गोखले, केतन कमलाकर
केतन कमलाकर गोखले यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील केंद्र सरकारच्या रक्षालेखा विभागात (डिफेन्स अकाउंट सर्व्हिस) मध्ये नोकरीला होते. त्यांच्या आईचे नाव कालिंदी होते. नोकरीनिमित्त वडिलांच्या सातत्याने होणार्या बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण विविध ठिकाणी झाले. त्यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण लखनऊ येथे हिंदी माध्यमात झाले. चौथी ते नववीपर्यंतचे शिक्षण अहमदनगरमधील दादा चौधरी विद्यालयात मराठी माध्यमात झाले. तर नववी व दहावीचे शिक्षण त्यांनी १९६० ते ६२ पर्यंत कैरो येथे केले. १९६३ ते ६५ या कालावधीत त्यांनी दिल्लीमधून रामजास महाविद्यालयात शिक्षण घेतले तर १९६४मध्ये पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बी.ई. पूर्ण केले. त्यानंतर वडाळा येथील वीर जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (पूर्वीचे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट) मधून रचना अभियांत्रिकीमध्ये एम.ई. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी वाणिज्य शाखेतील व्यवस्थापन शास्त्रातून पीएच.डी. पूर्ण केले. त्यांनी १९७० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि १९७१ मध्ये त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवेसाठी निवड झाली.
रेल्वे स्टाफ कॉलेज, बडोदा येथील प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती साहाय्यक परिचालक अधीक्षक, माल वाहतूक या पदावर जबलपूर येथे करण्यात आली. भारतीय रेल्वे सेवेमध्ये केतन गोखले यांनी छत्तीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कमर्शिअल, ऑपरेशन्स, सेफ्टी, जनरल मॅनेजमेंट संबंधातील महत्त्वाच्या पदांवर काम केले.
जून १९८२ ते १९८६ या कालावधीत गोखले वडोदरा येथील ‘रेल्वे स्टाफ कॉलेज’मध्ये ऑपरेेशन आणि रिसर्च त्याचबरोबर कमर्शियल मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयासाठी वरिष्ठ व्यवस्थापक पदावरील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत असत. याच काळात ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे अभ्यासक्रम संचालकही होते.
मे १९८६ ते जून १९९१ या कालावधीत केतन गोखले सेंटर फॉर रेल्वे इन्फर्मेशन सिस्टिम्स येथे मुख्य प्रशिक्षण व्यवस्थापक या पदावर कार्यरत होते. रेल्वेमधील अधिकाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान या विषयाचे अद्ययावत प्रशिक्षण देण्याची जबाबदारी गोखले यांच्यावर होती. जून १९९१ ते जून १९९६ या काळात गोखले मुख्य व्यवस्थापक (दळणवळण) या पदावर कार्यरत होते. भारतीय यंत्रणेसाठीचे प्रवासी रेल्वेसेवा व्यवस्थापन (लिंक मॅनेजमेंट, क्रू मॅनेजमेंट) करण्याची जबाबदारी गोखलेंवर होती.
जून १९९६ ते ऑक्टोबर ९७ या कालावधीत गोखले यांनी चीफ ऑपरेशन मॅनेजर या पदावर मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पासाठी काम केले. १९९७ ते २००० या कालावधीत गोखले यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक या पदावर आग्नेय रेल्वे विभागात ओरिसा येथे काम केले. या विभागातील मनुष्यबळ विकास, कर्मचारी संघटना, मार्केटिंग सर्व्हिस अशा सर्वच विभागाच्या व्यवस्थापनाचे काम केले.
१९९९मध्ये ओरिसामध्ये झालेल्या चक्रीवादळात गोखले यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्वाचे कार्य केले. गोखले यांनी अवलंबलेल्या आराखड्याचे (मॉडेल) सर्वत्र कौतुक करण्यात आले. तसेच रेल्वे स्टाफ कॉलेजच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्याचा समावेश करण्यात आला.
मे २००० ते जानेवारी २००५ या कालावधीत गोखले यांची नियुक्ती कोकण रेल्वे महामंडळाच्या संचालक पदावर करण्यात आली. त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, नवीन संकल्पना अमलात आणल्या आणि कोकण रेल्वेला नफ्यात आणले.
गोखले यांनी ‘रोल ऑन रोल ऑफ’ सुविधा या योजनेचे काम हाती घेण्याअगोदर ही योजना पंच्याहत्तर लाख रुपये तोट्यात होती. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोलाड ते मंगलोर या मार्गावरून होणारी ट्रक वाहतूक रेल्वेच्या वॅगन्समधून करण्यात येऊ लागली. यामुळे मालवाहतूक सुलभ झाली व ट्रेनच्या एका फेरीत देशाचे तीन ते पाच लाख लिटर डिझेल वाचले. या योजनेचे यशस्वी नियोजन केल्यामुळे आता कोकण रेल्वेमार्गावर अशा पाच ट्रेन धावत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे.
कोकण रेल्वेमध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी गोखले यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व स्थानकांवरील ठेल्यांचे (स्टॉल्स) ठेके स्थानिकांना, विशेषत: महिला बचतगटांना देण्यात आली. रेल्वेमध्ये हापूस आंब्याच्या विक्रीसाठी स्थानिकांना परवाने देण्यात आले. रेल्वेच्या खानपान सेवेमध्ये स्थानिक पदार्थांचा समावेश करण्यात आला. गोखले यांनी कोकण रेल्वेच्या खानपान सुविधेचे आधुनिक पद्धतीने नियोजन केले. प्रवाशांना प्रथमच छापील ‘मेनू कार्ड’ देण्यात येऊ लागले. खानपान सेवेचे तीन वर्षांसाठी ठेके देण्यात आले. त्यामुळे खानपान ठेकेदारांना कार्यक्षम सेवा देण्याची संधी देण्यात आली. या सुविधांबाबत गोखले स्वत: प्रवाशांशी संवाद साधत असत. कोकण रेल्वेमधील स्वच्छता व्यवस्थेचे श्रेयही गोखले यांनी आखलेल्या योजनेलाच आहे. त्यासाठी त्यांनी चालू गाडीत सफाई सुरू केली. त्याचा ठेकाही खानपान ठेकेदाराला देण्यात आला. गोखले यांनी स्थानकांवर ‘इलेक्ट्रॉनिक डिसप्ले’ सुविधा सुरू केली. प्रवाशांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात असा आदेश गोखले यांनी काढला. त्यामुळे प्रवाशांमध्ये निर्माण होणारा गोंधळ टळला.
रेल्वेमध्ये तसेच प्लॅटफॉर्मवर स्वच्छता असावी यासाठीही गोखले यांनी अनेक उपक्रम अवलंबले. एखाद्या ट्रेनमधून खानपान विभागातील लोकांकडून फलाटावर कचरा फेकला जात असेल तर गस्त विभागातील लोकांकडून ती माहिती तत्काळ पुढील स्थानकावर कळवण्यात येत असे. पुढील स्थानकावर ती ट्रेन थांबवून खानपान कंत्राटदाराकडून तात्काळ दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत असे. फलाटावर थुंकणार्या व्यक्तीस पकडून देणार्याला पन्नास रुपये बक्षिस देण्यात येत असे. स्वच्छ स्थानक स्पर्धा घेतल्या जात असत. टेलिमेडीसिन ही गोखले यांची एक अभिनव योजना होय.
गोखले यांनी कोकण रेल्वेच्या कर्मचार्यांमध्ये संघभावना जागृत केल्यामुळेच ते आपल्या अनेक योजना पूर्ण कार्यक्षमतेने राबवू शकले. कर्मचार्यांमध्ये त्यांनी कोकण रेल्वे महामंडळाप्रत आपलेपणाची भावना निर्माण केली. त्याचबरोबर एक चांगली कार्यसंस्कृती विकसित केली. त्यामुळेच भारतीय रेल्वेचा एक लहानसा भाग असणाऱ्या कोकण रेल्वेला आपले स्वतंत्र वैशिष्ट्य लाभले. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक वाढवण्यासाठी गोखले यांनी भारतीय रेल्वेतील दक्षिण भारतातून उत्तरेकडेे जाणार्या गाड्यांची वाहतूक कोकण रेल्वे मार्गावरून व्हावी यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. फेब्रुवारी २००५ गोखले यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक हे पद स्वीकारले.
१९९०मध्ये स्थापन झालेली कोकण रेल्वे ही कंपनी भारतीय रेल्वेत विलीन करावी असा केंद्राचा आग्रह होता कारण त्यामध्ये ५१% गुंतवणूक केंद्र सरकारने केलेली होती; तर ४९% वाटा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केरळ या राज्यांचा होता. त्यामुळे राज्य सरकारेदेखील ही रेल्वे स्वतंत्र राहावी यासाठी फारशीे राजी नव्हती. त्यावेळी गोखले यांनी पुढाकार घेऊन कोकण रेल्वे कंपनी वेगळी ठेवण्याचे फायदे सर्वांना समजावून दिले. यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांत समन्वय साधला. कोकण रेल्वा ही पुढील पंधरा वर्षे स्वतंत्र रेल्वे म्हणून राहावी यासाठी संमती घेतली. कोकण रेल्वे प्रशासनाने आंतररेल्वे विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक प्रावीण्य मिळवणार्या संघासाठी २००९ पासून के.के.गोखले ट्रॉफी देणे सुरू केले आहे.
कोकणामध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरवर्षी कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होत असते. काही वेळा अपघातही घडत असतात. हे टाळण्यासाठी गोखले यांनी कोकण रेल्वेसाठी पावसाळ्यातील वेगळे वेळापत्रक केले. रेल्वेचा वेग नेहमीपेक्षा कमी करण्यात आला. ज्यामध्ये रेल्वेचा कमाल वेग शंभर कि.मी. ते सत्तर कि.मी. करण्यात आला. अनेक समस्यांना तोंड दिल्यावर अखेरीस त्याला मान्यता मिळाली. अशा प्रकारे पावसाळ्यासाठी वेगळे वेळापत्रक बनवणे, भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच घडत होते. कोकण रेल्वेमार्ग सुरक्षिततेसाठी गोखले यांनी खूप प्रयत्न केले. दरड कोसळणे टाळण्यासाठी गोखले यांनी रेल्वेमार्गावरील सर्व दरडींची स्वत: पाहणी केली. त्यातून शंभर धोकादायक ठिकाणे निश्चित करण्यात आली. एकशे पन्नास कोटी रुपये खर्च करून या ठिकाणांची पुन्हा बांधणी करण्यात आली. रेल्वेमार्गाशेजारच्या दरडींवर खस या गवताची लागवड करण्यात आली. त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रमाण खूपच कमी झाले. जून २००७ मध्ये गोखले कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक या पदावरून निवृत्त झाले.
निवृत्तीनंतर गोखले पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठाचे बांधकाम आणि देखभाल यासाठी एक वर्ष सल्लागार म्हणून काम पाहिले. सध्या ते महाराष्ट्र आणि गोव्यामधील धरणातील गळती नियंत्रणासाठी सल्ला देणे तसेच पाणी व्यवस्थापन या विषयाचे सल्लागार म्हणून काम पाहतात.