Skip to main content
x

गोरे, धोंडिबा बहिर्जी

सातारकर, दादामहाराज

   दादामहाराज सातारकर यांचा जन्म सातारा येथे ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर, शके १७९७ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बहिर्जी रामजी गोरे व आईचे नाव कृष्णाबाई होते. गोरे दाम्पत्याची पहिली चार अपत्ये लवकर गेली. दादामहाराज ऊर्फ धोंडिबा हे त्यांचे पाचवे अपत्य. साताऱ्याजवळील जरंडेश्वर मारुतीचा धोंडिबा हा कृपाप्रसाद होता. त्यामुळे स्वाभाविकपणेच ते आई-वडिलांचे विशेष लाडके होते. दादामहाराज १३-१४ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले व प्रपंचाचा सारा भार दादामहाराजांवर येऊन पडला. वडिलांनी लहानपणीच व्यायामाची उत्तम आवड लावल्यामुळे दादामहाराजांची प्रकृती एकदम धष्टपुष्ट होती, तर मातु:श्री कृष्णाबाई यांनी त्यांच्या बालपणापासूनच धार्मिक संस्कार केलेले होते. जरंडेश्वर मारुतीच्या कृपाप्रसादाने लाभलेला जन्म आणि आई-वडिलांचे उत्तम संस्कार यांमुळे प्रारंभापासूनच दादामहाराज इतरांपेक्षा वेगळे होते. पोरकेपणाच्या काळात मारुतीरायाच्या भक्तीने दादामहाराजांना आंतरिक बळ प्राप्त झाले. नामभक्तीच्या वाटेने त्यांचा प्रवास सुरू झाला. याच काळात त्यांची हिंदू तत्त्वज्ञानाचे थोर व्यासंगी अभ्यासक तात्या सप्रे यांच्याशी भेट झाली. दादामहाराजांच्या मनातील अनंत शंका, प्रश्न यांची सप्रे यांनी अत्यंत समर्पक उत्तरे देऊन दादामहाराजांच्या मनाचे समाधान केले.

प्रारंभीच्या काळात उपेक्षेचे-अपमानाचे अनेक प्रसंग दादामहाराजांच्या जीवनात आले; पण त्यांची दृष्टी असल्या क्षुल्लक, क्षुद्र गोष्टींनी उदास व दु:खी होणारी नव्हती, तर व्यापक व उदात्त होती, म्हणूनच त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात मोठी प्रगती साधली. त्यांच्या गल्लीत पंढरीची नियमितपणे वारी करणारे, काका वाणी नावाचे निष्ठावान वारकरी राहत होते. अदृष्टातील योजनेप्रमाणे दादामहाराजांचे काका वाणी यांच्याशी जवळिकीचे नाते निर्माण झाले. या काका वाणी यांच्यासमवेत दादांनी पहिल्यांदाच पंढरीची वारी केली. तेव्हा त्यांचे वय अवघे एकोणीस वर्षांचे होते. ही गोष्टच दादांच्या जीवनाला एक नवे वळण, नवे ध्येय व नवे क्षेत्र देणारी ठरली. पंढरपूरला तेथील थोर फडकरी ह.भ.प.वासकर महाराज यांच्याकडून दादामहाराजांनी तुळशीची माळ घातली व वारकरी संप्रदायाच्या भक्तिप्रेमाचा अनुग्रह प्राप्त करून घेतला. ‘रामकृष्णहरी’ मंत्राचा जप करीत दादामहाराज विठ्ठलभक्तीने रंगून गेले. आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या दर्शनाला ते गेले आणि त्यांना दृष्टान्त झाला. ज्ञानेश्वरी उपासनेची आज्ञा झाली. येथून त्यांच्या ज्ञानेश्वरी, हरिपाठ, ज्ञानदेवांची गाथा, तुकोबांची गाथा, एकनाथ महाराजांचे भागवत असा अखंड स्वाध्याय यज्ञ सुरू झाला. त्यांना ईश्वरी देणगीच प्राप्त असल्याने अल्पकाळातच त्यांचे या संतवाङ्मयावर विलक्षण प्रभुत्व निर्माण झाले. या व्यासंगालाच अंतरंग अनुभवाची व स्वतंत्र चिंतनाची बैठक मिळाली आणि दादामहाराज अल्पावधीतच महाराष्ट्रातील एक थोर निरूपणकार म्हणून प्रसिद्ध झाले. लहानपणी सर्व जण धोंडिबा म्हणत; पण तात्या सप्रे यांनी त्यांना ‘दादा’ असे नाव ठेवले. ‘दादा’ ते ‘दादामहाराज’ हा त्यांचा प्रवास खरोखरीच थक्क करणारा आहे. ईश्वरीकृपेची ती एक लीलाच होती. त्यांचे कीर्तन म्हणजे भक्तिरसाची मेजवानीच असे. लोक देहभान विसरून हरिरूप होत. विठ्ठलाच्या-माउलीच्या प्रेमबोधाचे ते असे अमृतपान घडवीत, की श्रोते धन्य होत. दादामहाराजांना आणखी एका थोर सत्पुरुषाचा सहवास व कृपाप्रसाद लाभला, ते म्हणजे कृष्णा महाराज गारवडेकर यांचा. कृष्णा महाराजांनीच दादामहाराजांचा उल्लेख, त्यांचा नेमका अधिकार लक्षात घेऊन ‘सद्गुरू दादामहाराज’ असा केला.

पुढे दादामहाराज हजारो वारकऱ्यांचे, अनुयायांचे सद्गुरू झाले. त्यांनी डॉ. भा.प.बहिरट व गो.शं.राहिरकर यांच्यासारख्या अभ्यासू, व्यासंगी लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिली व त्यांच्या सहकार्याने ‘प्रेमबोध’ नावाचे मासिक चालविले. संतांच्या प्रेमबोधाचा सर्वदूर प्रचार, प्रसार केला.

मुंबईतील सुशिक्षित समाजाला दादामहाराजांनी वारीची गोडी लावली. प्रारंभी, काही काळ उच्चवर्णाभिमानी तथाकथित विद्वानांचा दादामहाराजांच्या प्रवचन-कीर्तनास उच्च-नीचतेच्या क्षुद्र भेदापोटी विरोध होता. त्या काळात दादांना खूप मनस्तापही झाला. पण खुद्द शंकराचार्यांनीच दादामहाराज यांना प्रशस्ती दिली आणि दादामहाराजांच्या ठायी वसलेल्या निस्सीम भक्तीचा विजय झाला. शंकराचार्यांची प्रशस्ती म्हणजे सर्वोच्च पीठाची राजमान्यताच. यानंतर दादामहाराजांच्या कार्याने कर्तृत्वाचे शिखर गाठले. त्यांनी १९१५ पासून स्वतंत्र दिंडी पंढरपूरला नेण्यास प्रारंभ केला. त्यांनी १९२७ साली पंढरपूर येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे मंदिर बांधले.

दादामहाराजांच्या पायाला १९४६ साली जखम झाली. मधुमेहाचा आजार असल्याने ती जखम चिघळत जाऊन मोठे दुखणे निर्माण झाले. अशा अवस्थेतही त्यांनी पांडुरंगी दृढभाव ठेवून पंढरीची वारी केली, आळंदीची वारी केली आणि अखेर ऋषी पंचमीला जन्मास आलेला देह त्यांनी गीता जयंतीच्या दिवशी मुंबईत ईश्वरचरणी अर्पण केला. दुसऱ्या दिवशी, ६ डिसेंबर १९४६ रोजी श्री क्षेत्र आळंदी येथे नियोजित जागी, गोपाळपूर भागात सध्या समाधी मंदिर असलेल्या जागी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

दादामहाराज यांचा गृहस्थाश्रम हा धन्य होता. त्यांना चार मुले व एक मुलगी होती. उभ्या महाराष्ट्राला  सुपरिचित असलेले ह.भ.प.बाबामहाराज सातारकर हे दादामहाराजांचे नातू आहेत.

विद्याधर ताठे

गोरे, धोंडिबा बहिर्जी