Skip to main content
x

जिचकार, श्रीकांत रामचंद्र

       श्रीकांत रामचंद्र जिचकारांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील आजानगाव येथे झाला. सुलोचना व रामचंद्र तुकाराम जिचकार हे त्यांचे आईवडील होत. श्रीकांत यांनी प्रथम एम.बी.बी.एस. ही पदवी घेतली. डॉ. श्रीकांत जिचकार एम.बी.बी.एस., एम.डी. तर होतेच, शिवाय हे करत असतानाच त्यांनी अनेक पदव्या संपादन केलेल्या होत्या. त्यांच्या नावापुढच्या एम.बी.बी.एस., एम.डी., एलएल.बी., एलएल.एम., डी.बी.एम., एम. बी.ए., बी.जे., एम. ए. (लोक प्रशासन), एम. ए. (समाजशास्त्र), एम. ए. (अर्थशास्त्र), एम. ए. (संस्कृत), एम. ए. (प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुराणवस्तुशास्त्र), एम. ए. (मानसशास्त्र) डी. लिट्. (संस्कृत) या पदव्यांनी तर नवा ज्ञानोपासनेचा व पदवी संपादनाचा इतिहास घडवला होता. हा इतिहास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला होता. आपणही ‘दुसरा श्रीकांत जिचकार’ व्हावे, असे शैक्षणिक स्वप्न अनेक तरुण पाहत होते.

     तरुणाईचा आदर्श ठरलेल्या डॉ. श्रीकांत जिचकारांनी इ.स. १९७२ ते १९९० ह्या कालावधीत विद्यापीठ पातळीवरच्या बेचाळीस परीक्षा दिल्या होत्या. शैक्षणिक वर्षातली उन्हाळी असो वा हिवाळी कोणतीही परीक्षा त्यांनी सोडली नव्हती आणि वाया जाऊ दिली नव्हती. त्यातल्या बहुतेक परीक्षांमध्ये तेच सर्वप्रथम आले होते आणि तब्बल अठ्ठावीस सुवर्णपदकांचे मानकरी ठरले होते. एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नव्हते. इ.स. १९७८ मध्ये भारतीय पोलीस सेवा परीक्षा आणि इ.स. १९८० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षासुद्धा ते उत्तीर्ण झाले होते.

     शिक्षणात अग्रेसर ठरलेले डॉ. जिचकार राजकारणातही मागे नव्हते. शिक्षणातला विधायकतेचा धागा त्यांना राजकारणातही सापडला होता. शिक्षणात जुळलेला त्यांचा सूर त्यांना राजकारणातही जुळवायचा होता. इ.स. १९७७ मध्ये ते नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. इ.स. १९८० मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. इ.स. १९८५ पर्यंतची त्यांची ही कारकीर्द प्रचंड लोकाभिमुख व लोकप्रिय ठरली होती. एकाच वेळी चौदा खात्यांचा कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता. इ.स. १९८६ ते इ.स. १९९२ ह्या कालखंडात महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार होते.

      इ.स. १९९२ ते इ.स. १९९८ ह्या कालखंडात ते राज्यसभेत खासदार म्हणून चमकले. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध समित्यांचा कार्यभार त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळला. अर्थ, शोध संपदा, विविध स्रोत, कर, पाटबंधारे, दळणवळण ह्या संबंधीच्या शासकीय समित्यांवर स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. इ.स. १९९९ व इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तरीही काँग्रेस पक्षाचा एक मोठा उच्चविद्याविभूषित नेता म्हणून जनमानसात त्यांची प्रतिमा उज्ज्वल होती.

     त्यांची ही सिद्धता त्यांच्या अभिरूचीच्या विविध क्षेत्रांमधून व्यक्त होत होती. राजकारणात रमणारे डॉ. जिचकार चित्रकला, छायाचित्रण, वाचन, प्रवास, व्याख्यान ह्यातही तेवढाच रस घेत. अर्थशास्त्र आणि अध्यात्म ह्या विषयांवरच्या त्यांच्या विद्वत्तापूर्ण आणि रसाळ व्याख्यानांना होणारी गर्दी अचंब्यात टाकणारी असे. भारतीय संस्कृती, हिंदू संस्कार, फलज्योतिष ह्या विषयांचे गाढे अभ्यासक असाही डॉ. जिचकारांचा लौकिक होता. ह्या लौकिकाचा प्रारंभही त्यांच्या विद्यार्थी दशेतूनच झालेला होता. प्रारंभीच्या काळात ते स्वामी चिन्मयानंदांच्या कार्याशी जोडले गेले. चिन्मय युवा केंद्राचा अध्यक्ष या नात्याने डॉ. जिचकारांनी भारतभर प्रवास करून ही केंद्रे गावोगावी स्थापन करण्यासाठी अथक प्रयत्न केले. नंतर ते स्वामी दयानंदाच्या कार्याशी जोडले गेले. डॉ. जिचकारांच्या कार्याला विशिष्ट क्षेत्राचे कुंपण नव्हतेच. दुर्गम भागातल्या आदिवासींना सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राष्ट्रीय समन्वयकाची भूमिका डॉ. जिचकारांनी तेवढ्याच जबाबदारीने पार पाडली. यांच्या या कार्यामुळे कांची पीठाचे शंकराचार्यही स्तिमित झाले होते. या शंकराचार्यांनी पीठारोहण सुवर्ण महोत्सवानिमित्त डॉ. जिचकरांचा विशेष गौरव केला होता. श्री श्री  रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ ह्या उपक्रमात तर डॉ. जिचकारांनी स्वत:ला झोकून दिले होते. १९९२ मध्ये डॉ. जिचकारांची नियुक्ती महाराष्ट्रातल्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेकच्या कुलगुरू निवड समितीवर सदस्य म्हणून झाली. इ.स. १९९३ मध्ये ते या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू झाले. कारण त्यावेळी या पदासाठी डॉ. श्रीकांत जिचकार हा एकमेव पर्याय समितीला मान्य ठरला होता. वेदान्त हा तर डॉ. जिचकारांच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. वेदान्ताच्या अभ्यासकांसाठी डॉ. जिचकारांनी नागपूरजवळ ४०० एकरांच्या परिसरात ‘आर्ष विज्ञान गुरुकुलम्’ ची उभारणीसुद्धा सुरू केली होती. वेदांच्या सर्व शाखांचे जतन व्हावे, वेद सर्वसामान्यापर्यंत पोहोचावेत ही डॉ. जिचकारांची तळमळ होती.

     ते अग्निहोत्रीसुद्धा होते. तीन पवित्र यज्ञांचे त्यांनी केलेले आयोजन हा अनेकांच्या चर्चेचा आणि बातम्यांचा ठळक विषय ठरला होता. युनो, युनेस्कोच्या प्रतिनिधी मंडळांवरही भारताचे प्रतिनिधी म्हणून डॉ. जिचकारांचे कार्य सगळ्या जगाला ज्ञात होते. डॉ. जिचकार नागपूर टाईम्स, नागपूर पत्रिका ह्या वृत्तपत्रांच्या ‘नव समाज लिमिटेड’ ह्या प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या ह्या सगळ्या कार्यांना त्यांच्या ज्ञानव्रताचे भरभक्कम अधिष्ठान लाभलेले होते. त्यांच्या ज्ञानव्रताला त्यांच्या स्वत:च्या ५२००० ग्रंथांच्या समृद्ध ग्रंथालयाची पवित्र जोड होती. नागपूरजवळ कार अपघातात डॉ. जिचकारांचे निधन झालं.

- संतोष मोतीराम मुळावकर

जिचकार, श्रीकांत रामचंद्र