Skip to main content
x

गांधी, अडी रुस्तुमजी

          डी  रुस्तुमजी गांधी यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांच्या आईचे नाव डॉली होते. त्यांचे वडील रुस्तुमजी  फ्रेण्डस कॅबिननावाच्या उपाहारगृहाचे मालक होते. ते मोठे साहसी होते. आपल्या दोन मित्रांसह सायकलीवरून पन्नास हजार मैलांचा प्रवास करून त्यांनी जग पाहिले होते. त्यांच्या प्रवासवर्णनांची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली होती.

अडी गांधी सर्व खेळांत तरबेज होते व पोहण्यात त्यांचे विशेष प्रावीण्य होते. सैन्याबद्दलच्या आकर्षणापोटीच त्यांनी सी कॅडेट कॉर्पस्या स्वयंसेवी संस्थेच्या कामात  सहभाग घेतला. परंतु ते शाळेच्या शेवटच्या वर्षात असताना वायुसेनेने आपल्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईच्या मरीन ड्राइव्हवरील आकाशात केलेले प्रात्यक्षिक त्यांनी पाहिले आणि त्यांनी वायुसेनेत जायचे ठरविले.

१९६० मध्ये ते सीनियर केंब्रिज ही परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९६१ मध्ये त्यांनी एस.एस.सी.ची परीक्षा झाल्यावर, सेंट झेवियर महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या प्रवेश परीक्षेत त्यांची निवड झाली. अडी हे एकुलते पुत्र असल्यामुळे आईने त्यांना सेनेत जाण्याची परवानगी दिली नाही. सैन्यात जायची एक संधी हुकली; पण मनातली इच्छा कायम होती. घरच्या विरोधाला न जुमानता थेट प्रवेश योजनेतून त्यांनी वायुसेनेत प्रवेश मिळवला.

अलाहाबादच्या वैमानिक प्रशिक्षण आस्थापनेमध्ये (पायलट ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट) नोव्हेंबर १९६२ मध्ये त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. एचटी २ व हावर्ड या विमानांवरचे प्रशिक्षण संपवून ते जोधपूरच्या वायुसेना महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांना टेक्सन विमानावर प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर कर्नाटकातील बिदर येथे व्हॅम्पायर विमानांवर प्रशिक्षण मिळाले.

विविध विमानांवरील प्रशिक्षणांनंतर २८ ऑक्टोबर १९६३ रोजी त्यांना भारतीय वायुसेनेत लढाऊ वैमानिक म्हणून  नियुक्ती मिळाली. त्यानंतर ४१ वर्षांच्या दीर्घ कालावधीत त्यांनी व्हॅम्पायर, हंटर, नॅट, मिग-२१, मिग-२९, मिराज-२००० आणि सुखोई-३० अशा २३ प्रकारच्या विमानांची ५,५००हून अधिक उड्डाणे केली.  दहा विविध स्क्वॉड्रन्समध्ये त्यांनी काम केले.

हलवारा येथे १९६५ च्या लढाईत एका कामगिरीसाठी त्यांनी आपल्या सहकार्‍यासोबत हंटर विमानातून उड्डाण केले. या दोन विमानांवर शत्रूच्या चार एफ-८६ सेबरजेट विमानांनी हल्ला केला. नेतृत्व करणार्‍या वैमानिकाचे विमान शत्रूच्या हल्ल्यात नष्ट झाले. त्यांनी मनोधैर्य शाबूत ठेवून त्या हल्ल्याचे चोख उत्तर दिले व शत्रूचे एक एफ-८६  सेबर विमान खाली पाडले. या धाडसी कामगिरीबद्दल राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्याकडून त्यांना वीरचक्रप्रदान करण्यात आले. हा सन्मान स्वीकारणारे ते सर्वांत कमी वयाचे अधिकारी होते.

त्यांनी अनेक शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले. फायटर कॉम्बॅट लीडर्स कोर्स, ज्युनिअर कमांड, हायर एअर कमांड, सीनियर डिफेन्स मॅनेजमेंट आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स अशा पाठ्यक्रमांत त्यांनी उत्तम यश मिळवले. नायजेरियन वायुसेनेत प्रशिक्षक म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले.

महू  येथील आर्मी कॉलेज ऑफ कॉम्बॅट मध्ये त्यांनी निर्देशक प्रशिक्षकाचा (स्टाफ डायरेक्टिंग एअर) कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ एअर वॉरफेअरचे कमांडंटचे पद भूषविले. पंधराव्या स्क्वॉड्रनचे व चाळीसाव्या विंगचे नेतृत्व केले.

.वायुसेनेच्या मुख्यालयात अ‍ॅडिशनल असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ-ऑपरेशन्स’, ‘असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ-पर्सोनेलअशी महत्त्वाची पदे सुद्धा सांभाळली. वायुसेनेच्या नैऋत्य विभागामध्ये गांधीनगर येथे सीनियर एअर स्टाफ ऑफिसर म्हणून काम केले. मानाचा शिरपेच समजल्या जाणार्‍या वायुसेनेच्या पश्चिम विभागात व नैऋत्य विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणजेच एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफम्हणून त्यांनी मोठ्या कौशल्याने धुरा सांभाळली.

त्यांना वीरचक्र (१९६५), एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफचे प्रशस्तिपत्र (१९७५), चीफ ऑफ एअर स्टाफचे प्रशस्तिपत्र (१९७८), अतिविशिष्ट सेवा पदक (१९९४) व परमविशिष्ट सेवा पदक (२००३) असे सन्मान मिळाले. १९८७ मध्ये महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार व १९९४ मध्ये फेडरेशन ऑफ पारशी अंजुमनने दिलेला कर्नल अडी तारापोर अचीव्हमेंट पुरस्कारही त्यांना मिळाले. डॉ. राधाकृष्णन, शंकर दयाळ शर्मा व डॉ. अब्दुल कलाम ह्या तीन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारण्याचे भाग्य त्यांना लाभले.

- गीतांजली जोशी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].