Skip to main content
x

गाडगीळ, पांडुरंग लक्ष्मण

गाडगीळ, बाळ

     जवळपास पन्नास वर्षे प्राधान्याने विनोदी कथालेखन करणारे बाळ गाडगीळ यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील हुर्से या गावी झाला. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने स्वत:च्या पायावर उभे राहत पुढील सर्व उच्च शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेऊन भारतीय प्रशासनिक सेवा (आय.ए.एस) आणि मध्यवर्ती सेवा परीक्षा उत्तीर्ण (१९५१) झाले. अमेरिकेतील विर्स्कोन्सिन विद्यापीठात (१९६३) शिक्षण व नोकरी केली. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून मुंबई, पुणे, सांगली येथे काम केले. सांगलीच्या बृहन्महाराष्ट्र कॉमर्स व पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून दीर्घकाळ काम करीत असताना प्रशासनाचाही मोठा अनुभव मिळाला. शिक्षण क्षेत्रातील वेगळा प्रयोग म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘सिम्बॉयसीस’ या शिक्षणसंस्थेचे प्रथम शिक्षण सल्लागार, विद्यमान उपाध्यक्षपदी कार्यरत होते.

     गाडगीळांचा अध्ययन व अध्यापन याचा विषय अर्थशास्त्र हा असल्याने या विषयावर त्यांनी क्रमिक पुस्तके लिहिली असून अर्थशास्त्र विषयक राष्ट्रीय व जागतिक नियतकालिकांमधूनही विपुल लेखन केले . अर्थशास्त्र विषयक अनेक परिषदांमध्येही ते सहभागी झाले . उत्तम वक्ते, कथाकार, कादंबरीकार, प्रवासवर्णनकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गाडगीळांनी ‘वळचणीचे पाणी’ (२००१) हे आत्मचरित्र लिहिले असून त्यात कोकणातील दारिद्र्य आणि त्यावर मात करून स्वत:चे स्वतंत्र विश्व निर्माण करणार्‍या पांढरपेशा वर्गाचे दर्शन घडते. अनेक अनुकूल-प्रतिकूल वाटा, वळणांचा शोध घेत हे वळचणीचे पाणी कसे प्रवाहित राहिले, त्याचा प्रवाही वेध गाडगीळ यांच्या या आत्मचरित्रातून घेतलेला जाणवतो. बर्‍या-वाईट अनुभवांबरोबरच यातून काही व्यक्तिचित्रे (विशेषतः त्यांच्या आईचे) चांगल्या रितीने साकारली .

     गाडगीळ यांनी मराठी साहित्यसृष्टीत विनोदी कथाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली . त्यांच्या या कथा बहुतांश मध्यमवर्गीय मानसिकतेवर बेतल्या असल्या आणि चिं. वि. जोशी यांचा प्रभाव त्या कथांवर जाणवत असला; तरी वेगळी शैली, अनुभवांचे वैविध्य, रोचक भाषा यांमुळे त्या स्वतंत्र अंगाच्या, वेगळ्या ढंगाच्या झाल्या . समाजातील व्यथा, वेदना, विसंगती, कारुण्य, स्वार्थ अशा अनेक गोष्टींना गाडगीळांच्या कथालेखनातून नेमकेपणाने स्थान मिळाले .

     ‘लोटांगण’ (१९६१) या त्यांच्या विनोदी लेखनाला १९६१सालचा महाराष्ट्र शासनाचा ‘उत्कृष्ट विनोदी लेखनाचा’ पहिला पुरस्कार ख्यातनाम विनोदी लेखक पु. ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाच्या बरोबरीने विभागून मिळाला. पुढेही त्यांना शासनाची व अन्य संस्थांची पारितोषिके मिळाली. ‘माशाचे अश्रू’ (१९५८), ‘गबाळ ग्रंथ’ (१९६२), ‘चोर आणि मोर’ (१९६७), ‘बंडल’ (१९९१) असे त्यांचे अनेक विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यांची संख्या तीसच्या पुढे आहे. ‘रेखा’, ‘आकार रेषा’ या कथासंग्रहांतूनही गाडगीळ यांची कथालेखनातील स्वतंत्र वाटचाल निदर्शनास येते. विनोदी आणि ललित शैलींतील त्यांचे काही निबंध आणि वृत्तपत्रीय सदरलेखनही प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहे. त्यामध्ये ‘म्यां, माझा बाप आणि ह्येचा बाप’ याचा विशेष उल्लेख करता येईल. ‘विनोद तत्त्वज्ञान’ या ग्रंथातून गाडगिळांनी विनोद या साहित्य प्रकाराचे मूलगामी तत्त्वनिष्ठ आणि या आकृतिबंधाचे श्रेष्ठत्व व वेगळेपण दाखविणारे विवेचन केले . ‘विनोद केवळ हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाही. त्यामागे एक जीवनदृष्टी आहे’, अशी भूमिका घेऊन त्यांनी सर्व अंगांनी विनोद विवेचन केले असून इतर विनोदी साहित्याबद्दल गाडगीळांचा दृष्टिकोन स्वागतशील म्हणावा लागेल . गाडगीळांच्या बहुतेक पुस्तकांना त्या-त्या वेळच्या मान्यवर समीक्षकांच्या आस्वादक प्रस्तावना आहेत. त्यांत वा. ल. कुलकर्णी, म. द. हातकणंगलेकर यांचा समावेश आहे.

     ‘सिगारेट आणि वसंतऋतु’ या वेगळ्या प्रकारच्या प्रवासवर्णनातून अमेरिकेचे खेळकर, प्रसन्न आणि तरीही चिंतनशील दर्शन घडते. ‘दुपारच्या सावल्या’मधून त्यांनी लिहिलेली वेचक व वेधक व्यक्तिचित्रे समोर येतात. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे त्यांनी भूषविली आहेत. प्रा. हातकणंगलेकर यांनी ‘प्रसन्न शैली आणि हृद्य, खुबीदार, निर्विष विनोदबुद्धी’ अशा शब्दांत गाडगीळांबद्दल लिहिले आहे.

- मधू नेने

गाडगीळ, पांडुरंग लक्ष्मण