पाटील, मधुकर सुदामा
पाटील मधुकर सुदामा यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील धामणपाडा (शहाबाज) या गावी अभावग्रस्त कुटुंबात झाला. आई लक्ष्मीबाई आणि वडील सुदामा नागू पाटील. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावी झाले. अकरावीच्या वर्गात रात्रशाळेतून पहिला येण्याचा मान मिळाला. मुंबई विद्यापीठातून मराठी-संस्कृत पदवी शिक्षण आणि ह्याच विषयात पदव्युत्तर शिक्षणात १९६१मध्ये मुंबई विद्यापीठातून प्रथम श्रेणीत प्रथम आले. १९४६पासून १९५१पर्यंत मुंबईच्या हिंद मिल्समध्ये नंबर मार्कर तर १९५१पासून १९५९पर्यंत मुंबईच्या विक्रीकर विभागात कारकून म्हणून काम केले. १९५९ पासून १९६१पर्यंत के.एम.एस.परेल हायस्कुलात शिक्षक म्हणून तर मालेगावच्या एम.एस.जी. कॉलेजमध्ये १९६१पासून १९६९पर्यंत प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून नोकरी केली. पुढे १९६९पासून १९८९पर्यंत मनमाडच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्यपदाची धुरा सांभाळली. नंबर मार्कर - कारकून - शिक्षक - प्राध्यापक - प्राचार्य म्हणून कार्यरत असताना शिक्षण आणि लेखन ह्या दोन्ही गोष्टींत पाटील यांनी प्रगती केली.
पाटील यांनी १९६९पासून आजतागायत समीक्षा-लेखन करून मराठी समीक्षेच्या दिशा उजळ केल्या. नव्या पिढीतील समीक्षकांसमोर समीक्षेचा वस्तुपाठ त्यांनी परिश्रमपूर्वक उभा केला. समीक्षासुद्धा समीक्षकाच्या अस्तित्वाशी एकजीव होणारी आणि सर्जनशील अशी प्रक्रिया असल्याचे उदाहरण त्यांनी आपल्या मूल्यनिष्ठ समीक्षा-लेखनातून मराठी भाषेला आणि संस्कृतीला दिले. संतपरंपरेचा अभ्यास करून ज्ञानदेव-तुकाराम यांच्या संदर्भात सिद्ध केलेल्या ‘कविमन: स्वरूप व शोध’ या विषयावरील शोधप्रबंधासाठी पुणे विद्यापीठाने १९७८मध्ये आचार्य पदवी प्रदान केली. १९७८-१९७९ या वर्षांतील मराठीतील सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून यशवंत विठ्ठल परांजपे हा पुरस्कार पाटील यांना मिळाला.
भारतीय साहित्यशास्त्र आणि पाश्चात्त्य साहित्यशास्त्र यांच्या अभ्यासांतून त्यांनी ज्ञानेश्वर ते तुकाराम यांचा अंतर्लक्ष्यी काव्याभ्यास केला. एकूणच संतकाव्याचे पुनर्वाचन, अर्थनिर्णयन आणि पुनर्मांडणी करणारा शोधाभ्यास; पाटील यांनी ‘ज्ञानेश्वरीचा तृष्णाबंध’, ‘तुकाराम: अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे’, ‘ज्ञानेश्वरीचा काव्यबंध’ या मौलिक समीक्षाग्रंथांतून मांडला. याच अभ्यासाचे फलस्वरूप म्हणून त्यांनी संत कविमनाचा शोध घेत, आदिबंधात्मक तृष्णाबंधाचा नवीन समीक्षा मूल्यविचार मांडला. त्यांच्या समीक्षा शैलीचा तो मूळ स्वभाव म्हणून पाहता येतो.
मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अचूक वेध घेणार्या अनुष्टुभ या द्वैमासिकाचा जन्म जुलै १९७७ साली मनमाड येथील पाटील यांच्या घरूनच झाला. जुलै १९९५पासून १९९७ डिसेंबरपर्यंत अनुष्टुभचे संपादन आणि २००६पर्यंत अनुष्टुभची धुरा सांभाळली. शहाबाजपासून मनमाडपर्यंत १९६२ ते २००३ ह्या काळात सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय चळवळ चालवून वाचन संस्कृतीच्या विकासात मोलाचे योगदान दिले.
१९६९ पासून ते आजतागायत प्रतिष्ठान, सत्यकथा, अस्मितादर्श, कवितारती, अनुष्टुभ, नवभारत, आलोचना, मराठी संशोधन पत्रिका, अभिधा, स्रग्धरा, अक्षरवैदर्भी, झपूर्झा आदी मान्यवर नियतकालिकांतून मराठी समीक्षेला नवे परिमाण देणारे सकस समीक्षा-लेखन केले. अनेक चर्चासत्रांतून आणि साहित्य संमेलनांतून आपल्या सर्जनशील समीक्षा-विचारांवर भाष्य केले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या ‘समीक्षा संज्ञा कोशा’त समीक्षा नोंदी लिहिल्या.
पाटील यांनी आजतागायत मराठी भाषेचा आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी मराठी समीक्षेला वैविध्यपूर्ण आणि नवनवोन्मेषशाली आयाम देत जवळपास चौदा समीक्षा-ग्रंथ सिद्ध केले. ‘दलित कविता’ (१९८१), ‘अक्षरवाटा’ (१९८२), ‘बालकवींचे काव्यविश्व’ (१९८९), ‘सदानंद रेगे यांचे काव्यविश्व’ (१९८९), ‘आदिबंधात्मक समीक्षा’ (१९८९), ‘भारतीयांचा साहित्यविचार’ (१९९०), ‘कवितेचा रूपशोध’ (१९९९), ‘साहित्याचे सामाजिक व सांस्कृतिक अनुबंध’ (२००१), ‘इंदिरा यांचे काव्यविश्व’ (२००१), ‘प्रभाकर पाध्ये: वाङ्मयदर्शन’ (१९९३) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत. पाटील यांची ही समीक्षा-संपदा म्हणजे संत-कविता ते आधुनिक कविता तसेच साहित्य विचारांचा साक्षेपी आंतरशोधातून घेतलेल्या समीक्षामूल्यांचा नवशोध आहे.
ज्ञानदेव ते तुकाराम यांच्या काव्यविश्वातील अनुभवरूपांचा शोध घेताना त्यांच्या हाती लागलेले आदिबंधात्मक तृष्णाबंधाचे नवनीत म्हणजे मराठी समीक्षेची श्रीमंती होय. आदिबंधाचे अनुबंध आणि ज्ञानदेव-तुकाराम यांच्या काव्यविश्वाचा तृष्णाबंधातून घेतलेला अंतर्शोध आणि त्यातून केलेली संत कवितेची आदिबंधात्मक मांडणी आणि तृष्णाबंधांचा उलगडा म्हणजे देशीय मराठी समीक्षेची पाटील यांनी जणू पायाभरणीच केली आहे.
महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, भैरू रतन दमाणी पुरस्कार, शासनाचा श्री. के. क्षीरसागर पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा ह.श्री.शेणोलीकर पुरस्कार, मुंबई मराठी साहित्य संघाचा ज्येष्ठ समीक्षक पुरस्कार आदी मान्यवर पुरस्कारांनी त्यांची समीक्षा-संपदा गौरवान्वित झालेली आहे. त्यांनी मराठी समीक्षेला तृष्णाबंधात्मक आणि आदिबंधात्मक समीक्षेची नवी दृष्टी दिली. मराठी समीक्षेला मूल्यनिष्ठांचे अधिष्ठान दिले.
मराठी भाषेला आणि संस्कृतीला देशीय काव्य-समीक्षेची द्रष्टादृष्टी पाटील यांनी दिलेली आहे. ‘तुकाराम: अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे’ या संत तुकारामांच्या मूलभूत काव्य समीक्ष-ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ.रमेश वरखेडे म्हणतात, ‘भोक्ते मन स्रष्टे झाले की काव्य जन्माला येते, आणि स्रष्टे मन द्रष्टे झाले की पर्यायी सृष्टीचित्र (युटोपिया) रेखाटले जाते. कविमनाचे उत्क्रमण कसे होत जाते, याची प्रक्रिया मांडताना एक आदर्श संस्कृतिचित्र कसे पुढे येते, याचे विहंगम दर्शन घडविणारी ही संस्कृति-समीक्षा मराठीत समीक्षेची वाट प्रशस्त करणारी द्रष्टी समीक्षा आहे.’
- डॉ. किशोर सानप