Skip to main content
x

गोवेकर, लक्ष्मण नारायण

अप्पा गोवेकर

      प्पांचे वडील नारायणराव गोवेकर आणि आई लक्ष्मीबाई. नारायणराव गोवेकर विल्सन विद्यालयाचे हुषार विद्यार्थी, अध्ययन-अध्यापन कुशल असे हुशार शिक्षक. नारायणरावांना मासिक ४५ रुपये प्राप्ती होती. त्यातील २० रुपये अपंग, अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च होत. त्यामुळे ठराविक रकमेत संसारगाडा ओढण्याची कसरत अप्पांच्या आईला करावी लागे. भावंडात अप्पा मोठे. साहजिकच नारायणरावांचे अप्पांवर विशेष लक्ष आणि मुलाने शिकून मोठे व्हावे यासाठी ते नेहमी दक्ष असत. सूरकाठी, पोहणं, लंगडी, हुतुतू, शिंपड्याचा खेळ, पतंग उडवणे यातंच अप्पा रमत. पण अशा खेळांमुळे निर्माण झालेला चिवटपणा, चपळाई गोवेकरांना आयुष्यभर पुरली. सायकलस्वारी आणि पोहणे हे लाडके छंद होते. 

     सावंतवाडी संस्थापनाच्या बापूसाहेब महाराजांनी १९३१ ते ३५ या काळात भरविलेल्या पोहण्याच्या स्पर्धेत अप्पा पहिल्या, दुसर्‍या नंबराने विजयी झाले होते. अशा या हुड मुलाला सरळ करण्यासाठी नारायणरावांसारख्या शिक्षकाने त्यांना अडनाड नावाच्या मास्तरांच्या हवाली केले. त्याकाळी छडीची शान शाळेत मोठ्या प्रमाणावर मानण्यात येईल. अडनाड तर त्याचसाठी प्रसिद्ध होते. मास्तरांची वाणी आणि शिकवणी न रुचल्याने अप्पांनी शाळेला रामराम ठोकला.

     पुढे १९३० मध्ये केवळ दोन महिन्यांच्या तयारीवर इंग्रजी २ इयत्तांचा अभ्यास पूर्ण करून वयाच्या १२ व्या वर्षी अप्पा व्ह. फा. परीक्षा उत्तीर्ण झाले. मधल्या काळात १९२८ मध्ये अप्पांचे वडील नारायणराव यांचे अपघाती निधन झाले. १९२८-३० हा काळ अतिशय कसोटीचा होता. वडील बंधू असल्याने सार्‍या कुटुंबाची जबाबदारी एकट्या अप्पांवर येऊन पडली. धाकटे दोन बंधू, पाच बहिणी यांच्या शिक्षणाची, लग्नाची जबाबदारी, पोटापाण्याचा प्रश्‍न अचानक भेडसावू लागला. अप्पांचे लग्न १९३९ मध्ये उषादेवींशी झाले. अप्पांच्या स्वभावातला करारीपणा, समाजाविषयची ओढ, नवनवीन वेड घेण्याचा ध्यास उषादेवींनी जाणला नि प्रपंचातही त्या खर्‍या अर्थाने अप्पांच्या अर्धांगी झाल्या.

     अर्थाजनासाठी नोकरी करणे क्रमप्राप्त होते, त्यामुळे वयाच्या १५ व्या वर्षी गोवेकरांनी शिक्षक म्हणून प्रवेश केला. याच दरम्यान नाटकवेडाने अप्पांना पछाडले. एक काळ असा होता की प्रॉम्पटरपासून, लाईट बॉय, अभिनेता, दिग्दर्शक या सर्व भूमिकांमधून गोवेकरांनी प्रवास केला आणि त्या काळात नाटक हेच जीवन क्षेत्र असंही त्यांना वाटत असे. १९४५ मध्ये सावंतवाडी प्रजापरिषदेची रितसर स्थापना झाल्यावर आंदोलनाचे कार्यवाह म्हणून त्यांनी दीड-दोन वर्ष ७५ रुपये वेतन घेऊनही काम केले. संस्थान विलीनीकरणाच्या आंदोलनात घराची पर्वा न करता गोवेकरांनी स्वतःला झोकून दिले. १९३३ मध्ये शिक्षक म्हणून अप्पांनी संस्थानच्या नोकरीत प्रवेश केला. ही नोकरी अप्पांनी अतिशय निष्ठेने १० वर्षे केली. कोणत्याही विद्यार्थ्यांवर न ओरडता, मारता प्रथम तो विद्यार्थी मागे का पडतोय, याचा मुळातून छडा लावण्याचा अप्पा प्रयत्न करीत. त्यांना समजावून घेत. याच काळात अप्पांनी बांद्यात हरिजन मुलांसाठी रात्रीचे वर्ग चालविले.

     १९४० मध्ये कुणा एका इंग्रजी नियतकालिकांतील ‘पोस्ट कार्डावर ४२०० शब्दांचे अक्षरांकन’ हा मथळा नजरेस आला नि गोवेकर इरेस पडले. प्रयत्नांति गोवेकरांना ६००० शब्द अंकित करण्यास यश मिळाले. ‘पोस्टकार्डाचा ब्लॉक’ बनविण्याचा खर्च खूप असल्याने गोवेकरांनी ब्लॉक करुन वृत्तपत्रांना पाठविला नाही. नाहीतर हा विक्रम ‘गिनिज बुक’ मध्ये नोंद होऊ शकेल एवढा मोठा होता. साध्या बातमी स्वरूपात प्रसिद्धी मिळाली.

     १९४३ मध्ये शिक्षक या नोकरीचा अप्पांनी राजीनामा दिला व १९४८ मध्ये सहज आवड म्हणून, व्यवसाय म्हणूनही वर्तमानाकडे वळले ते अगदी ७८ सालापर्यंत १७-१८ वृत्तपत्रांचे अधिकृत बातमीदार बनले. सकाळ, लोकसत्ता, लोकमान्य यांचे ते खास बातमीदार होते. सकाळकार परुळेकरांकडून पत्रकारितेतल्या अनेक खुबी शिकून घेतल्या.

     १९४८ नंतर शिकवणे, हस्ताक्षर सुधारणा वर्ग हे अप्पांचे छंद, ध्येय झाले नि पत्रकारिता हा व्यवसाय झाला. त्यांचे पुत्र विकास गोवेकर याने वडिलांची हस्ताक्षर सुधार प्रचार मोहिम चालू ठेवली आहे. या सर्व व्यवसाय नि वेडांमध्ये बालपणापासून सुंदर, टपोरं, शुद्ध अक्षर गोवेकरांनी आपलं जीवनधनच मानले.

      गोवेकरांचे अक्षर नेहमीच कौतुकाचा विषय ठरलेले आहे. दफ्तरमधील हस्ताक्षर, मुलाखत मागणार्‍या पत्रातील हस्ताक्षर, पोस्ट कार्डावरील अक्षर, अभिप्राय, शेरे यासाठी लिहिल्या ओळी अनेकदा मशिनवर टंकलिखित केले आहे असे वाटावे इतकी सुबक, नीटनेटके सारखे असे. अनेकांची पत्रे, लग्न पत्रिका, स्मरणिका गोवेकर स्वहस्ते लिहून देत.

      हस्ताक्षर सुधार मोहिम ही गोवेकरांच्या अनेक लहान मोठ्या कार्यातील महत्त्वाचे कार्य होय. हस्ताक्षर सुधार मोहिमेचे मोठे क्षेत्र म्हणजे शालेय जगत् हे गोवेकरांनी हेरले. त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना याचे महत्त्व पटविणारी पत्रे लिहिणे, मग शाळेत व्याखान ठरविणे नि त्या व्याख्यानासाठी ग्रामीण भागात चार मैल चालून जाणे हे सारे अप्पा हस्ताक्षर सुधारणा आणि त्याबाबत ग्रामीण शाळेतील प्रसार यांसाठी करत. गोवेकरांनी सावंतवाडी परिसरातील खेडी पालथी घातली तसे मुंबई-पुण्याचे दौरेही केले. त्यांनी मुंबईत डी.एड्., बी.एड्. महाविद्यालयात अक्षर सुधारण्याचे महत्त्व व्याख्यानांद्वारे पटवून दिले.

     गोवेकर आपल्या हस्ताक्षर सुधार व्याख्यानांमध्ये हस्ताक्षरात सौंदर्य नि गती यांचे महत्त्व प्रात्यक्षिकांच्या आधारे पटवून देत. आपली देवनागरी लिपी, तिची उभी-आडवी मांडणी, तिचे अवयव, लिखाणाचे साहित्य, प्रकार, अक्षरातील समानता, आकार, शीर्षरेषा, टिंब यांचे महत्त्व व लिखाणाच्या पद्धती समजावून देत. स्वच्छ, नीटनेटक्या अक्षराबरोबर त्याच्या शुद्धतेबाबतही गोवेकरांचा कटाक्ष असे.

     नामजोशी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री असताना तसेच शिक्षणखात्याचे उप संचालक चिपळूणकर यांच्याकडे गोवेकरांनी अक्षर सुधार मोहिम शासनाकडून राबविली जावी म्हणून आग्रह धरला.

     वयाच्या ६० व्या वर्षी खर्‍या अर्थाने सुरुवात केलेल्या या मोहिमेसाठी अप्पा २० वर्ष अविरत झटले. ८०० हून अधिक व्याख्याने त्यांनी दिली. अप्पा गोवेकरांच्या कार्याचा गौरव शासनलेखी झाला नसला तरी प्राचार्य चिंतामणराव सहस्रबुद्धे यांचेकडून त्यांना ‘हस्ताक्षर महर्षी’ हे बिरुद लाभलं. कोल्हापूरच्या गोविंदराव कोरगावर न्यासाकडून शाबासकी बरोबरच आर्थिक मदतही मिळाली. पुणे पत्रकार परिषदेपुढे १९८३ मध्ये दिलेल्या व्याख्यानामुळे इंग्रजी, हिंदी दैनिकातून छायाचित्रांसह प्रसिद्धी देखील अप्पांनी अनुभवली.

- प्राची परांजपे

गोवेकर, लक्ष्मण नारायण