Skip to main content
x

कुलकर्णी, दत्तात्रेय रामराव

    त्तात्रेय रामराव कुलकर्णी यांनी उस्मानिया विद्यापीठातून एम. ए. (राज्यशास्त्र) केले. त्यांनी कारर्किर्दीची सुरुवात औरंगाबाद येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात अंशकालीन प्राध्यापक म्हणून केली. जालना येथील जे. ई. एस. महाविद्यालयात राज्यशास्त्र व लोक प्रशासन विभाग प्रमुख, नंतर उपप्राचार्य, प्राचार्य म्हणून सेवा केली. १९९८ पासून नूतन महाविद्यालय, सेलू येथे ते प्राचार्य आहेत. याच काळात विविध शैक्षणिक कार्यात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. मराठवाडा सेवा निवृत्त संघटनेचे अध्यक्ष, सेलू येथे संपन्न झालेल्या दहाव्या अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे चिटणीस, सन १९९९ पासून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस अशी विविध पदे त्यांनी भूषविली. शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या चौफेर विकासासाठी विशेष प्रयत्न केले. त्याबरोबरच ते विविध शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी  सदस्य होते. त्यात प्रामुख्याने इंडियन पॉलिटिकल सायन्स असोसिएशन, मराठवाडा राज्यशास्त्र परिषद, महाराष्ट्र प्राचार्य महासंघ, मराठवाडा विद्यापीठ प्राचार्य संघ, मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा व शारिरिक शिक्षण मंडळाचे सदस्य, मराठवाडा विद्यापीठाच्या पहिल्या विकास परिषदेचे सदस्य, शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन परिषदेच्या, राष्ट्रीय परिषदेचे सदस्य मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पहिल्या सल्लागार मंडळाचे सदस्य, मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, विद्या परिषद सदस्य, कला विद्याशाखा सदस्य, राज्य अभ्यासमंडळ या व अशा अनेक संस्थाच्या माध्यमातून त्यांनी सेवा केली आहे.

     शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. १९७१ ते ७३ या काळात मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या प्रसंगी त्यांनी पन्नास विद्यार्थ्यांस दत्तक घेतले. दुष्काळ निवारण निधी जमा केला. बेघरासाठी गृहनिर्माण योजनेत सहभाग घेतला.

     राष्ट्रीय एकात्मता समितीच्या विद्यमाने आंध्र, मध्यप्रदेश यांना भेटी दिल्या. प. महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. गणेशोत्सव व्याख्यानमालेच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला. श्रीरामजी मांगडिया व्याख्यानमालेचे संयोजन केले. गरीब विद्यार्थ्यांसाठी श्रीरामजी मांगडिया वसतिगृह निर्माण केले. वंदेमातरम सभागृहाची सेलू येथे निर्मिती केली. नूतन इंग्लिश स्कूलचा प्रारंभ केला. नूतन विद्यालयाच्या हीरक महोत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजनही त्यांनी केले.

    औरंगाबाद परभणी आकाशवाणी केंद्रावरून त्यांची भाषणे, मुलाखती प्रसारित झाल्या. सन १९८६-८७ मध्ये राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे, चौफेर कार्यामुळे नूतन शिक्षण संस्थेलाही आदर्श पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट पथकाचा पुरस्कार मिळाला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने विविध पुरस्कारांनी महाविद्यालयास गौरविले. महाविद्यालयाला योगासनामध्ये विद्यापीठ स्तरावर सात वर्ष अजिंक्य पद मिळविले. राष्ट्रीय स्तरावर या संस्थेचा गौरव झाला.

- प्रा. भगवान काळे

कुलकर्णी, दत्तात्रेय रामराव