गुणे, गंगाधरशास्त्री गोपाळ
गंगाधर गोपाळ गुणे उर्फ शास्त्रीबुवा गुणे हे केवळ अहमदनगर येथील आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थापक होते. तसेच देशातील एक निष्णात वैद्य ‘आफाली’ या औषधनिर्मितीत देशात मोठे नाव झालेल्या कारखान्याचे संस्थापक, नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष तसेच अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व सनातन धर्म सभा अशा संस्थांचे पदाधिकारी म्हणून सर्वपरिचित होते. शास्त्रीबुवांचा जन्म आश्वी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथील इतिहास प्रसिद्ध परंतु बेताची, परिस्थिती असणाऱ्या गुणे घराण्यामध्ये झाला. शिक्षण आश्वी, बडोदे, कोल्हापूर व पुणे येथे नातलगांच्या मदतीने झाले. पुण्यात वेदशास्त्रसंपन्न वाकणकर शास्त्री यांच्या घरी राहून त्यांनी संपूर्ण आयुर्वेद ग्रंथ व वैद्यक शास्त्राचे (सन १८९८-१९०५) शिक्षण घेतले. याच काळात अॅलोपॅथी, होमिओपॅथी व बाराक्षार पद्धतींचाही तौलनिक अभ्यास केला. सन १९०६ मध्ये नगरला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. सतत ४५ वर्षे भूतदयेने व सेवाभावाने सार्या महाराष्ट्रातील रुग्णांची सेवा केली.
जुन्या आयुर्वेदाचे अभिमानी असले तरी नवीन पद्धतीच्या शरीरशास्त्र, शल्यशास्त्र वगैरेची जोड जुन्या वैद्यकीय पद्धतीस देण्याची आवश्यकता त्यांना पटल्यामुळे आर्यांग्ल वैद्यकीय ज्ञान देणे हे त्यांचे ध्येय ठरले होते. याच ध्येयानुसार त्यांनी नगर येथे सन १९१७ मध्ये आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना केली व पुढे ३४ वर्षे त्याच्या विकास व विस्तारासाठी ते प्रयत्नशील राहिले. या महाविद्यालयाने देशास हजारो वैद्य पुरविले व लाखो रुग्णांवर उपचार केले. शास्रीबुवा हे राष्ट्रीय वृत्तीचे होते. सन १९२१ मध्ये असहकार चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. आयुर्वेद प्रसाराच्या बाबतीतील त्यांचे प्रगमनशील धोरण महात्मा गांधी व काँग्रेस सरकार यांना पटल्यामुळे शास्त्रीबुवांनी स्थापन केलेल्या संस्थांना सरकारी साहाय्य मिळाले व कस्तुरबा स्मारक निधीच्या कौन्सिलवर त्यांची नेमणूक झाली होती. असंख्य वैद्यक परिषदांमध्ये त्यांनी आयुर्वेदाबद्दल विद्वत्तापूर्ण व्याख्याने दिली होती.
त्या काळात त्यांनी ‘भिषग्विलास’ हे आयुर्वेदशास्त्राला वाहिलेले मासिक संपादित करून महाराष्ट्रात या शास्त्राचा पाया घालण्याचे ऐतिहासिक काम केले. आपल्या निवडक शिष्यांना एकत्र करून सन १९२४ मध्ये ‘आयुर्वेद सेवा संघा’(आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ) ची स्थापना केली. त्याचबरोबर रुग्णांना खात्रीची व गुणकारी औषधे मिळावीत म्हणून ‘आयुर्वेदाश्रम फार्मसी’ सुरू केली. “औषधी गुणधर्मशास्र” नामक ५ खंडांचा ग्रंथ लिहिला. ‘आयुर्वेदीय चिकित्सा प्रबोध बोध’ नावाचा बृहद्ग्रंथही प्रसिद्ध केला. त्यांचे हे ग्रंथ म्हणजे आयुर्वेद वाङ्मयाचे सारच आहेत. सदर कार्यासाठी त्यांना शंकराचार्य कुर्तकोटी यांनी ‘वैद्य पंचानन’ ही पदवी दिली. प्रांतिक वैद्य संमेलनाचे अनेक वर्षे व अखिल भारतीय वैद्य मंडळाचे १९३७ मध्ये अध्यक्ष होते. बोर्ड ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसीन या शासकीय समितीचे सभासद होते. तसेच ‘फॅकल्टी ऑफ आयुर्वेद अॅण्ड तिब्बी सिस्टीम ऑफ मेडिसीन’ या समितीवरही शासनाने त्यांची नेमणूक केली होती.
सन १९५१ च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्याच्या बी.जे.(वैद्यकीय महाविद्यालया)मध्ये त्यांच्या पाच व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. ही व्याख्यानमाला संपल्यावर पुणे मुक्कामी त्यांचे निधन झाले. आयुर्वेदाचा उत्कर्ष हेच त्यांचे एकमेव उदात्त जीवन कार्य होते. ते ध्येय त्यांनी अखंड व निरलसपणे पार पाडले.