Skip to main content
x

फडके, यशवंत दिनकर

      यशवंत दिनकर फडके यांचा जन्म सोलापूरला झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय कीर्तनकार होते. वडिलांचे कुटुंबाकडे व मुलांकडे लक्ष नव्हते. मुलांची आबाळच झाली. जोडीला कठीण आर्थिक स्थिती असल्यामुळे लहानपणी दारिद्य्राचे चटके सहन करावे लागले. त्यामुळे अतिशय धडपड करून फडक्यांना शिक्षण घ्यावे लागले. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी सोलापूर येथेच घेतले. शालेय शिक्षण घेत असतानाच य.दि. फडके यांनी द्वा.भ. कर्णिक यांच्या ‘संग्राम’ या वृत्तपत्रात लेखन सुरू केले होते. १९४७ साली मॅट्रिक, १९५१ साली बी.ए. (राज्यशास्त्र विषय घेऊन) आणि १९५३ साली राज्यशास्त्र विषय घेऊन ते एम.ए .झाले. तल्लख बुद्धी असल्याने त्यांना शासकीय महाविद्यालयात अध्यापनाची संधी मिळाली.

     अभ्यासाचा-व्यासंगाचा विषय राज्यशास्त्र हा असल्याने फडक्यांना अवती-भवतीच्या राजकीय स्थिति-गती, घटनांचे बारकाईने अवलोकन व चिंतन करण्याची सवय लागली. महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापन करताना ह्या स्थितिगती-घटनांचे ते सूक्ष्म विश्लेषण करीत असत. हे विश्लेषण करताना वस्तुस्थिती, पुरावे ह्यांचा भक्कम आधार ते घेत असत. जोडीला भेदक, तिखट पण नेमकी वक्तृत्वशैली त्यांना लाभलेली असल्याने सर्व विश्लेषण सर्जक होत असे.

     त्यांचा महाविद्यालयातील अध्यापनाचा काळ संयुक्त महाराष्ट्राच्या ऐन आंदोलनाचा होता. त्यामुळे त्यांचे अवघे लक्ष ह्या आंदोलनाचा बारकाईने अभ्यास करण्याकडे लागले होते. तोच त्यांच्या प्रबंधाचा विषय झाला. ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि काँग्रेस पक्ष’ ह्या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी १९७३ साली मिळवली. मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात, प्रथम अधिव्याख्याता नंतर प्रपाठक (रीडर) म्हणून; पुढे पुणे विद्यापीठात ‘महात्मा गांधी अध्यासनाचे’ प्राध्यापक म्हणून; नंतर मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ ह्या संस्थेत सामाजिक शास्त्रांचे प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. जवळपास पस्तीस वर्षे त्यांनी अध्यापनाचे काम केले.

     संयुक्त महाराष्ट्र चळवळीला काही फक्त राजकीयच अंग नव्हते- ते तर होतेच पण त्याशिवाय त्या चळवळीला सामाजिक, ऐतिहासिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिमिती होत्या. महाराष्ट्राच्या अवघ्या जीवनाच्या धमन्यांतूनच ही चळवळ वाहत होती. फडक्यांनी प्रबंधलेखन करताना ह्या सर्व परिमितींचा धांडोळा सूक्ष्मपणे घेतला आहे. त्यांचा प्रबंध हा सर्जनशीलतेचा वस्तुपाठच झाला आहे.

     ह्या अभ्यासामुळेच ते विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे वळले. स्वतःच्या आयुष्याशी समांतर वाहणार्‍या काळाचे सम्यक-वस्तुनिष्ठ आकलन होणे हे अत्यंत कठीण असते. फडक्यांना ते आकलन सर्वांगांनी झाले होते. त्या राजकीय इतिहासाचे आठ खंड १९०१ पासून १९६३पर्यंत त्यांनी लिहिले. ‘सासवड आश्रम ट्रस्ट’च्या वतीने त्यांनी हे काम जवळपास बारा-चौदा वर्षे केले. एखाद्या योग्यासारखीच ही तपश्चर्या होती. त्यांचे निधन झाले नसते, तर त्यांनी इ.स.२०००पर्यंतचा राजकीय इतिहास पूर्ण केला असता. म्हणजे आणखी तीन-चार खंड झाले असते. हे कार्य खरे तर एकट्या-दुकट्याचे नव्हे -अनेक अभ्यासकांनी करण्याचे आहे- तेही अनेक वर्षे चिकाटीने-जिद्दीने! तसा प्रयत्न फडक्यांनी केला होता, पण तो यशस्वी झाला नाही. म्हणून ते स्वतः एक हाती ह्या कामामागे अहर्निश लागले होते. त्यात अनेक धोके व मर्यादा असतात, त्या गृहीत धरून जेवढे जमेल, तेवढे करावे असे ठरवून त्यांनी काम सुरू केले. राजकीय जीवनावर शेतकरी, शेतमजूर, जमीनदार, व्यापारी, कारखानदार, कामगार, बुद्धिजीवी वर्ग, मध्यम वर्ग - ह्या सर्वांचे आर्थिक संबंध, विविध धर्म-जातींमुळे उत्पन्न होणारे दैनंदिन संघर्ष, पारतंत्र्यावस्था, स्वातंत्र्यप्राप्ती, शहरांची औद्योगिक वाढ, दुष्काळ, भूकंप, वादळे, अतिवृष्टी, दलित आंदोलने, जागतिक महायुद्धांची लागलेली झळ; नेते, शासन, नोकरशाही अशा गोष्टींचा परिणाम होत असतो - ह्या व्यामिश्र चक्रव्यूहाचे भान फडक्यांना कसे अचूक होते; ते त्यांनी ह्या खंडांना ज्या प्रस्तावना लिहिल्या आहेत, त्यावरून कळून येते.

     फडके हे संशोधनाच्या क्षेत्रात न.र.फाटक ह्यांच्या पठडीतले होते. फाटकांनीच फडक्यांना आगरकरांचे चरित्र लिहिण्याची जाहीर सूचना केली होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या संग्रहातील आगरकरांचा खासगी पत्रव्यवहार आणि काही दुर्मिळ ग्रंथ त्यांनी फडक्यांना ह्या चरित्र लेखनासाठी दिले मार्गदर्शनही केले होते. ‘समाजस्वास्थ्यकार र.धों. कर्वे ह्यांचे चरित्र लिहा’ असे फाटकांनीच फडक्यांना सुचवले होते. दुर्गा भागवतांनी फडक्यांना र.धों.कर्व्यांनी लिहिलेल्या पत्रांचा एक जुडगाच चरित्रलेखनासाठी देऊन टाकला होता. ही सर्व पत्रे कर्व्यांनी गोव्याच्या रवींद्र केळेकरांना लिहिलेली होती. फडके फाटकांप्रमाणेच भक्कम आधाराच्या साहाय्याने परखड लिहीत असत. फाटकलिखित ‘आदर्श भारतसेवक’ (१९६७, गोपाळ कृष्ण गोखल्यांचे चरित्र) ह्यात फाटकांनी किती गफलती केल्या आहेत, हे फडके तपशीलवार दाखवतात आणि फाटकांच्या पदरात सर्व दोषांचे माप घालतात; आणि फडके लिहितात- ‘होमरही कधी-कधी पेंगतो’ अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. तसे कधी-कधी प्रा.फाटकांचे झाले आहे.

     एखादे पुस्तक लिहिताना फडके किती बारकाईने खोलवर संशोधन करतात त्याचे नमुने पाहण्यासाठी ‘शोध सावरकरांचा’, ‘र.धों.कर्वे’ ही पुस्तके मुद्दाम पाहावीत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि १९८१ बाबाराव सावरकर त्यांच्यासंबंधीच्या सर्व कागदपत्रांचा महाराष्ट्र शासनाच्या मुंबई येथील अभिलेखागाराच्या कार्यालयात दिवस न् दिवस बसून धांडोळा घेतला त्यांची टिपणे काढली. सावरकरांवरील पुस्तकासाठी त्यांनी १९ इंग्रजी पुस्तके; ७ हिंदी पुस्तके; ३६ मराठी पुस्तके सावरकरबंधूंबद्दलच्या माहितीसाठी वाचली होती. ‘र.धों.कर्वे’ चरित्रासाठी असेच अनेक तपशील पाहिले होते. ‘समाजस्वास्थ्य’चे सर्व वर्षांचे अंक वाचून काढले. इतर तेरा इंग्रजी-मराठी ग्रंथांचा संदर्भ-साहित्य म्हणून अभ्यास केला. डॉ. आंबेडकर आणि त्यांचे कार्य हाही त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. ‘Worshipping False Gods’ ह्या अरुण शौरी लिखित पुस्तकाचा त्यांनी भेदक परामर्श ‘डॉ.आंबेडकरांचे मारेकरी: अरुण शौरी’ (१९९९) ह्या पुस्तकात घेतला आहे. ‘डॉ.आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह’ (१९८६); ‘डॉ. आंबेडकर आणि इंडियन नॅशनल काँग्रेस’ (१९८६) अशी पुस्तके फडक्यांनी लिहिली आहेत.

     चरित्रकार आणि इतिहासकार अशा दोन अंगांनी फडके प्रसिद्ध होते. ‘शोध बाळगोपाळांचा’(१९७७), ‘केशवराव जेधे’ (१९८२), ‘अण्णासाहेब लठ्ठे’(१९९०), ‘कहाणी सुभाषचंद्रांची’ (१९८६) इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. वस्तुनिष्ठ, आणि निःपक्षपाती, स्पष्ट, परखड असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप असे. त्याबरोबरच ते निर्भीड असे. स्वा.सावरकर, सेनापती बापट, बाबाराव सावरकर ह्यांची देशभक्ती आणि त्याग ह्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्यासंबंधीचे लेखन त्यांनी केले. त्यांनी लिहिलेले ‘आगरकर’ हे चरित्र उत्कृष्ट चरित्राचा आदर्श आहे.

     त्यांनी केलेले ललितलेखनही लक्षणीय आहे. ‘दृष्टादृष्ट’(१९९२), ‘शोधता शोधता’ (१९९५), ‘व्यक्तिरेखा’ (१९९८), ‘नाही चिरा, नाही पणती’ (२०००), ‘स्मरणरेखा’ (१९९८) ही त्यांची ललित पुस्तके प्रसिद्ध आहेत.

    ‘चरित्रात्मक कादंबरी’ ही संकल्पना त्यांच्या दृष्टीने भोंगळ होती. गंगाधर गाडगीळांची ‘दुर्दम्य’ ही कादंबरी नसून ते ‘टिळक चरित्र’ आहे त्यांचा ठाम आग्रह होता. अलीकडे श्री.अशोक टिळक (रेव्हरन्ड नारायण वामन टिळक ह्यांचे नातू) ह्यांनी लिहिलेली ‘चालता बोलता चमत्कार’ ही कादंबरी नसून ते ‘रेव्हरन्ड टिळकांचे चरित्र’ आहे, हे त्यांनी त्या पुस्तकाच्या (२०००) प्रकाशनप्रसंगी स्पष्टपणे बजावले होते. हे बजावतानाही त्यांच्या स्वभावातील कोणत्याही गोष्टीकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याचे वैशिष्ट्यच व्यक्त झाले होते. सावरकरांवर विश्राम बेडेकर पटकथा लिहीत होते, तेव्हा ते फडक्यांना भेटले होते. फडक्यांनी त्यांना सावरकरांबद्दल कितीतरी संदर्भ पुरवले होते, पण त्याबद्दलचा उल्लेखही बेडेकरांनी कुठे केला नाही ह्याचा त्यांना खेद वाटला होता. डॉ.स.गं.मालशांशी लोकहितवादींच्या संदर्भात त्यांचा थोडाफार वाद झाला होता.

     ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’चे ते काही वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीतच ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’ ह्या ग्रंथाच्या सुधारित चौथी आवृत्ती - १४ एप्रिल, १९९१ (१००००प्रती) आणि सुधारित पाचवी आवृत्ती,- २८ नोव्हेंबर, १९९१ (१००००प्रती) अशा दोन आवृत्त्या केवळ सहा महिन्यांत प्रसिद्ध होऊन अल्पावधीतच विकल्या गेल्या. हा एक विक्रमच होता.

    २००० साली बेळगाव येथे जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले, त्याचे ते बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष होते. त्यांच्या भाषणात सीमावादाचा ऊहापोह त्यांनी केला होता. एशियाटिक सोसायटी, मुंबई ह्या संस्थेने त्यांना सन्माननीय सदस्यत्व दिले होते.

    संशोधक, व्यासंगी, विश्लेषक, निःस्पृह असे त्यांचे विशेष होते.

- डॉ. चंद्रकांत वर्तक

फडके, यशवंत दिनकर