क्षीरसागर, विवेक हिंदुराव
कराड तालुक्यातील धामणेर या मूळ गावचे, पण त्याच तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील आजोळ असलेल्या विवेक हिंदुराव क्षीरसागर यांचा जन्म कराड येथे झाला. ते एका फौजदाराचे नातू तर एका उपजिल्हाधिकार्याचे चिरंजीव. त्यांची आई प्राथमिक शिक्षिका होत्या. त्यामुळे त्यांना एका सुशिक्षित व सुसंस्कारित कुटुंबाचा वारसा लाभला. शालेय शिक्षण अर्थातच कराड येथे झाले. वर्गात त्यांनी प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. मध्यंतरीच्या काळात सांगली येथील शिक्षण सोडले, तर पुढचे शिक्षण पुन्हा कराडला आईच्या मार्गदर्शनाखाली झाले. जुन्या व नव्या अभ्यासक्रमाच्या नुकत्याच अमलात आलेल्या व्यवस्थेमुळे बारावीला चांगले गुण मिळवूनही क्षीरसागर यांची वैद्यक महाविद्यालयात प्रवेश घेण्याची संधी हुकली. त्यामुळे त्यांनी एफ.वाय.बी.एस्सी.च्या अभ्यासाला सुरुवात केली. दरम्यान त्यांनी शिक्षकांच्या सल्ल्यावरून पशुवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचे ठरवले व त्याप्रमाणे प्रयत्न करून प्रवेश मिळवला. महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात असताना त्यांची डेअरी सायन्स या विषयाकरता आणंद येथे भेट ठरली व तेथील दुग्ध व्यवसायात झालेली प्रगती पाहून ते भारावून गेले. नंतर त्यांनी स्नातकोत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला व एम.व्ही.एस्सी. ही पदवी प्राप्त केली. नंतर लगेचच त्यांनी नोकरीसाठी दोन ठिकाणी अर्ज केले असता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने तातडीने त्यांची नेमणूक केली व तेथे ते १४ जानेवारी १९६५ रोजी हजर झाले. दूध संघातले ते पहिलेच पशुवैद्यकीय अधिकारी होते. कामावर रुजू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीतच फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याची सुरुवात त्यांनी केली. या दवाखान्याच्या माध्यमातून ते भोर, पुरंदर, इंदापूर या तालुक्यांत पशुवैद्यकीय सेवा दूध उत्पादकांच्या जनावरांना पुरवत होते. याच कालावधीत म्हणजे १९८५ ते १९८७ या काळात संघाच्या कार्यक्षेत्रात गावोगावी जनावरांची शिबिरे आयोजित करून आजारावर, तसेच वंधत्वावर उपचार करण्यात आले. तसेच चांगल्या कालवडींची निपज व्हावी म्हणून कृत्रिम रेतन सेवा संपूर्ण संघात सुरू करण्यात आली.
या सर्वांचा परिणाम म्हणून संघाच्या दूध संकलनात चार पटीने वाढ होऊन चार लाख लीटर्सपेक्षा जास्त झाले. त्या वेळेस एवढ्या दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी प्रभावी विक्री व्यवस्था नव्हती म्हणून वर्षातून ३०-४० वेळा संकलन बंद करावे लागे. परिणामी दूध उत्पादकांचे नुकसान व्हायचे. विक्री व्यवस्थेत काही बदल व विक्री वाढावी म्हणून काही उपाययोजना संघ व्यवस्थापनास सुचवल्यानंतर विक्री व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली व ती त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. त्याचाच एक भाग म्हणून दुग्धजन्य पदार्थ बाजारात उपलब्ध करून दिले व आज बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असूनही ‘कात्रज ब्रँड’ आपले अस्तित्व टिकवून आहे. ‘कात्रज ब्रँड’चे आईस्क्रीमपासून, तूप व खव्यापर्यंत सर्व दुग्धजन्य पदार्थ लोकप्रिय असून उत्तम गुणवत्तेचे व स्वादिष्ट आहेत. १९८७ साली एन.डी.डी.बी.ने नियुक्त केलेल्या गट प्रमुखांना परत बोलावल्यामुळे त्या पदाची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरच पडली. त्यांनी संघाचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने संघाच्या दूध वितरण व्यवस्थेत गरजेनुसार बदल केले व ती व्यवस्था बाजाराच्या गरजा पूर्ण करण्याइतपत सक्षम केली. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून संघाचा सुमारे १२ कोटींचा संचित तोटा भरून काढून नफ्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. तसेच एकूण वार्षिक उलाढालसुद्धा १४० कोटींच्या आसपास आहे. विवेक क्षीरसागर यांची २००४ साली संघाचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली व आजतागायत ते या पदावर कार्यरत आहेत. याच काळात त्यांनी संघाची क्षमता वाढवण्यासाठी ओतुर व कोंढापुरी येथील दूध शीतकरण केंद्रे शासनाकडून विकत घेतली व कात्रज येथे दुग्धशाळेचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण केले.
- डॉ. नागोराव विश्वनाथ तांदळे