खेडगीकर, व्यंकटेश भवानराव
स्वामी रामानंद तीर्थांचे मूळ नाव व्यंकटेश होते. सध्याच्या कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील सिंदगी हे त्यांचे जन्मगाव. त्यांच्या वडिलांचे नाव भवानराव तर आईचे नाव यशोदाबाई. विजापूर जिल्ह्यातील खेडगी हे त्यांचे मूळ गाव.
भवानराव सिंदगीच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होते. भवानरावांचा ओढा वैराग्याकडे अधिक होता. वडिलांच्या वैराग्यवृत्तीचा प्रभाव व्यंकटेशांवर बालपणीच अधिक पडला.
व्यंकटेशाचे प्राथमिक शिक्षण गाणगापूर येथे झाले. त्यानंतर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सोलापूरच्या नॉर्थकोट विद्यालयामध्ये झाले. सोलापूरला लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकून ते प्रभावित झाले. आपणही देशकार्य करावे, असे त्यांनी मनोमन ठरविले. एक ऑगस्ट १९२० ला लोकमान्य टिळकांचे निधन झाले. या घटनेने व्यथित झालेल्या व्यंकटेशांनी आजन्म ब्रह्मचारी राहून मातृभूमीची सेवा करण्याचा संकल्प केला. याच दरम्यान महात्मा गांधी सोलापूरला आले. गांधीजींच्या दर्शनाने व्यंकटेशांच्या मनात देशसेवेचा संकल्प अधिक दृढ झाला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तेथेे त्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद व स्वामी रामतीर्थ यांच्या लेखनाचा सखोल अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या वैचारिक जडणघडणीला राष्ट्रीय आणि आध्यात्मिक वळण लाभले. स्वतःचे शिक्षण सांभाळत ते सूतकताई, स्वयंसेवक दल, संचलन अशा राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये आत्मीयतेने सहभागी होत राहिले. १९२३ मध्ये त्यांनी इंटरची परीक्षा उत्तीर्ण केली, आणि पुढील शिक्षणासाठी पुण्याचे टिळक महाविद्यालय गाठले. तिथे ते वाङ्मय पारंगत झाले.
व्यंकटेश खेडगीकरांनी १९२९ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक या नात्याने शैक्षणिक कार्याला प्रारंभ केला. विद्यार्थी हा त्यांचा शैक्षणिक कार्याचा केंद्रबिंदू होता. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यापूर्वी स्वतःच्या हातावर स्वतः छड्या मारणारा, विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून उपोषणाला बसणारा, आजारी विद्यार्थ्याची सेवा करताना त्याला थोपटत देशभक्तीपर गीते म्हणणारा मातृहृदयी शिक्षक त्याचप्रमाणे विद्यार्थ्यावर शिस्तीचे संस्कार स्वतःच्या नैतिक दराऱ्यातून करणारा पितृहृदयी शिक्षकही व्यंकटेश खेडगीकरांच्या रुपाने हिप्परग्याने अनुभवला. शिक्षक मातृपितृहृदयी असावा, हा नवा शैक्षणिक सिध्दांत स्वतःच्या आचरणातून त्यांनी सिध्द केला. त्यांच्या इंग्रजीच्या सहजसुंदर, मंत्रमुग्ध अध्यापनामुळे हिप्परग्याची राष्टीय शाळा अध्यापनाची प्रयोगशाळा ठरली. त्यांच्या अध्यापनातून विद्यार्थ्यांवर होत असलेले मूल्यसंस्कार त्यांच्या स्वतःवरही होऊ लागले. या मूल्यसंस्कारामुळे जानेवारी १९३२ हा मकरसंक्रमणाचा दिवस त्यांच्यासाठी उदात्त संक्रमणाचा ठरला. संन्यस्त होण्याचा आपला निश्चय त्यांनी या दिवशी कृतीत संक्रमीत केला. स्वामी रामतीर्थांचे शिष्य नारायण स्वामी यांच्याकडून संन्यास घेतलेले व्यंकटेश भगवानराव खेडगीकर, स्वामी रामानंद तीर्थ झाले. लोक त्यांना ‘स्वामीजी’ म्हणू लागले. स्वामीजींच्या दिक्षित जीवनाचा हेतू जनकल्याण व देशकार्य हाच होता. त्यासाठीच विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे पवित्र कार्य स्वामीजींनी पुढेही अविरत चालू ठेवले. हिप्परग्याच्या शाळेत देशभक्तीने भारलेली पिढी घडते आहे. हे निजाम राजवटीला परवडण्यासारखे नव्हते. स्वाभाविकच या शाळेवर निजामाची वक्रदृष्टी होती. तशातच हिप्परग्याला प्लेगची साथ सुरु झाली. हिप्परग्याची राष्ट्रीय शाळा सोलापूरला स्थलांतरीत झाली.
स्वामीजी व त्यांच्या सहकार्यांनी आपले कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी अंबाजोगाई (त्याकाळचे मोमीनाबाद) हे क्षेत्र निवडले. अंबाजोगाईला नारायणराव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी १९१८ मध्येच योगेश्वरी नूतन विद्यालय सुरु केले होते. ५ मे १९३५ ला स्वामीजी या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले. या शाळेत त्यांनी माध्यमिक शिक्षणाचा विभाग सुरु केला. ‘तेन त्यक्तेन भुंजीता’ -कुठलाही उपभोग त्याच भावनेन घ्या-हे ब्रीद समोर ठेवून त्यागाचा व राष्ट्रीय शिक्षणाचा उर्जित प्रयोग या शाळेने स्वामीजींच्या नेतृत्वाखाली सुरु केला. या स्वामाजींच्या विचाराचा आचार या शाळेत घडू लागला. शाळेला जोडून असलेल्या वसतिगृहात सर्व जातीधर्माची मुले ताटाला ताट लावून जेवू लागली. ह्या शाळेतली ही समता शाळेपुरतीच मर्यादित राहिली नाही. शाळेतले शिक्षक दलित वस्तीमध्ये प्रौढ निरक्षरांसाठी साक्षरता वर्ग घेऊ लागले. या समतेच्या आचाराला प्रेरित करणारा कृतिविचार अर्थातच स्वामीजींचा होता.
शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. या जाणिवेने ते स्वातंत्र्य चळवळीकडे खेचले गेले. त्यांनी १९३८ मध्ये शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला. जुलमी निजामी राजवटीच्या विरोधी लढ्यात ते इतके अग्रेसर झाले की, या लढ्याचे नेतृत्व त्यांच्याकडे आले. ‘माझी संस्था राष्ट्राच्या स्वातंत्र्य यज्ञात दिव्य मरण पत्करण्यासाठी जन्माला आली आहे’.या त्यांच्या तेजस्वी विचाराने शाळेतल्या राष्ट्रीय शिक्षणाला उदात्त पातळीवर नेले. अंबाजोगाईच्या योगेश्वरी शाळेतील सर्व शिक्षक निजामाच्या जुलमास न जुमानता विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षणाचे धडे बेधडकपणे देऊ लागले. शाळेच्या प्रार्थनेत वंदे मातरमचे गगनभेदी राष्ट्रगान निनादू लागले. त्यामुळे निजामाच्या दप्तरात या शाळेची नोंद बागी मदरसा अशी घेण्यात आली. जनमानसासाठी ही बाब अभिमानाची होती. अशा शाळेत आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठविणे, ही बाब लोकांना गौरवाची वाटत होती. शाळेतले बाबासाहेब परांजपे, ए. मा. कुलकर्णी, किंबहुने, आचार्य ग.धो. देशपांडे, बाबूराव कानडे, अहंकारी, लाला बिंदाप्रसाद, व्यंकटराव देशपांडे, बेथूजी, हरबाजी, रामपूरकर इत्यादी गुरुजन या ना त्या मार्गाने हैद्राबाद मुक्तीसंग्रामात सहभागी होत होते. या लढ्यात गुरुजनांसोबत शाळेतले अनेक विद्यार्थीही अग्रेसर होते. १९४२ च्या चले जावच्या आंदोलनानंतर हैद्राबाद मुक्तिसंग्रामाची चळवळ अधिकच तीव्र झाली. गोविंदभाई श्रॉफ, माणिकचंद पहाडे, गोविंदराव नानल, दिगंबरराव बिंदू, श्यामराव बोधनकर, भगवानराव गांजवे, राघवेंद्र दिवाण, पुरूषोत्तमराव चपळगावकर, देवराव कांबळे, विनायकराव चारठाणकर, विजयेंद्र काबरा, नागनाथराव परांजपे, शांतिनाथ लुंगाडे इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांच्या समर्पित सहकार्याने स्वामीजींनी ही चळवळ नेटाने पुढे चालविली. ही चळवळ एका अर्थाने स्वातंत्र्य संग्रामाचे लोकशिक्षण ठरली. स्वतंत्र भारताचे गृहमंत्री वल्लभभाई पटेलांच्या पोलिस कार्यवाहीमुळे १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन झाले. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे हे यश होते. या संग्रामातील स्वामीजींचे योगदान लक्षात घेऊन लोक स्वामीजींना ‘मुक्तिदाता’ असे श्रद्धेने संबोधू लागले.
मिळविलेल्या स्वातंत्र्याला समृद्ध करण्यासाठी समृद्ध शिक्षणाची गरज होतीच. समृद्ध शिक्षणाचा वसा घेतलेल्या स्वामीजींनी व्हिजन हे इंग्रजी साप्ताहिक सुरू केले. २८ जून १९५० ला नांदेड येथे पीपल्स कॉलेजची स्थापना केली. दलितांचे पीडितांचे मन जवळ बाळगणारा परिपूर्ण माणूस उत्क्रांत करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता.
भारताच्या लोकशाहीसाठी ज्ञान व चारित्र्याची साधना करणारा स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतंत्र वृत्तीने घडविण्यास सिद्ध असलेला विद्यार्थी घडविणे ही या महाविद्यालयाची इति कर्तव्यता स्वामीजींनी निश्चित केली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेली त्यांची शिक्षण प्रणाली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर स्वातंत्र्याच्या समृद्धीकरणासाठी सिद्ध झाली. स्वामीजींचा शिक्षणाचा हाच उदात्त विचार त्यांनी जून १९५५ मध्ये लातूर येथे स्थापन केलेल्या तंत्र विद्यालयातून, २९ जून १९५६ ला अंबेजोगाई येथे स्थापन केलेल्या योगेश्वरी महाविद्यालयातून इ. स. आणि १९६६ मध्ये आंध्र प्रदेशातील चिंतलूरजवळ स्थापन केलेल्या रामतीर्थ शांती महाविद्यालयात व्यक्त होऊ लागला.
स्वामीजी संन्यस्त होते. त्यांनी स्वतःचा संसार सुरू केला नव्हता. पण समाजाचा संसार सोडला नव्हता. समाजकारणासाठी आवश्यक असलेल्या राजकारणाचा त्यांना अंतराय नव्हता.
१९५२ मध्ये गुलबर्गा मतदार संघातून आणि इ.स. १९५७ मध्ये औरंगाबाद मतदार संघातून विजयी होऊन खासदार झालेल्या स्वामीजींनी लोकसभेलाही मूल्यसंस्कार दिले. त्यांच्या गतिमान कार्यप्रणालीमुळेे मात्र त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याची हेळसांड झाली.