Skip to main content
x

गोखले, भूषण नीळकंठ

    भूषण नीळकंठ गोखले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातल्या बालशिक्षण मंदिर आणि भावे शाळा (आताची विमलाबाई गरवारे विद्यालय) येथे झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच वेळी म्हणजे १९६२मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले. या युद्धाचा परिणाम म्हणजे त्या वेळच्या तरुण पिढीतील बहुतेक तरुणांनी सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे ठरवले. भूषण गोखले आणि त्यांचे मोठे बंधू वैभव हेही या पिढीतलेच. त्यातले भूषण गोखले यांनी वायुसेनेत, तर त्यांच्या बंधूंनी भूसेनेत दाखल व्हायचे ठरवले.

     गोखले यांनी १९६४मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) मध्ये प्रवेश घेतला. भारतीय वायुसेनेत ते जून १९६८मध्ये दाखल झाले. लढाऊ विभागामध्ये (फायटर स्ट्रीम) त्यांची नियुक्ती झाली. भारत-पाकिस्तानदरम्यान १९७१मध्ये झालेल्या युद्धात फ्लाइंग ऑफिसर गोखले यांच्याकडे हंटर या लढाऊ विमानाची जबाबदारी होती.

     १९७३ मध्ये भूषण गोखले यांनी फ्लाईंग इन्स्ट्रक्टर अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतरच्या काळात हवाई प्रशिक्षणाचे आणि लढाऊ विमानांचे नेतृत्व करण्याचे कार्य त्यांनी केले. देशाच्या वायुसेनेतील युद्धनीति विकसित करण्याच्या कामी ते रुजू होते. वायुसेनेमार्फत इराक आणि इजिप्त या देशांतही ते कार्यरत होते. इराकमध्ये १९७७ ते १९७९ या कालावधीत ते उड्डाण प्रशिक्षक होते.

     ऐंशीच्या दशकात सोव्हिएट रशिया येथे प्रशिक्षण झाल्यानंतर हलवाडा एअरफोर्स तळावर २२१ स्क्वॉड्रनमध्ये त्यांची मिग २३ विमानावर नियुक्ती झाली. त्याच दरम्यान लायन्स स्क्वॉड्रन ही एकतिसावी स्क्वॉड्रन जोधपूरवरून हलवाडा तळावर दाखल करण्याचा निर्णय वायुसेनेतर्फे घेण्यात आला. विंग कमांडर एम.एस.ग्रेवाल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्यास या स्क्वॉड्रनमध्ये फ्लाइट कमांडर म्हणून गोखले यांची निवड झाली. त्या दोन वर्षांत फायटर पायलट म्हणून अनेक आव्हानात्मक अनुभव त्यांना घेता आले.

     मिग २३ या लढाऊ विमानांची संपूर्ण स्क्वॉड्रन हलवाडा तळावर प्रस्थापित करणे ही अत्यंत अवघड कामगिरी तेव्हा गोखले आणि त्यांच्या संपूर्ण तुकडीवर सोपवण्यात आली होती. यासोबतच रोजची सराव उड्डाणेही या तुकडीवरून करून घेतली जात. शत्रूला बेसावध ठेऊन त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या पहाटेच्या आणि सायंकाळी करण्यात येणाऱ्या हल्ल्यांचे विशेष प्रशिक्षणही त्यांना या काळात लायन्समध्येच मिळाले. १९८४मध्ये त्यांनी सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये, तर १९९१-१९९२मध्ये त्यांनी अमेरिकेतल्या एअर वॉर कॉलेजमध्ये वायुसेनेतील शिक्षण घेतले.

     इजिप्तमध्येही ते काही काळ कार्यरत होते. १९९४ ते १९९८ या काळात इजिप्तमधल भारतीय दुतावासात डिफेन्स अ‍ॅडव्हायझर या पदावर त्यांनी वेळोवेळी काम केले.

     गोखले यांच्या वायुसेनेतील प्रत्यक्ष सहभागात सियाचीन इथल्या आघाडीचाही समावेश आहे. त्यांनी या आघाडीवरील मिग २३ या विमानाच्या स्क्वॉड्रनचे नेतृत्व केले. तसेच १९९९मध्ये झालेल्या कारगिल युद्धादरम्यानही त्यांनी अतिशय महत्त्वाच्या हवाईतळाचे नेतृत्व केले. व्हॅम्पायर, हंटर, किरण मिराज, एल ३९, एल २९, सुखोई ७, जग्वार, सुखोई ३०, यांसारख्या लढाऊ विमानांचे उड्डाण त्यांनी केले आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे लढाऊ आणि प्रशिक्षण विमानांच्या ३५०० तासांच्या उड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.

     याशिवाय वायुसेनेच्या प्रशासकीय कामातही गोखले  यांचे योगदान आहे. डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये डायरेक्टिंग स्टाफ म्हणून, तर वायुसेनेच्या मुख्यालयातल्या एअर स्टाफ इन्स्पेक्शनच्या आयुक्तालयात इनस्पेक्टर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच वायुसेनेच्या प्रमुखांचे वायुदल मार्गदर्शक, ऑपरेशन पराक्रमच्या कालावधीत वायुसेनेच्या प्रमुखांचे साहायक, वायुसेनेतल्या प्रशिक्षणासाठीचे कमांडिंग इन चीफ या पदांवर ते कार्यरत होते. वायुसेनेतील अंतिम टप्प्याच्या कार्यकाळात त्यांनी वायुसेनेच्या मुख्यालयात व्हाईस चीफ (उपप्रमुख) या पदावर १नोव्हेंबर२००६पासून भूषण गोखले यांनी काम केले आणि ३१डिसेंबर२००७ रोजी ते या पदावरून निवृत्त झाले.

     निवृत्तीनंतरही गोखले संरक्षणक्षेत्रासाठी सतत काम करीत आहे. निवृत्तीनंतर संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या (डी.आर.डी.ओ.) सल्लागारपदी त्यांची नेमणूक झाली.

     भूषण गोखले भारत सरकारच्या सेवेत मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषदमध्येही (नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल) ते काम करीत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी ‘परमविशिष्ट सेवा पदक’,‘अतिविशिष्ट सेवा पदक’ आणि ‘वायुसेना पदक’ लाभले आहे. याव्यतिरिक्त १ फेब्रुवारी २००७ रोजी  माननीय राष्ट्रपतींच्या सेवेत ए.डी.सी. या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

     २२ मे २०१० रोजी झालेल्या मंगळूर विमान अपघाताच्या चौकशीसाठी केंद्र सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीचे प्रमुख म्हणून गोखले यांनी काम पाहिले. त्यांनी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणूनही काम पाहिलं. तसेच डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या दोन्ही संस्थांच्या नियामक मंडळावरही (गव्हर्निग काउन्सिल)  काम केले आहे.

- पल्लवी गाडगीळ

रूपाली गोवंडे

गोखले, भूषण नीळकंठ