Skip to main content
x

कुलकर्णी, त्र्यंबक अप्पाजी

       त्र्यंबक अप्पाजी कुलकर्णी यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यातील पाली गावी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुहागर व राजापूर ह्या ठिकाणी झाले. १८९३ मध्ये पुण्यात आल्यावर ते नूतन मराठी विद्यालयात शिकले. तेथून मॅट्रिक झाल्यानंतर ते मुंबईस गेले व तेथील विल्सन महाविद्यालयामधून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. प्रशिक्षण महाविद्यालयातून ते बी. टी. (बॅचलर ऑफ टीचिंग) झाले आणि शिक्षक म्हणून व्यवसायास सुरुवात केली.

     प्रारंभी ते एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले. मुलांची मने फुलवीत शिकविणारे कुलकर्णी विद्यार्थिप्रिय झाले. काही काळ ठाण्याच्या विल्सन महाविद्यालयामध्येही त्यांनी नोकरी केली. पण १९१२ मध्ये बदल्या, नोकरी, बंधने सोडून त्यांनी स्वत:च्या ध्येयाच्या पूर्तीसाठी नाशिक येथे स्वत:च्या घरात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ नावाच्या शाळेची स्थापना केली. सुरुवातीला चौथी ते सातवी पर्यंतचे वर्ग होते.

     १९१४ मध्ये शाळेसाठी स्वतंत्र जागा मिळाली. विद्यालय बांधून पूर्ण झाले. पुढच्याच वर्षी मोठ्या प्रयत्नांनी शाळेला मान्यता मिळाली. अवघ्या दोन वर्षांत मुंबईतील नावाजलेले हॅरिस शिल्ड शाळेने मिळविले व शाळेचे नाव सर्वत्र झाले. त्या काळात त्यांनी व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व ओळखून शाळेत व्यवसाय शिक्षणाचे वर्ग सुरू केले. क्रिकेट, वक्तृत्वातील प्रावीण्य, विद्यार्थ्यांची समाजहित तत्परता यांतून शाळेला स्थैर्य मिळाले, लौकिक वाढत गेला. १९१८ मध्ये नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे चिरस्मारक व्हावे या हेतूने त्यांनी ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. न्यू इंग्लिश स्कूल ही ह्या संस्थेची पहिली शाळा झाली. १९२२ पासून शाळेला सरकारी मदत मिळू लागली. संस्थेच्या सर्व सदस्यांना आजीव सदस्य करून घेतल्याने कामात सुसूत्रता आली.

     कुलकर्णी यांनी १९२० मध्ये बोर्डी येथे सोसायटीची नवी शाळा काढली. आचार्य भिसे ह्या शाळेचे काम पाहू लागले. शाळेत व्यवसाय शिक्षणाची सोय केली. आदिवासींच्या शिक्षणाबरोबर वृक्षसंवर्धन, फळबाग लागवड व श्रमसंस्काराचे उपक्रम कुलर्णी यांनी सुरू केले. परंपरा व प्रगतीचा सांधा जुळविला. शाळेला वसतिगृहाची सोय झाली. दुर्गम वनवासी भागातील मुले शाळेत येऊ लागली. वनवासी माणूस शैक्षणिक माध्यमातून घडू शकतो हे सिद्ध झाले. १९२४ मध्ये त्यांनी नाशिकला गावापासून दूर माळरानासारख्या भागात महाविद्यालयाची स्थापना केली. नाशिकमधील लोकांसाठी उच्च शिक्षणाची सोय झाली. मोठ्या प्रयत्नांनी हंसराज प्रागजी ठाकरसी यांच्याकडून देणगी मिळाली व हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालय सुरू झाले. १९२४ ते १९४७ अशी तेवीस वर्षे कुलकर्णींनी प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. कृषिविज्ञान, समाजसेवा, औद्योगिक प्रशिक्षण ह्यांवर भार देऊन संस्थेच्या विकासासाठी नवी दालने निर्माण केली. १९२६ मध्ये मुंबई विद्यापीठात सिनेटचे सदस्य झाले व सतत वीस वर्षे काम केले. सतत अठ्ठेचाळीस वर्षे त्यांनी सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. प्राचार्य म्हणून १९४७ मध्ये ते निवृत्त झाले. १९६३ मध्ये सोसायटीला रु. ७०,००० ची देणगी दिली आणि संस्था सहकाऱ्यांना सोपवून ते मुंबईस गेले.

     १९११ पासून सोशल सर्व्हिस लीगचे सचिव म्हणून ते काम पाहत होते. त्यांनी मुंबईस गेल्यावर ह्या कामास नव्या जोमाने सुरुवात केली आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने सुरू राहिले.

- प्रा. सुहासिनी पटेल

कुलकर्णी, त्र्यंबक अप्पाजी