Skip to main content
x

जोशी, मालती वामन

     मालती वामन जोशी यांचा जन्म कवठे एकंद या गावी झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. घरी आई आजारी होती. मालूताईंसह पाच बहिणी आणि एक भाऊ होता. परिस्थिती गरिबीची होती. वडीलबहिणी पुण्याच्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षणासाठी गेल्याने मालूताईंनी आईच्या सेवेस स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या सोबत त्यांची धाकटी बहीण सुधा आणि भाऊ बबन होता. कर्वे शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मोठ्या बहिणींची लग्ने झाली. आईच्या मृत्यूनंतर मालूताईंनी त्याच संस्थेत जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्या सांगलीच्या कलंत्रे आक्कांच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. पुढे त्या १९५० च्या दरम्यान डॉ. बापट बाल शिक्षण मंदिरात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या.

      वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत असलेल्या वामनराव बाळासाहेब जोशी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांच्याकडे अॅंल्युमिनीयमचे हँगर बनविणे, विळ्यांची पाती, लाकडी पोळपाट, लाटणी, टेबल, खुर्च्या इ. बनविण्याचे छोटे उद्योग घरगुती स्वरूपात सुरू होते. त्यांनी आपल्या धाकट्या भावाला आय. टी. आय. ला शिक्षणासाठी घातले. ‘जोशी बंधू’ चा स्वतंत्र छोटा कारखाना सांगलीला एस.टी. स्टँड परिसरात सुरू झाला. त्यांच्या कार्याने तत्कालीन नेते चारूभाई शहा, वसंतदादा पाटील प्रभावित झाले. त्यांनी औद्योगिक वसाहतीतील एक प्लॉट बाळासाहेब जोशींना मोफत दिला आणि तिथे सांगलीच्या एस. टी. स्टँड परिसरातील ‘जोशी बंधू’ चा कारखाना ‘उद्यम केंद्र’ नावाने सुरू झाला. नंतर बाळासाहेब जोशी व मालूताई जोशी दोघांनीही नोकर्याख सोडल्या. ते कारखान्यातच राबू लागले. उद्योग वाढला, कामगार आले. पंचशील नगरच्या त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला साखर कारखान्यातील कामगारांच्या व मजुरांच्या झोपड्या होत्या. जोशी कुटूंबियांनी त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे असे ठरवून, १९७७ पासून झोपडपट्टीतील मुलांसाठी ‘शुभं करोती’ संस्कार वर्ग सुरू केला.त्याचेच रूपांतर पुढे १९८२ साली ‘श्री चैतन्य माऊली विश्वूस्त मंडळात’ झाले. झोपडपट्टीतील कर्ती मंडळी कामाला बाहेर पडल्यानंतर त्यांच्या लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी मोठ्या मुलांवर यायची त्यामुळे त्यांचे शिक्षण व्हायचे नाही. त्यामुळे ती मुले अडाणी राहायची. मालूताईंना ते काकी म्हणत. या काकींना झोपडपट्टीतील समस्यांची जाणीव झाल्यानंतर त्यातूनच पाळणाघराची संकल्पना पुढे आली. झोपडपट्टीतील लहान मुलांना या पाळणाघरात सोडून पालक कामावर जाऊ लागले. मुलांना आंघोळी घालायच्या, खरजेने भरलेले हातपाय धुवून त्यावर औषध लावायचे, डोक्यावरून आंघोळ घालून केस स्वच्छ करायचे ही सर्व कामे बाळासाहेब व मालुताई दोघेही करू लागले. आठवड्यातून एकदा डॉ. केळकर येत. मुलांना तपासत. मालूताई परिसरातील शाळेतील शिक्षकांना भेटल्या मुलांविषयी सांगितले, मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेतली आणि त्यांना एकदम दुसरीच्या परीक्षेला बसविण्याची परवानगी मिळाली. पुढे संस्कार वर्ग सुरू झाला. पोथीवाचन, कथा सांगणे हा उपक्रम सुरू झाला. अचानक बाळासाहेबांचे निधन झाले. चैतन्य माऊली ट्रस्टची सर्वच जबाबदारी मालूताईंच्यावर येऊन पडली, त्यांचा व्याप वाढला होता. आज पटावर १५० विद्यार्थी पाळणाघरात आहेत. वय वर्षे १ ते ५ ची मुले सकाळी सात-साडेसात ते सायंकाळी सात-साडेसातपर्यंत पाळणाघरातच असतात. अगदी एखाद्या मुलाची आई त्याला न्यायला आली नाहीतर पाळणा घरातल्या शिक्षिका त्याला त्याच्या घरी पोचवून मगच आपल्या घरी जातात. संध्याकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी अभ्यासिका असते. यात १ ली ते ९ वी पर्यंतच्या मुलांना शिकविण्याची व्यवस्था आहे. १० वी च्या पुढील मुले रात्री मुक्कामाला येथे येतात व अभ्यास करतात. इ. ९ वी, १० वी तील शाळा सुटलेल्या मुलांना ‘येरला प्रोजेक्ट’ या संस्थेच्या सहकार्याने घरगुती वायरिंग, मोटार रिवायंडिंग, टू व्हीलर दुरुस्ती असे अभ्यासक्रम देऊन त्यासाठीची हत्यारे फुकट देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्यात ‘काकी’ यशस्वी झाल्यात. वृत्तपत्रांनीही या उपक्रमाची व काकींच्या कार्याची दखल घेतली. काकींना तब्बल दहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. फाय फाऊंडेशन पुरस्कार (१९९४), मुलुंड महाराष्ट्र सेवा संघाचा सु. ल. गद्रे पुरस्कार (१९९७), दक्षिण महाराष्ट्र केसरी सेवा पुरस्कार (१९९७), राजमती नेमिनाथ पाटील विशेष सेवा पुरस्कार (१९९८), राज्य शासनाचा पुण्यश्लो्क अहिल्यादेवी होळकर जिल्हा पुरस्कार (१९९८-९९), डॉ. चंद्राताई शेणोलीकर सामाजिक पुरस्कार (१९९९), सौ. राधाबाई लोकूर सेवाश्री पुरस्कार (१९९९), सांगली मिरज कुपवाडतर्फे विशेष गौरव (२०००), बिझनेस एक्सप्रेस समाजसेवा पुरस्कार (२०००) महेशभूषण पुरस्कार २०००. डॉ. हेडगेवार स्मारक सेवा पुरस्कार (२०००). बापूराव गोरे, स्मृती सेवा पुरस्कार २००१ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

 - विजय बक्षी

जोशी, मालती वामन