Skip to main content
x

धुंडीराजशास्त्री, विनोद

   हर्षी विनोद धुंडीराजशास्त्री यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील एका लहानशा गावात झाला. इयत्ता चौथीपर्यंतचे त्यांचे शिक्षण गावातील एका शाळेत झाले. आपला मुलगा कुशाग्र बुद्धीचा आहे याची जाणीव त्याच्या घरच्या लोकांना झाली. त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून इयत्ता पाचवीच्या वर्गात त्याचे नाव मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटी, या त्या वेळच्या सुप्रसिद्ध शाळेत घालण्यात आले. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विनोद यांनी इंग्रजी व संस्कृत साहित्याचा अभ्यास सुरू केला. लहान वयातच त्यांनी इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व संपादन केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या प्रसिद्ध एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच त्यांच्या साहित्यसेवेला बहर आला. इंग्रजी भाषेतील बेकन, शेक्सपीअर, स्टिव्हन्सन, ब्राउनी, शेली, कीट्स वगैरे साहित्यिकांचा सखोल अभ्यास केला. इंग्रजी भाषा व साहित्यावर त्यांनी प्रभुत्व मिळविले. त्याचप्रमाणे, संस्कृत भाषेतील कालिदास, भवभूती, भास वगैरे कवी व नाटककारांच्या साहित्यकृतींचा अभ्यास केला. मराठी भाषेतील ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास अशा संतांच्या ग्रंथांचा व आधुनिक काळातील कवी व साहित्यिकांच्या ग्रंथांचा अभ्यास केला. या तीनही भाषांतील साहित्यकृतींचे ते सुंदर रसग्रहणही करीत.

१९२५ साली ते चांगल्या गुणांनी बी.ए. उत्तीर्ण झाले व त्याच महाविद्यालयामध्ये त्यांनी एम.ए.चा अभ्यास सुरू केला. याच काळात हस्तसामुद्रिक, मुद्रासामुद्रिक व ज्योतिषशास्त्राचा त्यांच्या ठायी असलेला व्यासंग वाढला. ज्योतिषशास्त्राच्या तीनही प्रकारांवर त्यांनी प्रावीण्य मिळविले. १९२७ साली उच्च श्रेणीत एम.ए. ही पदवी संपादन केल्यानंतर विनोद अंमळनेर येथील श्रीमंत प्रतापशेठ यांच्या तत्त्वज्ञान मंदिरात ‘रिसर्च लेक्चरर’ म्हणून रुजू झाले. संशोधन कार्यात मग्न असतानाच त्यांनी पौर्वात्य व पाश्चात्त्य दर्शन ग्रंथांचा तुलनात्मक, सखोल अभ्यास केला. त्याचप्रमाणे, त्यांंनी मधुसूदन सरस्वती यांचा अद्वैत सिद्धान्त आत्मसात केला.

आद्य शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा व सिद्धान्तांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. शंकराचार्यांचे ‘शारीरभाष्य’ हा त्यांचा अखंड चिंतनाचा विषय होता. एवढ्यावरच त्यांच्या बुद्धीची भूक भागली नाही, म्हणून त्यांनी पातंजल योगसूत्रेही आत्मसात केली. महर्षी विनोद यांना बालपणापासूनच अध्यात्माची आवड होती. इंग्रजी, संस्कृत व मराठी साहित्याचा अभ्यास आणि ज्योतिषशास्त्राचा व्यासंग यांमुळे विश्वाचा कारभार हाकणाऱ्या अतींद्रिय शक्तीचा शोध घेण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. पण या क्षेत्रातील गुरुशिवाय ते साध्य होणे शक्य नव्हते.

गुरूचा व अज्ञाताचा शोध घेण्यासाठी त्यांनी १९२८ सालापासून हिमालयामध्ये अनेक वेळा भ्रमण केले. त्यांनी गंगोत्री, जमनोत्री, केदारनाथ, बद्रिनाथ, वसुंधरा, सतोपंथ इथपर्यंत प्रवास केला. या संचाराच्या दरम्यान त्यांना सिद्ध सद्गुरूंचा अनुग्रह झाला. त्यांनी सिद्धपुरुषांच्या भेटी घेतल्या, दुर्गम गुहांमध्ये वास्तव्य करणाऱ्या तपस्व्यांची दर्शने घेतली. त्यांना श्री बीजाक्षर विद्या प्राप्त झाली.

ओंकार मांधाता येथील मायानंद चैतन्य यांच्या आश्रमात ते काही दिवस राहिले. केदार तुंगनाथ विद्यापीठातर्फे तेथील आचार्य महिमानंद यांनी विनोदांना ‘दर्शनालंकार’ ही पदवी दिली. चार वर्षे भूमिगत राहून, हिमालय, तिबेट वगैरे दूरच्या ठिकाणी जाऊन त्यांनी सद्गुरूंचा शोध घेतला. नाथपंथातील थोर सिद्धपुरुषांचे दर्शन घेऊन त्यांच्याकडून ज्ञान संपादन केले. मद्रासचे प्रसिद्ध वकील दोरायस्वामी यांच्याबरोबर पाँडिचेरीला जाऊन विनोद यांनी श्री. अरविंद घोष यांची भेट घेतली. विनोदांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन अरविंदांनी त्यांना ‘Life Divine’चे दोन ग्रंथ प्रेमाने भेट दिले.

कुलाबा जिल्ह्यातील काँग्रेस ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. बाळासाहेब ठोसर हे महर्षी विनोदांचे वर्गमित्र होते. ‘कसेल त्याची जमीन’ या कुलाबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनात विनोदांनी ठोसर यांच्या समवेत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे, १९३१ ते १९३८ या कालावधीत मुंबईतील बहुतेक सर्व संस्थांशी महर्षी विनोदांचा संबंध होता.

गोवर्धन संस्था, संस्कृत पाठशाळा, ब्राह्मणसभा,गीता पाठशाळा, गीता धर्म मंडळ अशा अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. १९३७ नंतर गो- वध बंदीच्या चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला होता इतकेच नव्हे, तर श्री चौंडे महाराज आणि विनोद यांनी लॉर्ड लिनलिथगो, महात्मा गांधी, पंडित मालवीयजी, बापूजी अणे इत्यादी नेत्यांच्या भेटी घेऊन लाहोर येथे नव्याने होऊ घातलेल्या कत्तलखान्याचे काम बंद पाडले. याच काळात धर्म, तत्त्वज्ञान यांची चर्चा करण्यासाठी विनोदांच्या महात्मा गांधीजींशी अनेक वेळा भेटी होत. अस्पृश्यता, सामाजिक विषमता,अन्याय व स्त्रियांचे प्रश्न यांबाबत विधायक दृष्टीने सुधारणा कशी करता येईल या संदर्भात महात्मा गांधीजी विनोदांचा सल्ला घेत व विचार-विनिमय करीत.

देशो-देशींच्या विद्वत्सभांमध्ये सक्रिय भाग घेऊन महर्षी विनोद यांनी आपल्या ज्ञानाने व अमोघ वक्तृत्वाने विद्वान मंडळींची मने जिंकली. त्यांनी तीन वर्षे जगातील प्रत्येक देशात जाऊन विश्वशांतीचा संदेश दिला. जपानमधील टोकियो या शहरात त्यांना ‘विश्वशांती सचिव’ या उपाधीने गौरवण्यात आले. त्यांनी न्यूयॉर्कमधील आपल्या आधुनिक व अभिनव प्रयोगशाळेत डॉ. फायफर यांंना स्वतःच्या अतींद्रिय शक्तीवर संशोधन करू दिले. नोबेल पुरस्कार विजेते डॉ. आइन्स्टाइन यांच्याशी गणित विषयावर चर्चा केली. एवढेच नव्हे, तर जागतिक कीर्तीच्या डॉ. फ्रॉइड यांच्या संस्थेत सायकोअ‍ॅनॅलिसिस या विषयात पीएच.डी. ही सन्माननीय पदवी संपादन केली. सारे जग त्यांना एक महान सायकोथेरपिस्ट म्हणून ओळखू लागले.

१९३५ साली करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी विनोदांना उच्च तर्कशास्त्रातील म्हणजे भारतीय न्यायदर्शनातील विद्वत्तेबद्दल ‘न्यायरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.

एवढेच नव्हे, तर आपल्या पीठाचे भावी उत्तराधिकारी म्हणून त्यांचे नाव जाहीर केले. केदार तुंगनाथ विद्यापीठातर्फे तेथील आचार्य महिमानंद यांनी विनोदांना ‘दर्शनालंकार’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. १९५८ मध्ये पुणे नगरपालिकेच्या शतसांवत्सरिक उत्सवाच्या प्रसंगी डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते विनोदांना ‘न्यायरत्नांचा अध्यात्म महर्षी’ म्हणून सत्कार करण्यात आला. इंग्लंडमध्ये तत्त्वज्ञ सी.इ.एम. जोड, बर्नार्ड रसेल आणि डॉ. युंग यांच्याशी विनोदांचा चांगला परिचय झाला. ‘Fellow of the Royal Society of Arts’ या नामांकित संस्थेचे सदस्यत्व विनोदांना देण्यात आले होते. त्यांनी इंग्रजी भाषेत हृदयस्पर्शी कविता केल्या. ते ‘माउली’ या संतवाङ्मयास वाहिलेल्या मासिकात सातत्याने लिहीत.

मुंबईच्या ‘ज्ञानदूत’ या वार्षिकांकाच्या प्रत्येक अंकात विनोदांचा पहिला लेख असे. पाश्चात्त्य विचारवंतांच्या सिद्धान्तांचा परामर्श व भारतीय तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती यांच्या तौलनिक अभ्यासाच्या दृष्टीने ‘ज्ञानेश्वर व आधुनिक पाश्चात्त्य विचार’ हा त्यांचा लेख उच्च कोटीचा आहे. १९६० च्या सुमारास त्यांनी ‘धवलगिरी’ हा प्रसिद्ध आध्यात्मिक ग्रंथ लिहिला.

१९२५ ते १९३० या कालावधीत महर्षी विनोदांनी मानवी मनाचा आणि निसर्गाचा संबंध, प्रेम की द्वेष, विभूती, पूजेची प्रवृत्ती, जड आणि चेतन, स्थल-काल यांचे स्वरूप, कलेचे स्वरूप वगैरे विषयांवर मूलगामी चर्चा असलेल्या तात्त्विक संवाद लेखमालेला त्यांनी ‘आधुनिक आरण्यके’ असे नाव दिले. हे लेख प्रथम ‘विविध ज्ञान विस्तार’मध्ये प्रसिद्ध झाले. यांतील काही निवडक लेख प्रोफेसर प्र.रा.दामले यांनी १९८० साली ‘आधुनिक आरण्यके व एका मूर्तिभंजकाचे तत्त्वविचार’ या नावाने प्रसिद्ध केले.

याखेरीज, महर्षी विनोदांनी योगविद्येविषयी मार्गदर्शनपर अनेक लेख लिहिले. आध्यात्मिक विषयांवर अभंग लिहिले. रोगमुक्तीसाठी व आयुर्वेदासंबंधी आपले मूलभूत विचार प्रकट केले.

 — प्रा. नीलकंठ पालेकर

धुंडीराजशास्त्री, विनोद