Skip to main content
x

कणेकर, चंद्रकांत रामचंद्र

     डॉ.चंद्रकांत रामचंद्र कणेकर यांचा जन्म आणि शालेय शिक्षण कल्याणला झाले. महाविद्यालयीन शिक्षण, मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (आताची इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) झाले. तेथून बी.एस्सी. आणि एम.एस्सी. या पदव्या त्यांनी सुवर्णपदकासह मिळविल्या. काही काळ त्याच संस्थेत ते साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर तेथेच प्रा.माताप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी रसायनशास्त्रातली पीएच.डी. पदवी मिळविली. नंतर ब्रिटिश कौन्सिलच्या शिष्यवृत्तीवर डॉ.कणेकरांनी, लंडन विद्यापीठात सर आर.एस. नायहोल्म, एफ.आर.एस., यांच्या मार्गदर्शनाखाली, चुंबकीय रसायनशास्त्रात पोस्ट-डॉक्टरेट कार्यक्रमांतर्गत संशोधन केले. तेथेही त्यांनी पीएच.डी. पदवी मिळविली. त्यांनी ऑस्टेलियातील प्रा.आर. एल. मार्टिन यांच्याबरोबरही संशोधन केले.

     १९५५ साली अ‍ॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (आताचे भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेत प्रकल्पाधिकारी म्हणून ते रुजू झाले. १९४५ साली मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना झाली आणि त्यात देश-विदेशांत संशोधन करीत असलेले आघाडीचे भारतीय वैज्ञानिक रुजू झाले होते. प्रा.धर्मट्टी त्या वेळी अमेरिकेतील स्टॅन्फोर्ड विद्यापीठात प्रा. फेलिक्स ब्लॉक यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (एन.एम.आर.) क्षेत्रात संशोधन करीत होते. ते १९५० सालच्या सुमारास भारतात परत येऊन, टाटा मूलभूत संशोधन संस्थेत रुजू झाले. तेथे त्यांच्या निर्देशनाखाली, या  तंत्रक्षेत्रात संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा एक गट निर्माण केला गेला, त्यात डॉ.कणेकर रसायनशास्त्राचे प्राध्यापक या नात्याने १९५७ साली सामील झाले. स्वतंत्र भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हे फार मोठे संक्रमण घडत होते. जगभरचे आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ, भारतात परत येऊन, मूलभूत आणि उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आवश्यक सेवासुविधांची पायाभरणी करू  लागले होते. प्रा. धर्मट्टींनी रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत असताना चुंबकीय प्रवणता मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी या क्षेत्रात असेंद्रिय  कॉम्प्लेक्सेसवरही संशोधन केले होते. त्याच वेळी डॉ.कणेकर हेही रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे असल्यामुळे प्रा.धर्मट्टींना डॉ.कणेकरांच्या संशोधनकार्याचा आणि उत्कृष्ट प्रयोगशीलतेचा परिचय होता.

     रसायनशास्त्राच्या ज्या शाखांत डॉ.कणेकरांनी विशेष संशोधन केले, त्यांपैकी सर्वांत महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे चुंबकीय रसायनशास्त्र (मॅग्नेटो केमिस्ट्री). त्यांनी धातूंचे अणू असलेली अनेक अकार्बनी संयुगांची (चुंबकीय प्रवणता) ससेब्लिटी मोजून त्यांची संरचना आणि जडणघडण यांसंबंधीचा अभ्यास केला. परीक्षण नमुन्यांची चुंबकीय प्रवणता मोजण्यासाठी एल.जी. गॉय या फ्रेंच शास्त्रज्ञाने एक तराजू बनविला. पदार्थाचा परीक्षण नमुना, प्रबळ चुंबकीय क्षेत्रात ठेवला असता, त्याच्या वजनात होणारी वाढ किंवा घट, या तराजूमुळे मोजता येते आणि पदार्थाच्या अणुरेणूंच्या संरचनेसंबंधी माहिती मिळते. या गॉय तराजूची मूलभूत सुविधा डॉ.कणेकरांनी भारतातील अनेक प्रयोगशाळांत बसविली आणि संशोधनाची अचूकता आणि व्याप्ती वाढविली.

     त्यांनी अनेक कार्बनी संयुगांच्या संरचनेची माहिती मिळविण्यासाठी हाय रेझोल्यूशन एन.एम.आर. प्रयोगांची आखणी करून एका नव्याच क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी या प्रकारच्या  अनेक कार्बनी संयुगांच्या काही मूलभूत गुणधर्मांच्या यशस्विरीत्या नोंदी केल्या. त्या काळी ‘एन.एम.आर. स्पेक्ट्रोस्कोपी’ हे तंत्र नवीनच होते. ज्या कार्बनी पदार्थात, हायड्रोजन किंवा कार्बन-१३ यांसारखे अणुगर्भीय परिवलन (न्यूक्लिअर स्पिन) असलेले अणू असतात ते पदार्थ चुंबकीय क्षेत्रात ठेवले असता, चुंबकक्षेत्राच्या ठरावीक प्रबलतेवर, त्यांचे सहस्पंदन (रेझोनन्स) होऊन, रासायनिक विस्थापन या मूलभूत गुणधर्माचे मोजमाप करता येते आणि पदार्थांच्या संरचनेसंबंधी संशोधन करता येते. पदार्थांच्या मिश्रणातील घटकांचा अभ्यास, गतिशील परिणामांचा, म्हणजे पदार्थांच्या तापमानातील बदल किंवा रासायनिक क्रियांच्या वेगातील बदल वगैरेंचा, तसेच प्रथिने आणि न्यूक्लिइक आम्लांची संरचना आणि कार्ये यांचाही अभ्यास करता येतो.

     त्याव्यतिरिक्त डॉ.कणेकरांनी द्रव स्फटिक (लिक्विड क्रिस्टल) एन.एम.आर. वगैरे सुविधा उपलब्ध करून दिल्या. काही रासायनिक संयुगांचे द्रव स्फटिक  वापरून रासायनिक विस्थापनांची मोजमापे तर केलीच; शिवाय प्रायोगिक निरीक्षणांची शास्त्रीय स्पष्टीकरणे देऊन, अनेक संशोधन निबंध, देश-विदेशांतील शास्त्रीय मासिकांत प्रसिद्ध केले. त्या काळात नव्यानेच ओळख झालेल्या  मॉस्बॉर परिणामावरही त्यांनी संशोधन करून अनेक असेंद्रिय कॉम्प्लेक्सेस यांचे रासायनिक गुणधर्म प्रथमच अभ्यासिले. डॉ.कणेकरांनी पीएच.डी. पदवीसाठी अनेक तरुण वैज्ञानिकांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून संशोधन करून घेतले. हे सर्व विद्यार्थी नंतर अनेक भारतीय विज्ञान संस्थांत, उच्चपदांवर कार्यरत होते. अशा रितीने, डॉ. कणेकरांनी त्यांच्या संशोधन क्षेत्रातली परंपरा आणि एक प्रकारचे गुरुकुलच निर्माण केले.

     प्रा.कणेकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ होते. चुंबकीय रसायनशास्त्र या त्यांच्या आवडीच्या विषयात त्यांचे अनेक प्रबंध देशी-विदेशी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले असून या विषयावरील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत त्यांनी भाग घेतला होता. रसायनशास्त्राच्या शिक्षणाबद्दल त्यांना विशेष तळमळ होती. भारतातील अनेक विद्यापीठांना, संशोधनात आणि प्रयोगशाळा आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यात, डॉ. कणेकरांनी सक्रिय मदत केली. डॉ. कणेकर मराठी विज्ञान परिषदेचे सदस्य होते. डॉ.कणेकरांना संगीताचीही बर्‍यापैकी जाण होती. ते हार्मोनियम वाजवीत, गायकांना उत्तम साथ करीत असत.

     आय.आय.टी. कानपूर येथे, काही संशोधकांच्या पीएच.डी. पदवीसाठी ते मौखिक परीक्षा घेण्यासाठी गेले असता, त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या अवघ्या बावन्नाव्या वर्षी आकस्मिक निधन झाले.

- गजानन वामनाचार्य

कणेकर, चंद्रकांत रामचंद्र