Skip to main content
x

गायतोंडे, भिकाजी बळवंत

     डॉ.भिकाजी बळवंत गायतोंडे यांचा जन्म भूतपूर्व सावंतवाडी संस्थानातील बांदा या गोव्याच्या सरहद्दीवरील छोट्याशा खेड्यात, एका कनिष्ठ मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण खेड्यात व माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची गणना होती. १९४५ साली त्यांनी जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश केला. पाच वर्षांत तेथील अभ्यासक्रम उत्कृष्ट श्रेणीत पूर्ण केला. त्यानंतर १९५४ साली त्या महाविद्यालयामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे अतिथी प्राध्यापक डॉ. रॉजर लेविस  यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधनासाठी औषधशास्त्र (फार्माकोलॉजी) या विषयाची निवड केली.

     पुढे त्यांना लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन या संस्थेत औषधशास्त्राच्या कार्यपद्धतीत संशोधन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून फेलोशिप मिळाली. तेथे त्यांनी शरीरात हिस्टामिनचा स्राव सुरू होण्यास कारणीभूत ठरणारे पदार्थ (हिस्टॅमिन लिबरेटर्स) आणि त्यांचा चयापचयावर होणारा परिणाम यांचा अभ्यास केला. मार्गदर्शन करणारे प्रा. पॅटन यांच्या शिफारशीमुळे त्यांना जागतिक आरोग्य संघटनेची फिरती फेलोशिप मिळाली. यामुळे त्यांना ब्रुसेल्समधील प्राध्यापक हीमन्स यांची प्रयोगशाळा, स्टॉकहोम येथील कॅरोलिन्सका संस्था, बर्नमधील मलेरिया संशोधन संस्था, पॅरिस विद्यापीठाची अँटिबायोटिक प्रयोगशाळा व रोमची इन्स्टिट्यूट डी सानिटा यांसारख्या नामवंत प्रयोगशाळांना भेटी देता आल्या. याचबरोबर त्यांनी ब्रिटनमधील दुसऱ्या नामवंत संस्थांनाही भेटी दिल्या. यानंतर त्यांना अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर राज्यातील हॅनोव्हर येथील डार्टमाउथ विद्यापीठातील प्राध्यापक हर्बट बोरिसन यांच्याबरोबर संशोधन करण्यासाठी प्रतिष्ठेची ‘रॉकफेलर फाउंडेशन’ शिष्यवृत्ती मिळाली. या ठिकाणी त्यांनी ‘मज्जातंतूंचे औषधशास्त्र’ (न्यूरो फार्माकोलॉजी) यांवर संशोधन केले आणि नंतर अमेरिकेच्या औषधशास्त्र संस्थेच्या वार्षिक सभेपुढे ‘ओकारीचा मूळारंभ’ (मेकॅनिझम ऑफ व्हॉमिटिंग) यावर आपला संशोधनपर प्रबंध सादर केला. याच काळात त्यांनी कॅनडातील मॅकगिल विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापीठाला भेटी देऊन प्रबंध सादर केले.

     भारतात परतल्यावर त्यांची ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ आणि भारतातील इतर अनेक संस्थांचे संशोधन सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. तसेच ‘भारतीय औषधांच्या पद्धती व होमिओपॅथी’ या सेंट्रल ‘कौन्सिल ऑफ रिसर्च’ या संस्थेवर सदस्य म्हणून नेमण्यात आले.

     डॉ. गायतोंडे यांचा औषधशास्त्राच्या उद्योगधंद्यातील अभ्यास व समृद्ध अनुभव लक्षात घेऊन भारत सरकारने नियुक्त केलेले तज्ज्ञ म्हणून ‘हाथी’ समितीवर, अमली पदार्थांसंबंधी अभ्यास करण्यासाठी त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आले. पुढे त्यांची हाफकिन इन्स्टिट्यूटच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.

     पुढे १९७८ साली त्यांची महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेवर संचालकपदी नियुक्ती झाली. या काळात त्यांना राष्ट्रकुल विद्यापीठांची फेलोशिप मिळाली आणि न्यू कॅसल विद्यापीठाचे अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रण मिळाले. तेथे त्यांनी प्रा. जे.डब्ल्यू. थॉम्पसन यांच्याबरोबर ‘मूत्राशयाच्या मज्जातंतूंची संदेशवहन व्यवस्था’ (न्यूरो ट्रान्समिशन ऑफ ब्लॅडर) या विषयावर संशोधन केले आणि त्यावरील संशोधनाचा प्रबंध स्वित्झर्लंडमधील बर्न येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला.

     यानंतर १९७९ साली जागतिक आरोग्य संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार म्हणून आरोग्यासंबंधी अनेक कार्यक्रम आयोजित केले. त्या निमित्ताने त्यांनी दक्षिणपूर्व आशिया, मध्य आशिया, जिनिव्हा, स्कॅण्डेनेव्हिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, केनया, झिंबाब्वे इ. राष्ट्रांत भरलेल्या परिषदेत भाग घेतला.

     त्यांना विज्ञान अकादमी, औषधशास्त्र अकादमी, आंतरराष्ट्रीय औषधशास्त्र अकादमी, न्यूयॉर्क विज्ञान अकादमी व महाराष्ट्र विज्ञान अकादमी यांचे फेलो म्हणून निवडण्यात आले. याशिवाय त्यांनी मराठी विज्ञान महासंघ, अमरावती येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांना प्रतिष्ठेचा डॉ.बी.सी. रॉय पुरस्कारही मिळालेला आहे.

ज. बा. कुलकर्णी

गायतोंडे, भिकाजी बळवंत