Skip to main content
x

पाटील, मुरलीधर तुकाराम

        मुरलीधर तुकाराम पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील राजोटे या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडील दोघेही अशिक्षित, परंतु त्यांनी मुलांवर चांगले संस्कार केले. पाटील यांचे शालेय शिक्षण यावल येथेच झाल्यानंतर त्यांनी धुळे येथील कृषी महाविद्यालयातून १९७१मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली, तर त्यांनी १९७३मध्ये पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. पदव्युत्तर शिक्षणानंतर लगेचच ऑक्टोबर १९७३मध्ये त्यांनी पुण्यातील कृषी महाविद्यालयातील उद्यानविद्या विभागात साहाय्यक प्राध्यापक या पदावर तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी विविध पदांवर काम करून १९८७-८९ या कालावधीत त्यांच्या आवडीच्या फूलशेती या विषयात म.फु.कृ.वि.त पीएच.डी. केली व पुणे येथील गणेशखिंड संशोधन केंद्रावर पुष्पसुधार योजनेत पुष्प-विशेषज्ञ म्हणून १९८९मध्ये रुजू झाले.

        त्यांचा फुलझाडांच्या संशोधनाचा अनुभव लक्षात घेऊन १९९४मध्ये प्रतिनियुक्तीवर राज्य पणन मंडळाकडे महाराष्ट्र सहकारी पुष्प विकास सोसायटीचे कार्यकारी संचालक म्हणून नेमण्यात आले. या कालावधीत त्यांनी महाराष्ट्रातील फुलांना परदेशी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पणन मंडळामार्फत विशेष प्रयत्न केले व महाराष्ट्रातील मोगऱ्याच्या फुलांची दुबई येथे यशस्वी निर्यात केली. त्यांनी १९८३मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर, बंगलोर व १९८४मध्ये घेतलेल्या इंटरनॅशनल अ‍ॅग्रिकल्चर सेंटर, वॅगॅनिगन, नेदरलँड येथील प्रशिक्षणाचा व ऑर्किड लागवडीसंबंधीच्या प्रशिक्षणाचा या कामात खूप उपयोग झाला. विशेषतः नेदरलँडमध्ये त्यांना परदेशी बाजारपेठांमध्ये लागणाऱ्या फुलांची वर्गवारी, दर्जा, पॅकिंग, साठवणीसाठीचे तंत्रज्ञान या बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करून अनुभव घेता आला व तो या वेळी उपयोगी पडला. याशिवाय इटली येथे प्रक्रिया व अन्नप्रक्रिया उद्योग संस्थापनासंबंधीच्या प्रशिक्षणाच्या कालावधीतही त्यांनी तेथील फुलांची बाजारपेठ, फुलांचा दर्जा, वर्गवारी, काढणीनंतर हाताळणी याबद्दल अवांतर अभ्यास व निरीक्षणे केली. याशिवाय फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, बेल्जिअम, इस्राएल व इजिप्त या देशांच्या प्रवासातही त्यांना हरितगृहातील फूल लागवड व्यवस्थापन परदेशी बाजारपेठा, फुलविक्री व्यवस्थापन व फुलनिर्यातीसंबंधीची निरीक्षणे करता आली. गणेशखिंड केंद्रावर पुष्प-विशेषज्ञ म्हणून काम करत असताना निशिगंधाची ‘फुले रजनी’, ग्लॅडिओलसच्या ‘फुले प्रेरणा’, ‘फुले गणेश’, ‘फुले तेजस’, व ‘फुले निलरेखा’ व अ‍ॅस्टरच्या ‘फुले गणेश, व्हाइट’, ‘फुले गणेश पिंक’, ‘फुले गणेश व्हायलेट’, ‘फुले गणेश ब्ल्यू’ या जातींच्या विकसनामध्ये त्यांचा प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून सहभाग होता. पुण्यातील कृषी महाविद्यालयात इस्राएल देशाच्या मदतीने हायटेक फ्लोरी कल्चर प्रोजेक्ट उभारणीमध्येही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी पुष्पसुधार प्रकल्पात काम करत असताना ग्लॅडिओलस, अ‍ॅस्टर व विशेषतः गुलाबाच्या हरितगृहात व शेतातील लागवड तंत्रे विकसित केली. त्यांनी गुलाबामध्ये केलेल्या संशोधन व विकास कार्याची दखल म्हणून रोझ सोसायटीमार्फत दिले जाणारे डॉ. परांजपे मेमोरियल अ‍ॅवॉर्ड त्यांना १९९५मध्ये देण्यात आले.

        ऑक्टोबर २००१ ते जुलै २००७पर्यंत पाटील प्राध्यापक म्हणून म.फु.कृ.वि., तसेच पुण्यातील कृषी महाविद्यालय व गणेशखिंड फळ संशोधन केंद्र येथे कार्यरत होते. यापैकी २००५ ते २००७मध्ये त्यांनी सहयोगी संशोधन संचालक म्हणून मैदानी प्रदेश, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला. या कालावधीत त्यांनी उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृहातील लागवडीबाबत कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तरांचल या प्रदेशांमधील जवळजवळ १५०० शेतकर्‍यांना ४० प्रशिक्षण सत्रांमधून प्रशिक्षित केले. यांपैकी २५० शेतकर्‍यांनी प्रशिक्षण अमलात आणून स्वतःचे हरितगृह प्रकल्प चालू केले. त्याचबरोबर जवळजवळ २०० कृषी पदविकाधारकांना ६ महिन्यांचे प्रशिक्षण देऊन हरितगृह प्रकल्पात रोजगार मिळवून दिला. त्यांच्या फुलपिकांवरील संशोधनाचा व अनुभवाचा विचार करून २००७मध्ये त्यांची नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.मध्ये डिव्हिजन ऑफ फ्लोरिकल्चर अँड लँडस्केपिंग विभागप्रमुख या पदावर निवड झाली होती. तेथून त्यांनी २००८मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर आदिकॉन सिओटेक्नॉलॉजी लि. मॉरिशस येथे तंत्रसंचालक म्हणून आफ्रिकी राष्ट्रातील शेतकर्‍यांना उसाला पर्याय म्हणून हरितगृहातील फुलशेतीसाठी ते सल्ला देतात. त्यांचे एकूण ५० शास्त्रीय लेख, ४ पुस्तके, ४ क्रमिक पुस्तके, ८ पुस्तकप्रकरणे व ५०च्यावर विस्तारलेख प्रसिद्ध झाले.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

पाटील, मुरलीधर तुकाराम