Skip to main content
x

राजवाडे, विश्वनाथ काशिनाथ

    छत्रपती श्रीशिवाजी-महाराजांच्या काळी या घराण्यातील कोणी गृहस्थ महाराजांच्या पदरी, राजवाड्यातील खासगी नोकरीवर होता. त्यामुळे या घराण्याचे नाव ‘राजवाडे’ पडले असे काही जण म्हणतात. कोकणात ‘राजवाडी’ नावाचे गाव आहे. या गावावरून घराण्यास ‘राजवाडे’ हे नाव पडले असावे असे शंकर रामचंद्र राजवाडे यांचे मत आहे.

     राजवाडे घराण्याचे गोत्र शांडिल्य आहे. निंबे हे या घराण्याचे कोकणातील मूळ गाव आहे. कित्येक वर्षांपूर्वी ऐतिहासिक कागदपत्रांचे संशोधन करण्यासाठी वि. का. राजवाड्यांनी कोकणात प्रवेश केला. ठिकठिकाणच्या घराण्यांच्या मुख्यांकडून जुने कागदपत्र मिळवले. त्यांना तिथे गावासंबंधी काही जुने कागदपत्र मिळाले. ते राजवाडे संशोधन मंदिरात अजूनही सुरक्षित आहेत.

     राजवाड्यांच्या पणज्याचे नाव काशीनाथ. आज्याचे नाव बापजी, वडिलांचे नाव काशीनाथ होय. राजवाड्यांचे मातुल घराणे कोकणातील वरसाई गावचे.

     त्यांना एक वडील भाऊ होता, त्याचे नाव वैजनाथ. पुढे हेच वैजनाथ ‘अहिताग्नि राजवाडे’ म्हणून प्रसिद्ध झाले. वैजनाथ व विश्वनाथ यांचे प्राथमिक शिक्षण शनिवारातील रामभाऊ जोगळेकर यांच्या तिसर्‍या क्रमांकाच्या वाड्यासमोरील भाव्यांच्या शाळेत झाले. डेक्कन महाविद्यालयामधून मुंबई विश्वविद्यालयाची बी.ए.ची परीक्षा त्यांनी दिली. राजवाड्यांचे वडील पुण्यास वकिलीचा व्यवसाय करत. राजवाडे कुटुंबाची सांपत्तिक स्थिती अगदी सामान्य प्रकारची होती. राजवाडे यांचे लग्न इ.स.१८८८मध्ये पुणे येथील विष्णू नारायण गोडबोले यांच्या मुलीशी झाले. बायकोचे माहेरचे नाव मंथूताई व सासरचे नाव अन्नपूर्णा होते. सन १८९१मध्ये, मार्च महिन्यात त्यांना एक मुलगा झाला. पण तो दोन महिन्यांचा असतानाच वारला. अन्नपूर्णांचे दुसरे बाळंतपण हे अपुरे दिवसांचे झाले. इ.स.१८९२ साली एक मुलगी झाली पण प्रसूतीनंतर अन्नपूर्णा बाई व नूतन जन्मलेल्या मुलीचा अंत झाला.

     इ.स.१८८६ पासून म्हणजे मुळाक्षरे गिरविण्यापासून  ते १८९० पर्यंत त्यांनी अनेक शाळा बदलल्या व उच्च शिक्षणार्थ डेक्कन महाविद्यालयात प्रवेश केल्यानंतरही त्यांची कधी वर्गात नियमित हजेरी नव्हती. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी काही दिवस शिक्षकाची नोकरी केली. पण इ.स.१८९२च्या ऑगस्टमध्ये त्या जागेचाही राजीनामा दिला.

     आता राजवाड्यांचा, अस्सल व विश्वसनीय इतिहाससाधने शोधण्याच्या धडपडीला प्रारंभ झाला. कोल्हापूर येथे कै. अण्णा विजापूरकर यांनी ‘समर्थ’ वर्तमानपत्र काढायला प्रारंभ केल्यानंतर राजवाडे यांचे बरेच लेख त्यातून प्रसिद्ध झाले.

    जानेवारी १८९४मध्ये राजवाड्यांनी ‘भाषांतर मासिक’ सुरू केले. हे मासिक इ.स.१८९७पर्यंत चालले व पुढे बंद पडले. इ.स.१८९५मध्ये श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड यांनी ‘भाषांतर’ मासिकाच्या प्रती दरसाल विकत घेण्याचा उपक्रम सुरू केला. त्यांनी इ.स.१८९७ पासून मराठ्यांच्या इतिहासाची साधने लिहायला प्रारंभ केला व १८९९मध्ये ते काम पूर्ण केले. हा अंक तीनदा छापला. नंतर एका पाठोपाठ एक ‘मराठ्याच्या इतिहासाची साधने’ प्रकाशित होत राहिली.

     जेव्हा राजवाडे मंदिराची कोनशिला बसवायला प्रारंभ झाला त्या दरम्यान राजवाडे यांनी वेगवेगळे लेख लिहून राष्ट्रभर पाठवण्याचा उपक्रम सुरू केला. त्या वेळेला प्रसिद्धीची साधनेही कमी होती. इतिहासाचार्य म्हणून त्यांनी जी कामगिरी केली, त्याला खरोखर जोड नाही. वेदांवरचे १५३ ग्रंथ, पूर्वमीमांसेचे ७ ग्रंथ, याजिकाचे ५२९ ग्रंथ, धर्मावरचे १२४ ग्रंथ, वेदान्तावरचे १६६ ग्रंथ, मराठीत वेदान्तावरचे १३२ ग्रंथ, मराठी काव्यावरचे २१६ ग्रंथ, धर्मावरचे ४ ग्रंथ, मराठीत याज्ञिकीवरचे १३ ग्रंथ, योगावरचा एक ग्रंथ, मराठीतले नीतिग्रंथ ११, मराठी तंत्रावर ४, मराठी वैद्यकावरचे १८ ग्रंथ, मराठी ज्योतिषावरचे १८ ग्रंथ, मराठी पुराणावरचे १२ ग्रंथ, माहात्म्यावरचे १७ ग्रंथ, भटितसाहित्यावरचे २२, रामदासी साहित्याचे २२ ग्रंथ, मराठी व्याकरणावरचा एक, मराठी भूगोलावरचा एक व मराठी छंदावरचा एक, अंकगणितावरचे ३, मराठी कोषावरचा एक, बुद्धिबळावरचा एक, सामुद्रिकावरचे दोन, मराठी बाडावरचे २६ ग्रंथ, मराठीचे छापील ग्रंथ ९, व्रजभाषा २६ ग्रंथ, कानडी ग्रंथ ४, व महानुभवी ग्रंथ ३, ‘मराठी इतिहासाची साधने’चे सहा व इतिहासावरचे शेकडो लेख लिहिले. आयुष्यभर त्यांनी ग्रंथ जमा करण्याचा व लेखनाचा विचार केला. राजवाड्यांची, श्री. नानासाहेब देव व भा. वा. भट यांच्याशी सातारा येथे पहिली भेट झाली व त्यांच्यापासून नानासाहेब देवांनी जुन्या दासबोधाची एक हस्तलिखित प्रत व गिरीधरच्या कवितांच्या हस्तलिखित बाडांची प्राप्ती केली.

    श्री. वि. का. राजवाडे यांचे लेखन फार आहे. त्यांच्या केवळ समग्र साहित्याचेच १३ खंड निघाले आहेत. (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, १३ खंड, संपादक डॉ. मु. ब. शहा) त्याव्यतिरिक्त त्यांनी केलेल्या ‘मराठ्याच्या इतिहास साधने’चे २१ खंड व प्रचंड पत्रव्यवहार बाकी राहतोच. डॉ. रा. चिं. ढेरे म्हणतात ते सर्वथा खरे आहे की ‘मानव्य विद्यांपैकी अशी एकही विद्या नसावी, जिला राजवाड्यांचा प्रज्ञास्पर्श झालेला नाही. या सर्व विद्याशाखांविषयी त्यांनी केलेल्या चिंतनाची आणि लेखनाची मूलगामी समीक्षा अजूनही बाकी आहे. एकच गोष्ट सांगतो, खानदेशातील त्या वेळेच्या प्रत्येक गावाच्या नावाची व्युत्पत्ती वि. का. राजवाडे यांनी शोधून काढली. तसा कोषही तयार केला. ती व्युत्पत्ती बरोबर आहे का चूक आहे, हे कुणीही सुचवले नाही.

    इ.स.१९१२-१३पासून ते भा.वा.भट यांच्याकडेच मुक्काम करत असत. भा. वा. भट त्यांचा खूप आदर करत. पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाशी असलेला त्यांचा संबंध जवळपास पूर्णत: तुटला होता. मग त्यांना व्यक्तिश: सांभाळणे व त्यांचे सर्व लेखन प्रकाशित करणे हे महत्कार्य तात्यासाहेब भटांनी केले.

    राजवाड्यांच्या स्वभावात विक्षिप्तताही तेवढीच मोठी होती. अशा व्यक्तींच्या लहरी, राग-लोभ आणि आकांक्षा सांभाळणे भयंकर कठीण कार्य असते. पण तात्यासाहेब भट यांनी तो सर्व विक्षिप्तपणा तर सहन केलाच पण कधी कुणाकडेही तक्रार केली नाही किंवा राजवाडे यांना टाकलेही नाही. तात्यासाहेब व राजवाडे यांच्या वयात जवळपास १०-१२ वर्षांचे तरी अंतर असावे. राजवाडे यांनी कुणालाही गुरू मानले नाही, पण तात्यासाहेब व राजवाडे यांच्यामध्ये एक नाते होते व ते गुरु-शिष्याचेच होते. ‘इतिहास व ऐतिहासिक’ या मासिकाचा प्रारंभ १८३८मध्ये झाला. त्याचे प्रत्येक संपादकीय स्वत:चे नाव न देता वि. का. राजवाडे लिहीत. त्यांच्या मृत्युनंतर ‘राजवाडे संशोधन मंडळा’ची स्थापना झाली. ते असेतोपर्यंत त्यांचे सारे महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित झाले होते. राजवाडे यांनी सर्व देशांत प्रवास तर केलाच पण बैतुल व मुलताई प्रदेशांतही जाऊन आले. त्यांची साधी निव्यर्सनी राहणी, खाण्यापिण्यात नियमित असण्याचा त्यांचा कटाक्ष, त्यांची नि:स्पृह आणि व्यासंगी वृत्ती, मूलग्रही पांडित्य, व्यापक आणि कुशाग्र बुद्धी व जळजळीत देशभक्ती हे गुण अंगी बाणण्यासारखे आहेत.

     राजवाड्याच्या अंत:करणात तीव्र देशाभिमान होता. परकीय सत्तेचा व ती चालवणार्‍या लोकांचा तीव्र द्वेष करणारा त्यांच्यासारखा दुसरा कोणी आढळणे दुर्घट होते. राजवाड्यांना इष्ट व प्रिय वाटणारी गोष्ट साक्षात घडवून आणण्याकरता देशात एक संस्था स्थापन केली गेली असूनही त्यात राजवाडे सहभागी झाले नाहीत, अगर त्या संस्थेने चालवलेल्या हालचालींत बिलकुल भाग घेतला नाही.

     मराठ्यांविषयी गैरसमज पसरवणार्‍या ग्रँट डफ व किंकेड यांच्या लिखाणाला मराठीत उत्तर देऊन त्यांनी प्रतिकार केला, पण एखाद्या इंग्लिश मासिकातून सदर मजकूर प्रसिद्ध करण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. आपले लेखन मराठीतच प्रसिद्ध करेन हा त्यांचा अट्टाहास होता. ‘भौतिक शास्त्रांचा अभ्यास आणि विकास हिंदी लोकांनी स्वत: करून पाश्चात्त्य राष्ट्रातील लोकांची बरोबरी केल्याखेरीज हिंदी स्वातंत्र्याचा व स्वराज्याचा प्रश्‍न सुटणार नाही.’ असे त्यांचे मत होते.

     मराठ्यांच्या इतिहास साधनांचे त्यांनी २१ खंड प्रसिद्ध केले व त्यांनी संग्रह केलेले व अप्रसिद्ध कागदपत्रे  यांचे १५० खंड काढता येतील एवढी मोठी साधनसामग्री त्यांनी मिळवली होती. हे काम इतक्या थोड्या वर्षांत करणे हे शक्य नाही.

डॉ. मु. ब. शहा

राजवाडे, विश्वनाथ काशिनाथ