Skip to main content
x

खाडिलकर, आशा माधव

शास्त्रीय संगीताबरोबरच उपशास्त्रीय, भक्तिसंगीत, आणि मुख्यत्वेकरून नाट्यसंगीताच्या क्षेत्रात आशा खाडिलकर यांचे प्रभुत्व निर्विवाद आहे. संगीत रंगभूमीवरील संगीत नाटकांमध्ये भूमिका आणि नवीन संगीत नाटकांना संगीत दिग्दर्शन हेही त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाचे आणखी महत्त्वाचे पैलू आहेत.
आशा खाडिलकर यांचे मूळचे नाव आशा पाटणकर. त्या मूळच्या सांगलीच्या  होत्या. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे  झाले. वयाच्या तेराव्या वर्षी आशा पाटणकर यांनी जाहीर कार्यक्रमात गायन केले. त्या १९७५ साली माधव खाडिलकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन मुंबईत स्थायिक झाल्या.
पं. माणिक वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची पुढील तालीम सुरू झाली. माणिक वर्मांच्या शैलीत त्या शास्त्रीय संगीत, भक्तिगीते आणि नाट्यगीते गाऊ लागल्या व अल्पावधीतच गायिका म्हणून नावारूपास आल्या. पुढे त्यांनी पं. यशवंतबुवा जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. वसंतराव देशपांडे, पंडिता पद्मावती शाळिग्राम, पं. शंकर अभ्यंकर अशा निरनिराळ्या गुरूंकडून ग्वाल्हेर, किराणा, आग्रा घराण्यांची वैशिष्ट्ये आत्मसात करून आपली गायकी अधिकाधिक समृद्ध केली.
‘धाडिला राम तिने का वनी’ या साहित्य संघाच्या संगीत नाटकात सीतेची भूमिका करून त्यांनी मराठी संगीत रंगभूमीचाही अनुभव घेतला. या नाटकामुळे त्यांना पं. जितेंद्र अभिषेकींच्या खास मार्गदर्शनाचा लाभ झाला. पं. अभिषेकींच्या संगीत दिग्दर्शनातील अनेक नाट्यपदे, भक्तिगीते त्यांनी आपल्या कार्यक्रमांत समर्थपणे गायली.
मुंबई दूरदर्शनच्या मराठी संगीत रंगभूमीविषयक कार्यक्रमातील सहभागामुळे त्यांना पं. वसंतराव देशपांडे यांच्याकडून पारंपरिक बंदिशी व नाट्यपदांचा खजिना लुटता आला. पं. वसंतरावांच्या बरोबरीने
  या  कार्यक्रमातील त्यांच्या सहभागामुळे आशा  खाडिलकरांचे  अनुभवविश्व  अधिक  समृद्ध झाले आणि रसिकांमध्ये त्या अधिकाधिक लोकप्रिय झाल्या.
‘माणिकमोती’, ‘स्वराभिषेक’ अशा कार्यक्रमांत त्यांचा यशस्वी सहभाग होता. त्याचबरोबर ‘होरी रंगरंगिली’, ‘सावन रंग’, ‘ॠतुरंग’, ‘रचनाकार को प्रणाम’, असे खास विषयानुरूप साकारलेले विविध कार्यक्रमही त्यांनी स्वत: सादर केले. शास्त्रीय संगीतातील निरनिराळ्या रागांमध्ये त्यांनी बंदिशी बांधल्या. नेहरू सेंटर, मुंबईद्वारा निर्मित, ‘संगीत आराधना’ आणि ‘संगीत जयदेव’ या नवीन संगीत नाटकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले.
आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम करतानाच त्यांचे
  परदेशी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन,  सिंगापूर  या  ठिकाणीही  कार्यक्रम झाले. ‘पद्मश्री माणिक वर्मा’ पुरस्कार, ‘पं. कुमार गंधर्व’ पुरस्कार, ‘नटसम्राट बालगंधर्व’ पुरस्कार, ‘सह्याद्री’ वाहिनीचा ‘स्वररत्न’ पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी  त्यांना  सन्मानित  करण्यात  आले.  त्या ‘झी मराठी’च्या ‘सा रे ग म प’ स्पर्धेच्या परीक्षकही होत्या.पुण्यातील सांस्कृतिक कला अकादमीकडूनही २०१७ साली त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
हे सर्व करताना एक गुरू म्हणूनही शास्त्रीय व नाट्यसंगीताचे शिक्षण देऊन त्यांनी शिष्यवर्ग घडविला आहे. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी माधव खाडिलकरांनी स्थापन केलेल्या ‘उत्तुंग’ या संस्थेच्या कामातही आशा खाडिलकरांचा मोठा सहभाग आहे.

 — मधुवंती पेठे

 

 

खाडिलकर, आशा माधव