Skip to main content
x

खरे, वामन केशव

     वामन केशव खरे ह्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नाशिकला झाले. नाशिक विद्यालयामधून ते मॅट्रिक झाले. त्यावेळी त्यांनी संस्कृतची जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविली. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत विषय घेऊन बी. ए. पदवी पहिल्या वर्गात मिळविली. आय. सी. एस. परीक्षेची त्यांची तयारी सुरू होती. पण त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची व वडिलांच्या आर्यवैभव छापखान्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी शिक्षकाचा पेशा स्वीकारला. बी. टी. ची परीक्षाही ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. प्रारंभीची दोन-तीन वर्षे पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर ते नाशिकला आले व १९३० ते १९४२ अशी बारा वर्षे ते नाशिकच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये म्हणजे आजच्या ज्यु. स. रूंग्टा विद्यालयात अध्यापक म्हणून नोकरीत होते. १९४२ पासून नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालय, शारदा मंदिर म्हणजे आजचे मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर व लासलगाव इंग्लिश शाळेमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. ते अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे शिक्षक होते. इंग्रजी व संस्कृत ह्या विषयांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. दोन्ही विषयांचे अत्यंत रसवत्तापूर्ण अध्यापन ते करीत. म्हणूनच ख्यातनाम शिक्षक म्हणून त्यांची कीर्ती महाराष्ट्रभर पसरलेली होती. ते प्रभावी वक्तेही होते.

     नाशिक एज्युकेशन सोसायटीचे कर्तबगार आजीव सदस्य म्हणून संस्थेला प्रगतिपथावर नेण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पेठे विद्यालयाच्या इमारतीच्या उभारणीत त्यांचा मोठा पुढाकार होता. त्यासाठी देणग्या मिळवणे, कर्ज उभे करणे यासारखी मोठी कामे त्यांनी केली. आर्यवैभव छापखान्यामध्ये पुस्तकांची कामे होत नव्हती. पण आपल्या धाकट्या भावाचे सन्मित्र म्हणून कुसुमाग्रजांचा ‘जीवनलहरी’ हा पहिला छोटा काव्यसंग्रह त्यांनी हौसेने छापला. सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांना मोठा रस होता. महाराष्ट्र नाट्य मंडळ- नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिक शाखा, लोकहितवादी मंडळ नाशिक ह्या संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

     १९४२ मध्ये आचार्य अत्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेले सत्ताविसावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यात त्यांचे सहकार्य मोलाचे होते. पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापकपद त्यांनी स्वीकारावे असा सहकार्‍यांचा आग्रह त्यांनी अनेक वर्षे दूर सारला होता. पण शेवटी सर्वांच्या आग्रहास्तव मुख्याध्यापकपद स्वीकारले. मात्र दीड वर्षातच त्यांचे निधन झाले.

- प्रा. सुहासिनी पटेल

खरे, वामन केशव