Skip to main content
x

कापुसकर, शरद गाबाजी

    चित्रकलेचे पद्धतशीर शिक्षण घेऊनही शिल्पकलेच्या आकर्षणामुळे शिल्पकार होण्याचा ध्यास घेतलेले शरद गाबाजी कापुसकर यांचा जन्म महाराष्ट्रातील मंचर येथे, एका छोट्या खेडेगावातील शेतकरी कुटुंबात झाला. कलेची आवड असलेले त्यांचे वडील गाबाजी यशवंत कापुसकर आणि आईचे नाव ठकूबाई. शरद कापुसकरांचे शालेय शिक्षण मंचरलाच झाले. त्यानंतर पुण्याला येऊन अभिनव चित्रकला विद्यालयातून त्यांनी ड्रॉइंग आणि पेंटिंगचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरू असतानाच ते हवाई दलात ‘ग्रउंड पर्सोनेल’ या अभ्यासक्रमासाठी गेले; पण कलावंताचा पिंड असलेल्या कापुसकरांना आपले खरे कार्यक्षेत्र कलेतच आहे हे लवकरच लक्षात आले म्हणून त्यांनी आपले कलाशिक्षण यथोचित पूर्ण केले. ते १९८५ मध्ये जी.डी. आर्ट (पेंटिंग) झाले.

शेतकरी कुटुंबातील कापुसकरांची ओढ मातीकडे असणे साहजिकच होते. त्यामुळे ते शिल्पकलेकडे ओढले गेले. सुरुवातीला त्यांनी चंद्रकांत परब या शिल्पकाराकडे मदतनीस म्हणून काम केले. या अनुभवातून कापुसकरांनी शिल्पकलेचे तंत्र तर आत्मसात केलेच, शिवाय स्वत: परिश्रम करून ते विकसितही केले. तांत्रिक ज्ञानाच्या कक्षा त्यांनी स्वत:हून रुंदावल्या.

कापुसकरांनी माती, दगड, धातू, प्लॅस्टर अशा अनेक माध्यमांतून शिल्पकला साकारली आहे. मृत्तिकाशिल्पात त्यांना विशेष रस आहे. त्यांनी १९८२ मध्ये पहिले शिल्प साईबाबांचे बनविले. व्यक्तिचित्रण या विषयात त्यांनी विशेष काम केलेले आहे. मा. दीनानाथ मंगेशकर, माई मंगेशकर (दीनानाथ रुग्णालयाकरिता), मिसेस ग्रँट (रूबी रुग्णालय), सवाई गंधर्व आदींचे अर्धपुतळे (बस्ट्स) यांशिवाय त्यांनी काही पूर्णाकृती शिल्पेही केली आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझमधील पूर्णपुतळे, तसेच आगाखान महालामधील ‘बा’, बापूजी, राम आणि बुद्ध यांचेही पूर्णपुतळे त्यांनी घडविले आहेत. याशिवाय त्यांनी काही समूह-शिल्पाकृतींकरिताही काम केले आहे. विशेषत: मुंबईच्या जुहू चौपाटीवरील शिवाजी महाराज, बाल संभाजी आणि मावळ्यांचे शिल्प प्रसिद्ध आहे.

पुरुष आणि स्त्री-मानवाकृतींत त्यांना काम करायला आवडते. कुठल्याही शैलीत अडकून न पडता आपल्या दृश्य-अनुभवांवरून ते आपल्या शिल्पाची दिशा ठरवतात. मानवी शरीराची लयबद्धता, त्याची वळणे, त्याची रेषात्मकता यांना त्यांच्या शिल्पांत महत्त्व असते. रोदां या शिल्पकाराचा त्यांच्यावर काहीसा प्रभाव आहे.

भारतात आणि विदेशांत त्यांनी आपली शिल्पे प्रदर्शित केली आहेत. सोसायटी ऑफ पोटर्र्ेट स्कल्प्चर लंडन (२००६), न्यू यॉर्कचे आर्ट रिन्युअल सेंटर, तसेच इटलीमधील एका समूह-प्रदर्शनातून त्यांची शिल्पे प्रदर्शित झाली आहेत. मुंबई येथील नेहरू सेंटरमधील ‘मिलेनिअम शो’ (२०००), आर्ट सोसायटी ऑफ इंडिया (१९८२-१९८४), तसेच महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (१९८६) यांतूनही त्यांचा सहभाग होता.

शरद कापुसकर अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरले आहेत. २००२ चा ‘पं. कुमार गंधर्व’ पुरस्कार, ‘पुणे की आशा’ (१९९८) हा पुरस्कार, राज्य कला प्रदर्शनाचा १९९२ चा पुरस्कार, तसेच आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे १९८४ चे ‘आउट स्टॅण्डिंग एन्ट्री अवॉर्ड’चेही ते मानकरी आहेत. देश-विदेशांतील अनेक कार्यशाळांतून त्यांचा सहभाग होता, शिवाय अनेक कलासंस्थांतर्फे त्यांनी अनेक प्रात्यक्षिकेही दिली आहेत.

पुणे शहराच्या बाहेर, भूगाव येथे त्यांचा स्टूडिओ आहे. त्यांच्या व्यावसायिक शिल्पांमध्येही कौशल्य- निपुणता आणि लालित्य यांचा मनोहारी संगम प्रतीत होतो. देशातल्या विविध नृत्यशैलींतील नृत्यकारांच्या शिल्पाकृती करण्याचा त्यांचा मानस आहे. पहुडलेल्या लावणी नृत्यांगनेचे अतिशय सुंदर शिल्प त्यांनी केले आहे. या सर्व कामात त्यांची पत्नी सहभागी असते. कापुसकर आवड म्हणून निसर्गचित्रेही करतात.

- माधव इमारते

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].