Skip to main content
x

गोगटे, माधव गणेश

         माधव गणेश गोगटे यांचा जन्म मुंबई येथे झाला. मुंबर्ई येथील अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १९६४मध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांत बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले. तसेच तारापोरवाला मत्स्यालय मुंबईमधून त्यांनी एम.एस्सी. पूर्ण केले. वडील गणेश गोखले यांना ‘टॅक्सिडर्मी’ ही कला अवगत होती. त्यामुळेच माधव यांनीही लहानपणापासून पक्षी-प्राणी हाताळले होते. वनांबद्दल, पशुपक्ष्यांबद्दल लहानपणापासूनच त्यांना प्रेम होते. १९६४ मध्ये महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या वनविभागाच्या परीक्षेत ते महाराष्ट्रात पहिले आले. १९६६ मध्ये वनसेवा ही अखिल भारतीय सेवा करण्यात आली. १९६८ मध्ये गोगटे यांनी परीक्षा दिली आणि त्यांची भारतीय वनसेवेमध्ये निवड झाली आणि त्यांची महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली. १९६८-६९ या वर्षी ते परिविक्षाधीन अधिकारी म्हणून मेळघाटातील अत्यंत निबिड अशा कोट्टू या ठिकाणी कार्यरत होते. मेळघाटातील जैववैविध्य या काळात त्यांनी अभ्यासले. या अनुभवाचा त्यांना पुढील काळात खूप उपयोग झाला. वने म्हणजे फक्त वृक्षच नाहीत तर वनांसोबत वाढणाऱ्या इतर जीवसृष्टीचेदेखील आपण जतन केले पाहिजे, तरच आपण खऱ्या अर्थाने जैववैविध्य जोपासू शकतो हे तत्त्व गोगटे यांनी वन विभागातील आपल्या कार्यकाळात कसोशीने पाळले.

        १९७२मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी माधव गोगटे यवतमाळमध्ये काम करत होते. या काळात त्यांच्या असे लक्षात आले की, दुष्काळाचा पहिला परिणाम सगळ्यांत आधी वनांतील  चाऱ्यावर होतो. चाऱ्याअभावी दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना आपल्या गायी-गुरे विकावी लागतात, कसायाच्या हवाली करतात. त्यांना त्यामुळेच निसर्गत:च उपलब्ध होणाऱ्या गवती कुरणांचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. या दुष्काळाने त्यांचा वनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी ‘गवती कुरणांचे व्यवस्थापन’ या विषयावर सखोल अभ्यास केला. गवत नैसर्गिकरित्याच वाढू देणे, बी आल्यावरच त्यांची कापणी करणे यांमुळे चांगल्या प्रतीचे गवत नैसर्गिकरित्याच निर्माण होऊ शकते. अशा गवताचे पुनरुत्पादनाच्या दृष्टीने संवर्धन केल्यास आपण दुष्काळातदेखील टिकून राहू शकतो हे गोगटे यांनी संशोधनाने सिद्ध केले. त्याचबरोबर साठवणुकीच्या गवताचे आगीपासून संरक्षण करणे, अतिरिक्त चराईवर नियंत्रण मिळवणे ही कामेदेखील त्यांनी केली.

     १९८० ते १९८४ या कालवधीत गोगटे डेहराडून येथील वन अनुसंधान केंद्रात वानिकिशास्त्राचे (सिल्विकल्चर) संशोधक म्हणून कार्यरत होते. या संशोधनाचा त्यांना नंतरच्या काळात मेळघाट व्याघ्रप्रकल्पात काम करताना खूप उपयोग झाला.

      गवती कुरण व्यवस्थापनाच्या गोगटे यांच्या कामामुळेच १९८६-८७ च्या दुष्काळामध्ये वनविभागाकडून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात चारा वनविभागाकडून उपलब्ध करून देण्यात आला. गोगटे यांच्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारने ‘नॅशनल वेस्टलँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’च्या माध्यमातून ‘नाशिकमधील गवती कुरणांचे व्यवस्थापन : एक यशोगाथा’ (ग्रीनिंग ऑफ ग्रास लँड इन नाशिक : अ सक्सेस स्टोरी) या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी गोगटे नाशिक येथे कार्यरत होते. योगायोग म्हणजे त्याच वेळी त्यांचे सहकारी कारभारी काशिनाथ चव्हाण (काका चव्हाण या नावाने परिचित) यांचा नाशिक येथील सामाजिक वनीकरण विभागात चराऊ-बंदी, कुऱ्हाड-बंदी हा उपक्रम सुरू होता.

      १९८७ ते १९९१ या काळात गोगटे यांची नियुक्ती संचालक व्याघ्रप्रकल्प, मेळघाट या  पदावर करण्यात आली. याकाळात त्यांनी तेथील जैववैविध्य या विषयावर अभ्यास केला. मेळघाटाच्या व्याघ्रप्रकल्पाकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून त्यापूर्वी पाहिले गेले नव्हते. गोगटे यांनी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या पर्यटन व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण काम केले. मेळघाटातील वनस्पतींच्या प्रजाती, पक्षीवैविध्य, स्थानिक कोरकू आदिवासींची जीवनपद्धती या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचा आराखडा तयार केला. तेथे पर्यटनासाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधांची उभारणी केली. मेळघाटात पर्यटक फक्त वाघ पाहायला जायचे. परंतु गोगटे यांनी आपल्या प्रयत्नांतून मेळघाटातील जैववैविध्याकडे पर्यटकांचे लक्ष वेधले. या महत्त्वपूर्ण योगदानामुळे माधव गोगटे यांना १९९२-१९९३ ‘मेरिटोरियस सर्व्हिस फॉर टायगर कॉन्झर्व्हेशन’ हा पुरस्कार देऊन भारत सरकारकडून गौरवण्यात आले.

       १९९१-१९९५ ‘वनसंरक्षक संशोधन’या पदावर पुणे येथे कार्यरत असताना गोगटे यांनी  ‘इकॉलॉजिकल ऑडिट ऑफ टीक प्लँटेशन’ या विषयावर शास्त्रोक्त संशोधन केले. या संशोधनाबद्दल त्यांना वनसंशोधन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ब्रँडिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डेहराडूनच्या वनअनुसंधान केंद्राद्वारे प्रकाशित होणाऱ्या ‘इंडियन फॉरेस्टर’ या मासिकाकडून दिला जातो. या काळात सागाची लागवड करून त्याचे बॉण्ड विकणाऱ्या कंपन्यांचे जाळे महाराष्ट्रभर निर्माण झाले होते. याची सत्यता, त्यातून होणारा नफा यांबाबतही गोगटे यांनी संशोधन केले. या कामाबद्दल त्यांना १९९४ मध्ये ‘इंडियन फॉरेस्टर’ या मासिकाकडून चतुर्वेदी पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.

       ‘मुख्य वनसंरक्षक वन्यजीव’ या पदावर १९९७ ते २००० या काळात गोगटे नागपूर येथे कार्यरत होते. यावेळी महाराष्ट्रातील सर्व अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने यांच्या व्यवस्थापनाचे महत्त्वाचे काम गोगटे यांच्याकडे होते.

       व्याघ्रप्रकल्पातील माधव गोगटे यांच्या महत्त्वपूर्ण कामाबद्दल त्यांना ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या ‘कॅट स्पेशालिस्ट ग्रूप’ चे मानद सभासदत्व १९९२ मध्ये  बहाल करण्यात आले.

        ‘संचालक सामाजिक वनीकरण’ या पदावर ते  २००० ते २००२ पुणे येथे कार्यरत होते. नोव्हेंबर  २००३मध्ये माधव गोगटे मुख्य वनसंरक्षक वन्यजीव या पदावरून नागपूर येथून निवृत्त झाले.

       निवृत्तीनंतर गोगटे यांनी वनसंवर्धन आणि संशोधन या क्षेत्राबद्दल वृत्तपत्रांमधून लिखाण सुरू केले. ‘अ‍ॅग्रोवन’ या वृत्तपत्रामध्ये त्यांनी वृक्षांची ओळख करून देणारी ‘अ‍ॅग्रो फॉरेस्ट्री’ या विषयावरील लेखमालिका वर्षभर चालवली. यामध्ये दर आठवड्याला एका वृक्षप्रकाराची लागवड, संगोपन, उपयोग, त्यातून मिळणारा आर्थिक नफा यांबाबतच्या शास्त्रीय माहितीचे लेखन केले जात असे. २००४ ते २००७ या कालावधीत ते  ‘सेवानिवृत्त वनकर्मचारी संघटनेचे’ अध्यक्ष होते. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पुणे येथे ‘शहरातील वनीकरण’ या विषयावर विविध उपक्रमांचे आयोजन केले. सामान्य माणसांमध्ये वनांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी सातत्याने लिखाण केले. वनांबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन केले. त्यांचे वनव्यवस्थापन आणि संशोधन या विषयावरील तीनशेहून अधिक लेख वृत्तपत्रे, मासिके, संशोधन प्रकल्प यांमधून आजवर प्रकाशित झाले आहेत. वन आणि जैववैविध्याच्या संवर्धनासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण कार्यकाळात महत्त्वपूर्ण संशोधन केले. याबाबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सल्लागार म्हणून ते ओळखले जातात.

       डिसेंबर २००७ मध्ये जपानच्या ‘जॅपनीज बँक फॉर इंटरनॅशनल ऑपरेशन’ या बँकेने ओरिसा सरकारला सहाशे पन्नास कोटी वनव्यवस्थापनासाठी मदत दिली. या प्रकल्पाबाबत ओरिसा सरकारला सल्ला देण्यासाठी, तसेच ओरिसा सरकार हा प्रकल्प  कशा प्रकारे राबवत आहे याचे निरीक्षण करणाऱ्या जपानच्या ‘निप्पोन कोईका’ या आंतरराष्ट्रीय सल्लागार संस्थेचे सल्लागार म्हणून गोगटे यांची नेमणूक झाली.  या प्रकल्पासाठी त्यांनी तीन वर्षे काम केले. सध्या ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत.

- संध्या लिमये

गोगटे, माधव गणेश