Skip to main content
x

फणसळकर, रजनी नारायण

                नारायण व नलिनी फणसळकर यांची कन्या रजनी यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. बालपणापासूनच चित्रकलेची आवड व घरातून प्रोत्साहन असल्यामुळे त्यांनी शालेय वयातच १९५९, १९६०, १९६१ मधले ‘शंकर्स वीकली’ पुरस्कार, तसेच १९६० साली ‘टाइम्स ऑफ इंडिया’चा स्त्री-कलाकाराचा पुरस्कार मिळविला. रजनी फणसळकरांनी पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात कलाशिक्षण घेतले व १९६८ मध्ये जी.डी. आर्ट,  १९७० मध्ये आर्ट मास्टर व १९८२ मध्ये एम.ए. फाइन आर्ट ही पदवी प्राप्त केली. त्यांनी १९६९ पासून १९९९ पर्यंत एस.एम. जोशी हिंदी हायस्कूल येथे चित्रकला शिक्षिका म्हणून, तर १९९९ ते २००३ पर्यंत मुख्याध्यापिका म्हणून काम केले.

              शिक्षण सुरू असताना भारतीय शैलीत काम करणारे ज्येष्ठ चित्रकार ए.ए. आलमेलकर यांच्या चित्रांपासून रजनी फणसळकर यांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर भारतीय शैलीची वैशिष्ट्ये व आधुनिक पद्धतीने रेषेचा वापर करीत त्यांनी स्वत:ची अशी काहीशी नक्षीकामाकडे झुकणारी शैली विकसित केली. आयुष्यभर निष्ठेने याच प्रकारची चित्रे काढून त्यांनी कागद व कॅनव्हासवरील चित्रे, भित्तिचित्रे (म्यूरल्स), मासिकांची सजावट व मुखपृष्ठे यांद्वारे भारतीय संस्कृती, सण, परंपरा, तत्त्वज्ञान, जनजीवन यांच्याशी संबंधित विषय चित्रांकित केले.

              रेषा, रंगांचे बारीक-बारीक ठिपके व पोताचा नाट्यपूर्ण वापर आणि या सर्वांच्या संयोजनातून निर्माण होणारा लालित्यपूर्ण आकार ही रजनी फणसळकर यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये होत.

              अशा प्रकारची चित्रे १९६० च्या दशकात पुण्यात प्रथम प्रा. डी.सी. लेले, प्रा. डी.एस. खटावकर व त्यानंतर रजनी फणसळकर व सुदाम डोके यांनी करण्यास सुरुवात केली. पुढे या प्रकारची काहीशी नक्षीकामासारखी भासणारी चित्रे हे पुण्याचे वैशिष्ट्यच ठरले. काही काळानंतर ही लाट ओसरली; पण रजनी फणसळकर निष्ठेने १९६८ पासून याच शैलीत काम करीत आहेत.

              रजनी फणसळकर यांना भारतीय शैलीसाठी असणारे ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे पुरस्कार १९६८, १९७०, १९७१, १९७३ व १९८७ या वर्षी मिळाले असून भारतातील इतर अनेक स्पर्धात्मक प्रदर्शनांतून त्यांची चित्रे पारितोषिकप्राप्त ठरली आहेत.

              पुण्यातून प्रकाशित होणार्‍या मासिकांत, दिवाळी अंकांत त्यांनी गेली अनेक वर्षे सजावटीचे काम केले असून राजा केळकर म्युझियम , विश्रामबागवाडा शिवसृष्टी प्रकल्प, पुणे अशा ठिकाणी भित्तिचित्रण प्रकल्पांत त्यांचा सहभाग होता.

              पुणे जिल्हा परिषद व पुणे महानगरपालिकेतर्फे त्यांना ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार मिळाला आहे.

- प्रा. सुधाकर चव्हाण

फणसळकर, रजनी नारायण