खोना, लखमसी पदमसी
खामगावसारख्या गावात राहून आयुष्यभर चित्रकार म्हणून जगलेल्या लखमसी पदमसी खोना यांनी त्या भागात कलेबाबत जाण निर्माण करण्यासोबतच त्या परिसरातील चित्रवारशाच्या संदर्भात समाजजागृतीही केली.
लखमसी पदमसी खोना यांचा जन्म खामगावी, एका व्यापाऱ्याच्या घरी झाला. खामगाव ही कापसाची मोठी बाजारपेठ होती. कच्छ, गुजरातमधून आलेली मंडळी येथे स्थिरावली. लखमसी यांचे वडील पदमसी हे त्यातील एक व्यापारी. व्यापाऱ्याच्या घरात चित्रकलेला प्रोत्साहन मिळणे अशक्य होते; पण अशा वातावरणात लखमसी यांनी हातात कुंचला घेतला तो शेवटपर्यंत कायम होता. प्राथमिक शिक्षण खामगावच्या महानगरपालिकेच्या शाळेत पूर्ण करून, मॅट्रिक पर्यंतचे शालेय शिक्षण त्यांनी टिळक राष्ट्रीय विद्यालयातून पूर्ण केले. तेथेच त्यांच्या कलाशिक्षणालाही प्रारंभ झाला. पंधे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय शिक्षणशाळेत कळत नकळत चित्रकलेबरोबर अन्य कलागुणही रुजत गेले. याची प्रचिती त्यांनी केलेली शिल्पे व अन्य माध्यमांतील कामे बघितली की येते.
घरच्या वडिलधाऱ्यांनी ओळखले की लखमसी काही व्यापारात रमणार नाही व नाइलाजाने हा निर्णय घरच्यांनी मान्य केला. खोना यांचे पुढील शिक्षण मुंबईच्या नूतन कला मंदिरात सुरू झाले. सुरुवातीच्या दोन परीक्षा झाल्यानंतर त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला व शिष्यवृत्ती मिळवून १९४५ ते १९४७ या काळात तेथील शिक्षणक्रम पूर्ण करून ‘जी.डी. आर्ट’ ही पदविका प्राप्त केली.
१९४४ मध्ये, म्हणजे वयाच्या एकविसाव्या वर्षी खोना यांनी कलाध्यापनाची सुरुवात केली होती, तेव्हा महात्मा गांधीजींच्या समोर सीटिंग घेऊन त्यांनी पाच तासांत उत्थित शिल्प तयार केले. त्यावर महात्माजींची स्वाक्षरीही आहे. ‘वेस्ट’मधून ‘बेस्ट’ शोधण्याची कला त्यांच्या कलाकृतीतून अभिव्यक्त होते. १९४७ साली त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. विद्यार्थ्यांना शिकविणे व खामगावच्या राष्ट्रीय शाळेत भित्तीचित्रे रंगविण्याचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणात केले. त्यांच्या ‘भारताचा पुनर्राज्याभिषेक’ ह्या चित्राला ‘मिस डॉली खुर्शीद’ पुरस्कार मिळाला.
खोना यांनी श्री समस्त कच्छी दशा ओसवाल जैन ज्ञाती संमेलन अहवालाचे मुखपृष्ठावरील चित्र व हुबळीत १९८१ मध्ये झालेल्या अधिवेशनाची संपूर्ण सजावट केली. माटुंग्याच्या देरासर (जैन मंदिर) मधील भित्तिचित्रांची अवस्था खूप खराब झाली होती. त्यांच्या पुनरुज्जीवनाचे कामही त्यांनी चिकाटीने पूर्ण केले. व्यावसायिक व्यक्ति-चित्रकलेच्या क्षेत्रात ते आयुष्यभर कार्यरत राहिले.
एडनच्या गांधी सभागृहात लखमसी खोना यांनी काढलेले महात्मा गांधीजींचे पूर्णाकृती तैलचित्र १९५० साली लावण्यात आले. इंदिरा गांधी आणि मोतीलाल नेहरूंचे तैलचित्र दिल्ली येथे त्यांच्या राहत्या निवासस्थानी आहे.
भुज,कच्छ इथे खोना यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे पूर्णाकृती तैलचित्र रंगवले. उमेद भवनमध्ये त्यांनी रंगवलेले पंडित जवाहरलाल नेहरू व वल्लभभाईंचे लाइफ साइज तैलचित्र आहे. इंडियन मर्चन्ट चेम्बरमध्ये देना बँकेचे मालक प्राणलाल देवकरण नानजीभाई व इंडियन मर्चंट चेंबरचे अध्यक्ष बाबूभाई चिनॉय यांचे चित्र त्यांनी केले असून महाराष्ट्र विधान भवन सभागृहातील मोरारजीभाई देसाईंचे तैलचित्र त्यांनी रंगविले आहे. याशिवाय त्यांनी कच्छी समाजातील उद्योजक व व्यापाऱ्यांची अनेक व्यक्तिचित्रे रंगविली असून त्या समाजातील ते लोकप्रिय चित्रकार होते.
परोपकारी, स्नेहशील व मृदुभाषी व्यक्तिमत्त्वाच्या लखमसी खोना यांचे महाराष्ट्रातील विविध वयोगटाच्या चित्र-शिल्पकारांशी अखेरपर्यंत चांगले संबंध होते.