फडके, रघुनाथ कृष्णाजी
गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे शिल्पकार म्हणून प्रसिद्धीस आलेले रघुनाथ कृष्णाजी फडके विविध गोष्टींत पारंगत होते. ते चित्रकार, कवी, साहित्य विशारद, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व संगीताचे जाणकार, होते. तबलावादनातही त्यांचा हातखंडा होता. नाट्यकलेवरील त्यांचे सडेतोड लेखन विशेष गाजले होते व त्यांच्या मेणाच्या हालत्या चित्रांचे (मूर्तींचे) प्रदर्शन देशातच नव्हे तर परदेशांतही लोकप्रिय ठरले होते.
रघुनाथ फडके यांचा जन्म मुंबईजवळच्या वसई या त्या वेळी आडवळणाला असलेल्या गावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सामान्य कुटुंबात झाला. वडील कृष्णाजी वसईच्या न्यायालयात नोकरीला होते. घराच्या आवारात एक बाग होती व ते ती मनापासून जोपासत. त्यासाठी त्यांनी ठाण्याच्या न्यायालयात बढती मिळूनही ती नाकारली होती. बालपणीच नाना न्हाव्याच्या संगतीत सनई व तबल्याची गोडी रघुनाथ या कोकणस्थ ब्राह्मण मुलाला लागली. याच काळात गणपती बनविण्याच्या कलेतही त्यास गोडी वाटू लागली.
कलाप्रेरित प्रतिभेचा वास बालपणापासून त्यांच्या अंगी असल्यामुळे त्यांना समजू, उमजू लागल्यापासून कोकणातल्या ग्रमीण कलांचा त्यांच्यावर प्रभाव पडू लागला. त्यातच बालपणापासून त्यांना मूर्तिकलेचा छंद लागला व त्या अनुषंगाने ते देवदेवतांच्या मूर्ती घडविण्यात रमू लागले. पुढे शालेय शिक्षणात शालान्त परीक्षेत अपयश आल्यामुळे त्यांनी शाळा सोडली.
लहानपणापासूनच रघुनाथ फडक्यांना देवदेवतांच्या मूर्ती बनविण्याचा छंद होता. पण घरातील आर्थिक परिस्थितीमुळे आर्ट स्कूलमध्ये जाऊन शिक्षण घेणे त्यांना शक्य नव्हते. शेवटी त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत त्यांच्या एका दोस्ताने त्यांना चित्रकार श्रीनिवास राव हरपणहळ्ळी यांची ओळख करून दिली व तेच त्यांचे कलेचे गुरू बनले. श्रीनिवास रावांनी रघुनाथांची उपजत शिल्पगुणांची पारख करून त्यांना शिल्पकला अभ्यासाचे प्रोत्साहन दिले व योग्य मार्गदर्शनही केले. पुढे श्रीनिवास रावांच्या प्रोत्साहनाने त्यांनी ‘प्रवचन’ नावाचे एका वृद्ध माणसाचे शिल्प घडवून १९१४ साली ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात पाठविले आणि त्यांच्या या शिल्पाला सोसायटीचे सुवर्णपदक गव्हर्नरच्या हस्ते मिळाले. या घटनेने फडके, म्हात्रे, तालीम यांच्या सोबतच एक उत्तम शिल्पकार म्हणून प्रसिद्धीस आले. पण हे यश पाहण्यास त्यांचे आई-वडील व पत्नीही हयात नव्हती. हेच शिल्प इंग्लंडमधील वेम्ब्ले व नंतर अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील प्रदर्शनांत भारत सरकारतर्फे पाठविण्यात आले. पण यातून त्यांना शिल्पकलेचे व्यावसायिक काम मिळाले नाही.
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह मनोरमाबाईंशी झाला होता. निर्वाहाचे साधन नव्हते व नोकरी करण्याचा कंटाळा असल्यामुळे अर्थप्राप्तीचा तो मार्गही त्यांनी स्वत:च बंद केला होता. अशात १९१४ मध्ये वर्ष प्रतिपदेला त्यांची पत्नी निवर्तली. त्या वेळी ते तीस वर्षांचे होते. घरातून व मित्रमंडळींकडून पुनर्विवाह करावा असा आग्रह सुरू झाला. पण फडके यांनी त्याला ठाम नकार दिला. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘‘निर्वाहाचे साधन नाही, नोकरी करायची नाही आणि निरनिराळ्या देवदेवतांच्या आकृती बनवायचा छंद सोडायचा नाही अशा विचारांत मी असल्याकारणानं पुन्हा संसार थाटावा असं मला वाटलं नाही.’’ फडक्यांनी आपला मूर्ती बनविण्याचा छंद सुरूच ठेवला आणि ताडदेवला आपला स्टुडीओ थाटला. फडक्यांची ‘हालती चालती मेणाची चित्रे’ हे प्रदर्शन १९१७ च्या दरम्यान मुंबईत सी.पी. टँक येथील रामबागेत भरले. या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यातून फडक्यांना अर्थप्राप्तीही होऊ लागली व ते अशी प्रदर्शने नियमितपणे भरवू लागले. या प्रदर्शनांत देवदेवतांच्या मूर्तींसोबतच तत्कालीन नेते, शेतकरी जोडपे, वृद्ध भिकारीण, मंदिरात जाणारी युवती अशा विविध मूर्ती असत.
या प्रदर्शनाचा मोठा फायदा म्हणजे त्यांची लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांसारख्या देशभक्तांशी ओळख झाली आणि या ओळखीतनूच लोकमान्य टिळकांनी त्यांना पुण्याच्या शिवाजी मंदिरासाठी शिवछत्रपतींच्या अर्धपुतळ्याचे काम दिले. इतकेच नाही, तर लोकमान्यांनी स्वत: त्यांना स्मारक पुतळा कसा असावा याचे उद्बोधक ज्ञान दिले. पुढे लोकमान्य टिळकांचे व्यक्तिशिल्प त्यांना समोर प्रत्यक्ष बसवून करण्याचे भाग्य त्यांना मिळाले.
पुढील काळात फडक्यांच्या विनंतीवरून व्यक्तिशिल्प घडविण्यासाठी महात्मा गांधींनीही त्यांना प्रत्यक्ष सिटिंग देण्याचे मान्य केले होते; पण तसा योग आला नाही. काही दिवस आपल्याकडे येऊन रेखाचित्रे काढण्याची परवानगी त्यांनी फडक्यांना दिली होती. त्या संधीचा फायदा घेऊन फडक्यांनी गांधींची रेखाचित्रे काढली होती.
या काळात फडक्यांनी आपली मुंबईतील सी.पी. टँकजवळील रामबागेतील प्रदर्शने अर्थप्राप्तीसाठी सुरूच ठेवली होती. ती बघण्यास प्रेक्षकांची अलोट गर्दी होत असे. हे प्रदर्शन केव्हा उघडणार, किती दिवस चालणार व कधी बंद होणार याची माहिती वृत्तपत्रात छापून येई. ही प्रदर्शने १९१७ ते १९२७ अशी दहा वर्षे सातत्याने भरली. इंग्लंडमधील वेम्ब्ले येथे १९२५ मध्ये मोठे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरले होते. विविध देशांतील उद्योजक व कलावंत त्यात सहभागी झाले होते. त्यात फडक्यांनी ‘मेणाच्या हालत्या चित्रांचे प्रदर्शन’ पाठविण्याचे ठरविले. स्वत:ला दडवून ठेवण्याच्या सवयीनुसार स्वत: फडके इंग्लंडला गेले नाहीत; पण त्यांनी आपले शिष्य व व्यवस्थापक केशव बाबूराव लेले यांना इंग्लंडला पाठविले. तेथील प्रदर्शनातही ही मेणाची हालती चित्रे लोकप्रिय ठरली.
अमेरिकेला स्वातंत्र्य मिळून दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९२६ मध्ये फिलाडेल्फिया येथे एक प्रचंड प्रदर्शन भरले होते. त्या प्रदर्शनाने सुमारे साडेसातशे एकर जमीन व्यापली होती व जगातील सर्व राष्ट्रांनी त्यात भाग घेतला होता. तिथे फडके यांच्या मेणाच्या हालत्या चित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रेक्षकांचे थवेच्याथवे लोटत असत.
या प्रदर्शनातील हिंदमाता, महात्मा गांधींचा कारावास व महात्माजींची शस्त्रक्रिया या शिल्पाकृती प्रेक्षकांच्या प्रशंसेचा विषय ठरल्या. महात्मा गांधी येरवड्याच्या तुरुंगात असतानाच त्यांची अॅपेंडिसायटीस शस्त्रक्रिया कर्नल मॅडॉक याने १२ जानेवारी १९२४ रोजी केली होती. तो प्रसंग बघून प्रेक्षक थक्क होत असत! त्यांच्या ‘हिंदमाता’ या शिल्पात पार्श्वभूमीला भारताचा नकाशा असून त्यापुढे नऊवारी साडी नेसलेली दु:खी हिंदमाता देशबंधू दास यांचे शव दोन्ही हातांवर घेऊन उभी होती. तिची शोकाकुल दृष्टी देशबंधूंच्या चेहऱ्यावर स्थिर असून मूर्तीच्या मागील बाजूस दोन गोलाकारांत दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक व लाला लजपतराय या हिंदमातेच्या दिवंगत पुत्रांच्या प्रतिमा होत्या. यावरील प्रकाशयोजना अशी होती की, हिंदमातेच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू चमकत... कोणत्याही देशप्रेमी माणसाच्या हृदयाला चटका लावणारे ते दृश्य होते. फिलाडेल्फियाच्या महापौरांनी तर अनेकांना हे प्रदर्शन व हा प्रसंग बघण्याची शिफारस केली. त्यांनी एक प्रशस्तिपत्र स्वहस्ते लिहून फडक्यांना पाठविले. हे प्रदर्शन १ जुलै १९२६ रोजी सुरू झाले व ३० नोव्हेंबर १९२६ रोजी बंद झाले. या प्रदर्शनासोबतच फडक्यांनी त्यांचे समकालीन चित्रकार परांडेकर, हळदणकर, वा.गो. कुलकर्णी यांची चित्रेही प्रदर्शित केली होती.
या प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे उत्साहित होऊन लेले यांनी तसेच प्रदर्शन मुंबईत भरविण्याचे ठरविले व १९२७ च्या नोव्हेंबर महिन्यात ते सी.पी. टँक येथील रामबागेत भरले. या प्रदर्शनाला ४ आणे तिकीट ठेवले होते व त्यात फडक्यांच्या मेणाच्या हालत्या चित्रांसोबतच तालीम यांची शिल्पे व अनेक चित्रकारांची चित्रे मांडली होती. यांतील फडक्यांच्या प्रदर्शनाबद्दल लिहिताना ११ नोव्हेंबर १९२७ च्या ‘हेरल्ड’ वृत्तपत्राने म्हटले होते, ‘मि. फडके यांचा महात्माजींच्या शस्त्रक्रियेवरील पुतळ्यास जगभर प्रसिद्धी मिळाली आहे.’ खरोखरीच या मेणाच्या मूर्ती हलत्या व जिवंत वाटाव्यात अशा प्रकारच्या असत. यातून अर्थार्जनासोबतच धन, कीर्ती व सामान्य माणसांकडून कौतुकाचा वर्षाव होई. पण या सर्व खटाटोपात शरीराला शीण व मनाला वैताग येतो, असे फडके म्हणत.
फडक्यांना त्यांचे टीकाकार ‘वॅक्स मॉडेलर’ म्हणत व मॅडम तूसाच्या लंडनमधील प्रदर्शनाशी तुलना करत. अप्रतिम सादृश्य, असाधारण तंत्रकौशल्य असूनही त्याला प्रतिष्ठा नव्हती. या परिस्थितीमुळे फडके कंटाळले. त्यात भारतीय पुनरुत्थानाला बळ देणार्या बी.जी.हॉर्निमन या गोऱ्या संपादकांनी जळजळीत शब्दांत फडक्यांना समज दिली, ‘‘फडके, तुम्ही शिल्पकार आहात. मेणाच्या बाहुल्या बनविणारे कसबी कारागीर नव्हेत.’’ हे शब्द व त्यामागची कळकळ फडक्यांना झोंबली व मेणाच्या हालत्या चित्रांच्या प्रदर्शनामुळे धन, कीर्ती व कौतुक यांच्या शिखरावर असलेला हा शिल्पकार अस्वस्थ झाला. त्यातच त्यांचे या प्रदर्शनाचे व्यवस्थापन बघणाऱ्या दोन शिष्यांशी मतभेद झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी या प्रदर्शनाचे पैशांचे झाड मुळासकट उपटून फेकून दिले व १९२७ पासून हे प्रदर्शन बंद केले. त्यानंतरच्या पंचेचाळीस वर्षांच्या त्यांच्या आयुष्यात विपन्नावस्थेत असतानाही अनेक मित्र व हितचिंतकांनी या हालत्या चित्रांच्या कामधेनूकडे वळण्याचा अनेकदा सल्ला देऊनही ते त्याकडे कधीच वळले नाहीत. मनस्वी व हट्टी स्वभावाच्या या शिल्पकाराने प्रसिद्धी व द्रव्याकडे निग्रहाने पाठ फिरवली.
याच काळात ‘रत्नाकर’ मासिकाच्या अप्पासाहेब गोखल्यांमुळे ते साहित्य क्षेत्रात रमू लागले. मासिक ‘मनोरंजन’ व ‘नवनीत’च्या संपादकांशी त्यांचा स्नेह जुळला व फडक्यांचा ताडदेव येथील स्टुडीओ हे साहित्य, संगीत, चित्रशिल्प, ज्योतिषविद्या व नाटक कंपन्यांचे विसाव्याचे स्थान बनले आणि शिल्पकार फडके हे साहित्यिक व मर्मभेदी टीका करणारे ‘टीकाकार फडके’ म्हणून प्रसिद्ध झाले. पण लेखनातून पैसे मिळत नव्हते व स्टूडिओचा खर्च तर सुरूच होता.
फडक्यांना १९३२ मध्ये त्यांचे दैवत असलेल्या लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटीवरील पुतळ्याचे काम मिळाले. या पूर्णाकृती पुतळ्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व ओतले. जवळ साठवलेला पैसा फारसा नव्हताच. त्यांना स्मारक समितीकडे वारंवार पैशांची मागणी करावी लागे. अखेर पुतळा पूर्ण झाला. ब्रॉन्झमध्ये ओतकामासाठी पुन्हा पैशांचा प्रश्न उभा राहिला. अशा परिस्थितीत स्मारक समिती पैसे देईना व फडकेदेखील इतर कुणाकडे उधार मागेनात. त्यांची मन:स्थिती व प्रकृती बिघडली. स्टुडीओ विकला जाणार, लिलाव होणार अशी बातमी पसरली. हे कळताच बाबूराव पेंटरांनी मुंबईला धाव घेतली. रातोरात पुतळ्याचे मोल्ड खटाऱ्यात भरले व कोल्हापूरला रवाना केले. फडक्यांची रवानगीदेखील कोल्हापूरला झाली. तिथेच तो पुतळा ब्रॉन्झमध्ये ओतला गेला व गिरगाव चौपाटीवर लोकमान्यांचे स्मारक उभे राहिले.
पुतळ्याचे अनावरण झाले, त्याप्रसंगी हजारो नजरा त्या पुतळ्यावर खिळल्या होत्या. पण शिल्पकार मात्र अनुपस्थित होता. हा धक्का जबरदस्त होता. पुढील आयुष्यातही फडके ‘‘बाबूराव पेंटरांमुळे माझा टिळकांचा पुतळा उभा राहिला,’’ असे कृतज्ञतापूर्वक म्हणत. चौपाटीवरचा लोकमान्य टिळकांचा पुतळा पाहून हॉर्निमन म्हणाले, ‘‘फडके, आता मी तुला शिल्पकार म्हणेन, स्कल्प्टर फडके; मेणाच्या बाहुल्या करणारा नव्हे...’’
एव्हांना फडक्यांची आर्थिक परिस्थिती पार बिघडली होती. अशा अकिंचन अवस्थेत असतानाच त्यांना धारचे दिवाण सर नाडकर यांनी आमंत्रित केले आणि धारचे दिवंगत नरेश श्रीमंत उदाजीराव पवार यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम दिले. तेव्हापासून फडके धारमध्ये स्थायिक झाले. तेथील खंडेराव टेकडीवर असलेल्या कॉटेजेसचे निवासस्थान व स्टुडीओत रूपांतर झाले. हळूहळू फडक्यांकडे शिकण्यासाठी विद्याथीं येऊ लागले व त्यांचा शिष्यपरिवार तयार झाला. शिल्पकार फडके यांची पाच दैवते होती: वडील कृष्णाजी, सनई वादनकार नाना पंडित, चित्रकलेतील गुरू श्रीनिवास राव हरपणहळ्ळी, भास्करबुवा बखले आणि लोकमान्य टिळक. वयाची सत्तरी ओलांडल्यावर त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले. धारच्या खंडेराव टेकडीवर येणाऱ्या वळणदार रस्त्याला त्यांच्या हयातीतच ‘शिल्पकार फडके मार्ग’ ही पाटी लागली. त्यांनी खुद्द बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर व भेंडीबाजारवाले अमानअलीखाँ अशा अनेकांना तबल्याची साथ केली. ते भास्करबुवा बखल्यांना केलेल्या तबल्याच्या साथीच्या आणि लोकमान्य टिळक या दैवताच्या आठवणीत रमत. देहाने ते १९३३ पासून धारला होते; पण ते मनाने मुंबईत आणि तेथील आठवणींत कायम रमले.
टीकाकार म्हणून त्यांच्या तावडीतून तत्कालीन आधुनिक पद्धतीने चित्र-शिल्प निर्मिती करणारे कलावंत, नाट्याचार्य खाडिलकर व राम गणेश गडकऱ्यांसारखे नाटककारही सुटले नाहीत. बालगंधर्वांवरही त्यांनी टीका केली होती. ‘नाट्यपरामर्श’ हा त्यांचा संग्रह त्या काळी विलक्षण गाजला.
आपल्या जीवनावर बोलताना ते म्हणत, ‘‘संसाराची माती झाली; पण मातीनेच जीवनाचे सोने केले.’’ अशा या बहुुश्रुत व्यक्तिमत्त्वाचे १९७२ मध्ये खंडेराव टेकडीवरील घरात निधन झाले. धार येथे खंडेराव टेकडीवर शिल्पकार फडके यांच्या स्टूडिओत त्यांचा शिल्पसंग्रह पाहता येतो.
- प्रा. विठ्ठल शानभाग