच्या आजवरच्या कवितांच्या संकलन-संपादनाचा एक प्रयत्न ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ (फेब्रुवारी २००७), हा त्यांच्या कवितेला खूप न्याय देणारा आहे. सातत्याने कवितालेखन, अखंड चणचण आणि त्यासाठी करायची धावपळ, राजकीय आयुष्यातल्या उलथापालथी, दलित पॅन्थरचा उदयास्त, खासगी आयुष्यातले ताणतणाव हे सगळे पेलत त्यांची कविता ताज्या दमाने उसळी घेताना दिसते. प्रदीर्घ काळ ‘मायस्थेनिया ग्राव्हिस’ या दुर्धर आजाराने ग्रासले असतानाही त्यांची ऊर्जा ताज्या दमाने उसळी घेताना दिसते. स्वतःला आणि भोवतालाला तपासत पुढे जाताना दिसते.

त्यांची ही अविरत ऊर्जा त्यांच्या गद्यलेखनातही पाहता येते. सामना, आज दिनांक या वृत्तपत्रांतले सदरलेखन, राजकीय गरजेचे लेखन, कादंबरीलेखन हे तर आहेच. शिवाय ‘विद्रोह’, ‘सत्यता’ अशा अनियतकालिकांचे प्रकाशन, आंतरराष्ट्रीय साहित्योत्सव फेब्रुवारी -२००७ आणि फेब्रुवारी-२००८ यांचे आयोजन अशा उपक्रमांतूनही ही ऊर्जा प्रत्ययास येते.

नामदेव ढसाळांच्या कवितेचा प्रभाव मराठी कवितेवर अटळच आहे. पण तो भारतीय भाषांतूनही आहे. जर्मन भूमीवर त्यांना कविता-वाचनासाठी निमंत्रित करण्यात आले (बर्लिन फेस्टिव्हल, जून २००१), १९९९ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००४ साली साहित्य अकादमीने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सगळ्या भाषांतून एकाच कवीची निवड विशेष पुरस्कारासाठी केली; ती नामदेव ढसाळ यांची होती. ‘The Poet of Underworld’  हा त्यांच्या कविताच्या इंग्रजी अनुवादाचा ग्रंथ (अनुवाद- दिलीप पुरुषोत्तम चित्रे, छायाचित्रे:Henning Stegmuller) चेन्नईच्या एस.आनंद नावायन प्रकाशनातर्फे आला आणि त्या प्रकाशनाला ब्रिटीश कौन्सिलचा २००७चा पुरस्कार मिळाला. मराठी भाषेतले बहुतेक सगळे महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

‘गोलपिठा’ (१९७२), ‘मूर्ख म्हातार्‍याने डोंगर हालविले’ (१९७५), ‘आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी’ (१९७६), ‘तुही इयत्ता कंची तुही इयत्ता’ (१९८१), ‘खेळ’ (१९८३), ‘गांडू बगिचा’ (१९८६), ‘या सत्तेत जीव रमत नाही’ (१९९५), ‘मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे’ (२००५), ‘तुझे बोट धरून चाललो आहे मी’ (२००६), ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ (निवडक कवितांचे संकलन) : संपादन : सतीश कळसेकर, प्रज्ञा दया पवार (२००७).

त्यांची प्रकाशित पुस्तके अशी आहेत:

‘हाडकी हाडवळा’ (१९८१), ‘निगेटिव्ह स्पेस’ (१९८७), ‘आंधळे शतक’ (१९९५), ‘सर्व काही समष्टीसाठी’ख (२००६).

तसेच त्यांच्या नावावर पुढील पुस्तिका जमा आहेत:

‘दलित पॅन्थरचा जाहिरनामा’, ‘बुद्ध धर्म आणि शेष प्रश्न’, ‘इतिहासाची चक्रे उलटी फिरवू नका, नाहीतर खड्ड्यात जाल’, ‘जातीयवाद विरोधी परिषद, १९९०च्या निमित्ताने पुस्तिका’, ‘अध्यक्षीय भाषण, आठवे कामगार साहित्य संमेलन, जून १९९९’, ‘आंबेडकरी चळवळ आणि सोशलिस्ट, कम्युनिस्ट’ (२००१).

- डॉ. सतीश काळसेकर

ढसाळ, नामदेव लक्ष्मण