Skip to main content
x

ग्रामोपाध्ये, गंगाधर बळवंत

     प्राचीन आणि आधुनिक मराठी साहित्याचे अध्यापक ही डॉ. गंगाधर बळवंत ग्रामोपाध्ये यांची ओळख म्हणता येईल. मूळचे अक्कलकोटचे असलेल्या ग्रामोपाध्ये यांनी लिंगराज महाविद्यालय, बेळगाव; खालसा महाविद्यालय, मुंबई व विल्सन महाविद्यालय, मुंबई येथे दीर्घकाळ मराठीचे अध्यापन केले. त्यानंतर ते गोव्यात पदव्युत्तर अभ्यास केंद्राचे मराठी विभाग प्रमुख म्हणून रुजू झाले. गोव्यातील मराठी भाषेच्या कार्याला त्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले.

     ‘सत्यकथा’ आणि ‘यशवंत’ या नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले. नवकाव्याविषयी त्यांना आस्था होती. य.द.भावे यांच्या ‘आर्द्रा’ या कवितासंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेतून नवकवितेविषयी त्यांची आस्था प्रकट झाली.

     डॉ.ग्रामोपाध्ये हे कवीही होते. ‘निळावंती’ हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. वर्तमान समाजाचे भान आणि शाश्वत मूल्यांचा आग्रह ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्ये असल्याचे जाणकारांनी नोंदवून ठेवलेले आहेत. 

     ‘संतकाव्य समालोचन’ (१९३९), ‘वाङ्मयमूल्ये आणि जीवनमूल्ये’ (१९५०), ‘निळावंती’ (काव्यसंग्रह, १९५४), ‘भाषाविचार आणि मराठी भाषा’ (१९६४), ‘वाङ्मय विचार’ (१९६८), ‘मराठी आख्यानक कविता’ (१९७०), इत्यादी, महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली असून ‘मराठी बखर गद्य’ (१९५८), ‘एका पिढीचे आत्मकथन’ (सहकार्याने १९७५), ‘इ.स. १६८० ते १८१८ या वाङ्मयीन कालखंडाचा अभ्यास’ (१९६८) ही महत्वपूर्ण संपादने आहेत. त्यांची ग्रंथसंपदा अभ्यासकांना आजही उपयुक्त ठरते.

आयुष्याच्या उत्तरार्धात ते गोव्यात स्थायिक झाले. तेथेच त्यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले.

- नरेंद्र बोडके

ग्रामोपाध्ये, गंगाधर बळवंत