लोंढे, गंगाधर मेघश्याम
गंगाधर मेघश्याम लोंढे यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. गंगाधर लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या आईने त्यांना मामाकडे आणले व तेथेच ते वाढले. कुटुंबातील आर्थिक टंचाईमुळे गंगाधरपंतांचे शालेय शिक्षण आठवी इयत्तेपर्यंत होऊ शकले. लोंढे यांच्या कुटुंबात गायनाचे वा संगीताचे कुठल्याही प्रकारचे वातावरण नव्हते; मात्र गंगाधरपंतांना उपजत संगीताची आवड व गायनाला अनुकूल असा आवाज लाभल्यामुळे त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले होते. इंदूरला गंधर्व नाटक मंडळी जेव्हा मुक्कामाला येत, तेव्हा त्यातील सुप्रसिद्ध नट गणपतराव बोडस गंगाधरपंतांच्या मामाकडेच उतरत. त्यामुळे गंगाधरपंतांना गंधर्व कंपनीची नाटकेही पाहायला मिळाली. यातून गंगाधरपंतांना संगीत आणि अभिनयात रुची निर्माण झाली.
त्यांचा आवाज जात्याच चांगला असल्यामुळे शालेय शिक्षण घेत असतानाच अनेक समारंभांतून ‘उद्घाटनपर स्वागतगीत’ गायला त्यांना बोलवत. अशाच एका समारंभातील त्यांचे गायन ऐकून उपस्थित किर्लोस्कर नाटक मंडळीच्या सदस्यांनी त्यांना नाटक कंपनीत येण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी १९१८ ते १९२४ या काळात किर्लोस्कर नाटक मंडळीतून स्त्री -भूमिका केल्या. किर्लोस्कर नाटक मंडळी सोडून ते १९२५ मध्ये पुण्यात आले. पुण्यात त्यांनी तांबेशास्त्रींकडून शास्त्रोक्त गायनाचे रीतसर धडे घेतले. काही काळापर्यंत मा. दीनानाथांच्या बलवंत संगीत मंडळीत व नंतर विश्वनाथ संगीत मंडळीतूनही त्यांनी कामे केली.
१९२५ मध्ये १९२६ साली अच्युत बळवंत कोल्हटकरांनी ‘मस्तानी’ या नाटकातील गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाकरिता त्यांना बोलावले. दरम्यान त्यांना गणपतराव बोडसांकडून अभिनयाचे पाठही मिळाले. गंगाधर लोंढे १९२७ पासून बापूराव पेंढारकरांच्या ‘ललितकलादर्श’मधून काम करू लागले. ललित— कलादर्शच्या ‘वधूपरीक्षा’ (१९२८) या नाटकातूनच गंगाधरपंतांनी पुरुष भूमिका करण्यास प्रारंभ केला. या नाटकातील भार्गव या भूमिकेमुळे त्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. ‘हाच मुलाचा बाप’, ‘नेकजात मराठा’, ‘सज्जन’ या नाटकांतील भूमिकांमुळे ते लोकप्रिय झाले.
ते १९३१ पासून गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकांतून कामे करू लागले. गंधर्व नाटक मंडळीच्या नाटकातून बालगंधर्वांबरोबर गंगाधरपंतांनी विविध नायकांच्या भूमिका साकार केल्या. लोंढे ‘गंधर्व हिरो’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ‘सावित्री’ या नाटकातील ‘सत्यवाना’ची त्यांची भूमिका त्या काळी फारच गाजली होती.
बालगंधर्व १९३४ च्या शेवटी चित्रपटाकडे वळले. एकंदरच चित्रपटाचा प्रभाव सर्वत्र वाढू लागला होता. याच काळात गंधर्व नाटक मंडळीही बंद पडली. बालगंधर्वांना चित्रपटसृष्टी मानवली नाही व यशही फारसे लाभले नाही. गंधर्व कंपनी पुन्हा सुरू करावी अशी त्यांची इच्छा झाली; पण ते ‘प्रभात’ फिल्म कंपनीशी कराराने बांधले गेले असल्यामुळे त्यांनी गंगाधरपंतांना गंधर्व नाटक मंडळी सुरू करण्यास सुचविले. गंगाधरपंतांच्या नेतृत्वाखाली गंधर्व नाटक मंडळी पुन्हा १९३५ साली सुरू झाली. त्यांनी जवळजवळ अठरा महिने इतर नटांच्या साहाय्याने ही कंपनी चालविली. याच काळात म्हणजे १९३४ नंतर मुंबईच्या रूबी रेकॉर्ड कंपनीने ‘ओडियन’ या लेबलखाली गंगाधरपंतांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिकाही काढल्या.
त्यांनी १९३६ ते १९४१ या काळात ‘कान्होपात्रा’ (१९३६), ‘राजा गोपीचंद’ (१९३८), ‘भगवा झेंडा’ (१९३९) आणि ‘भक्त दामाजी’ (१९४१) या चित्रपटांतून भूमिका केल्या. यांतील त्यांच्या गाण्यांनाही लोकप्रियता लाभली. दी ग्रमोफोन कंपनीने त्यांच्या रेकॉडर्स काढल्या होत्या.
लोंढ्यांनी १९३९ साली स्वतःची ‘राजाराम संगीत मंडळी’ काढली. या कंपनीने ‘मानापमान’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’ अशी अनेक जुनी संगीत नाटके केली. लोंढ्यांनी रंगभूमीवरील अनेक मान्यवर व प्रसिद्ध नटांना आपल्या कंपनीच्या नाटकांतून भूमिका करण्यास आमंत्रित केले. संगीत नाटकांच्या पडत्या काळात जुन्या नाट्यसंगीताची परंपरा जपण्याचे वा जिवंत ठेवण्याचे फार मोठे कार्य गंगाधरपंत लोंढ्यांनी केले. इतकेच नव्हे, तर गडकर्यांचे ‘प्रेमसंन्यास’ हे गद्य नाटक त्यांनी १९४० साली राजाराम संगीत मंडळीतर्फे संगीत नाटक म्हणून रंगभूमीवर आणले.
‘प्रेमसंन्यास’ या नाटकातील पद्यरचना वसंत शांताराम देसाई यांची व संगीत मा. कृष्णरावांचे आहे. राजाराम संगीत मंडळीने सादर केलेल्या पूर्वीच्या जमान्यातील संगीत नाटकांच्या प्रयोगांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
त्यांनी १९४३ साली सांगली येथे झालेल्या नाट्य शताब्दी महोत्सवात ‘शारदा’ या नाटकात बालगंधर्वांबरोबर महत्त्वाची भूमिका केली होती. देखणे व भारदस्त व्यक्तिमत्त्व, स्वच्छ वाणी व भरदार, सुरेल आवाजातील आटोपशीर व परिणामकारक गाणे यामुळे गायक-नट म्हणून त्यांनी रसिकांची मने जिंकली. लोंढे यांची ध्वनिमुद्रित पदे त्यांच्या तेजस्वी गायनाची साक्ष देतात. ‘धन्य तूचि कांता’ (अमृतसिद्धी), ‘लहरी अता सुखाच्या’ (अमृतसिद्धी), ‘धवल लौकिका’ (अमृतसिद्धी), ‘शर लागला’ (कान्होपात्रा), ‘लोळत कच मुखमधुवरी’ (विद्याहरण) ही त्यांची काही गाजलेली पदे. अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी त्यांचे अकस्मात निधन झाले.