खोबरागडे, दादाजी रामाजी
दादाजी रामाजी खोबरागडे यांचा जन्म नागभीडपासून २३ कि.मी. अंतरावर असणाऱ्या नांदेड या गावी अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले आहे. वडिलोपार्जित ३ एकर धानाची शेती त्यांना मिळाली होती, परंतु त्यांचा तरुण एकुलता मुलगा दुर्धर आजाराने व्याधिग्रस्त झाल्याने त्याच्या महाग औषधोपचारासाठी ३ एकर शेती विकावी लागली. त्यांच्या सुनेला तिच्या वडिलांकडून दीड एकर धानाची शेती मिळाली. कुटुंबातील ६ माणसांच्या कुटुंबासाठी या दीड एकर धानाच्या शेतातील उत्पादन पुरेसे नसल्याने कुटुंबातील माणसांना चरितार्थासाठी आणि तीन नातवांना शिक्षणासाठी दादाजी व त्यांच्या सुनेला प्रसंगी मोलमजुरी करावी लागे. मुलगा अपंग असल्याने अंगमेहनतीचे काम करू शकत नाही; तथापि, तो दादाजी खोबरागडे यांच्या संशोधनात मदत करतो.
दादाजी खोबरागडे यांना कोणाचेही मार्गदर्शन मिळाले नव्हते. संशोधन हा त्यांचा उपजत गुण होता. त्यामुळेच त्यांनी ‘एचएमटी सोना’ या धानाच्या जातीसह ९२ नांदेड हिरा, वीज नांदेड, दीपक रत्ना आणि डी.आर.के. या सर्व जातींचे प्रति हेक्टरी सरासरी ३५-४० क्विंटल धानाचे उत्पादन घेतले. त्यांनी २००१मध्ये ‘पटेल ३’ या सरासरी उत्पादन ४० ते ४५ क्विंटल उत्पादन देणाऱ्या जातीचे संशोधन केले. तांदळाचा दाणा बारीक, किंचित सुवासिक आणि शिजण्याची प्रत चांगली व चवदार आहे. तांदळाचा उतारा ८०% मिळतो. त्यामुळे ‘पटेल ३’ ही धानाची जात मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश येथील शेतकऱ्यांत अल्पावधीत लोकप्रिय झाली.
दादाजी रामाजी खोबरागडे यांनी केलेल्या धानाच्या जातींचे संशोधनाबद्दल राष्ट्रीय अनुसंधान प्रतिष्ठानचे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक रु. ५०,००० भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ५ जानेवारी २००५ रोजी अहमदाबाद (गुजरात) येथे प्रदान करण्यात आले.
- संपादित