Skip to main content
x

रानडे, रामचंद्र दत्तात्रेय

गुरुदेव रानडे

     रामचंद्र दत्तात्रेय रानडे यांचा जन्म जमखंडी संस्थानात झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. थोरली बहीण भागूअक्का ही पहिली शिक्षिका. रामभाऊंचे प्राथमिक शिक्षण १८९५ मध्ये संपले. ते १९०२ मध्ये जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवून मॅट्रिक झाले. त्यांनी पुणे येथे डेक्कन महाविद्यालयामधून बी.ए.ला डॉ. भाऊ दाजी पारितोषिक मिळवले व त्याच महाविद्यालयात दक्षिणा फेलो म्हणून काम करीत, तत्त्वज्ञान विषय घेऊन दोन सुवर्णपदके मिळवून ते एम.ए. झाले. परीक्षकांनी असा अभिप्राय नोंदवला होता, ‘परीक्षकांपेक्षा हा विद्यार्थी या विषयात अधिक जाणकार आहे.’ पुणे व सांगली येथील महाविद्यालयात त्यांना नोकरी मिळाली होती; पण तेथील हवा त्यांना मानवेना.

     रामभाऊंची अध्यापनाची पद्धत इतरांपेक्षा अगदी वेगळी होती. त्यांनी आपल्या जीवनात प्रा. बेन यांना बौद्धिक गुरू व श्री. भाऊसाहेब उमदीकर यांना आध्यात्मिक गुरू मानले.

     गुरुदेवांची पहिली पत्नी १९१८ मध्ये वारली. मातेच्या आग्रहामुळे त्यांनी दुसरा विवाह केला. तो इस्लामपूरच्या विष्णुपंत वैद्यांच्या मनुताई या कन्येशी झाला. रामभाऊ १९२४ मध्ये निंबाळला गेले. तेथे ते १९२७ पर्यंत होते. त्या काळात त्यांनी ‘कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसफी’ हा ग्रंथ पूर्ण केला. यामुळे त्यांची खूपच कीर्ती झाली.

     पौर्वात्य व पाश्चात्त्य विद्वानांनी त्यांची प्रशंसा केली. अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू सर गंगानाथ झा यांनी हा ग्रंथ वाचून रानडे यांची तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती केली. तिथे त्यांनी तत्त्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून २० वर्षे काम केले. ते वर्गात परतत्त्वशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र इत्यादी विषय आलटून-पालटून शिकवीत. अखेरीस रानडे या विद्यापीठाचे कुलगुरूही झाले. निवृत्त झाल्यावर विद्यापीठाने ‘डी.लिट.’ पदवी देऊन गुरुदेवांचा सत्कार केला.

     निवृत्तीनंतर त्यांनी ‘अध्यात्म विद्या मंदिर’ नावाची संस्था काढली. निंबाळ हे संस्थेचे मुख्य केंद्र व सांगली आणि अलाहाबाद येथे शाखा होत्या. गुरुदेवांच्या घराण्यात भगवद्भक्ती परंपरागत होती. त्यांच्या मातु:श्रींनी श्री भाऊसाहेब उमदीकरांकडून उपदेश घेतला होता. गुरुदेवांना १९१० मध्ये इंचगिरी येथे दोन महिने गुरु सहवास घडला होता. नंतर ते परमार्थात स्थिरावले. त्यांना गुरूंच्या परब्रह्म स्वरूपाचा अनुभव आला. परमार्थाची वाढ गुरुबंधू अंबूराव यांच्या सान्निध्यात झाली. उमदीकर महाराजांनंतर ते अंबूरावांना गुरू मानू लागले. गुरुदेव बुद्धिनिष्ठ संत होते. ही बुद्धिनिष्ठा प्रो. बेन व श्री. भाऊसाहेब महाराज यांच्या सहवासात वाढली, दृढमूल झाली. गुरुदेवांनी बुद्धिनिष्ठ साक्षात्कारवादाचा जन्मभर पुरस्कार केला. आपल्या संप्रदायाला ते ‘स्वरूप संप्रदाय’ म्हणत. प्रवृत्ती आध्यात्मिक असूनही आधिभौतिक शास्त्रांची त्यांनी कधी अवहेलना केली नाही. त्यांच्या तत्त्वज्ञानाला ‘मिस्टिसिझम’ म्हणतात.

    गुरुदेव रानडे म्हणतात, ‘‘साक्षात्कार शास्त्राला ‘गूढविद्या’ म्हणतात; परंतु ती गूढविद्या नाही. ती प्रकट विद्या आहे.’’ मिस्टिसिझम म्हणजे मौन. मुनीची स्थिती म्हणजे मौन, असे आपले शास्त्र सांगते. आपला अनुभव शब्दांनी व्यक्त करता येत नाही. म्हणून मुनी मौन स्वीकारतात. रानडे यांचे तत्त्वज्ञान आत्मप्रत्ययी आहे. नामस्मरण साधन आणि साक्षात्कार हे ध्येय. यालाच गुरुदेव ईश्वरप्राप्तीचा मार्ग असे म्हणतात व नामस्मरणाला ‘नेम’ असे म्हणतात. त्यांनी प्रतिपादन केलेली चतु:सूत्री अशी : प्रपंचाविषयी कमालीची अनासक्ती, देवाबद्दल नम्रता, अंत:करणात भेदभाव न ठेवणे, आणि शुद्ध अंत:करण. गुरुदेवांची मातृभाषा मराठी होती. त्यांचे कन्नडवर आणि इंग्रजीवर असामान्य प्रभुत्व होते. याविषयी श्री. अरविंदबाबूंनी त्यांची वाखाणणी केली होती. बायबलची अनेक भाषांतरे त्यांनी अभ्यासली होती. ग्रीक व संस्कृतचा तौलनिक अभ्यास केला होता. फ्रेंच व जर्मन भाषांशी त्यांचा परिचय होता. स्वत:च्या ग्रंथरचनेपूर्वी त्यांनी अपार परिश्रम घेतले. त्यांची ग्रंथ रचना कसदार आहे. उमदीकर महाराजांच्या आज्ञेवरून त्यांनी ‘नेमावली’ तयार केली.

     तत्त्वज्ञानाच्या ज्ञानकोशाचे १६ खंड तयार करण्याची त्यांची आखणी होती; परंतु आवश्यक ते सहकार्य न मिळाल्याने त्याचे फक्त दोनच खंड प्रसिद्ध झाले. त्यांनी स्थापन केलेल्या ‘अध्यात्म मंदिरा’तर्फे ’Pathway to God’आणि ‘परमार्थ सोपान’ हे ग्रंथ प्रकाशित झाले. १९०१ मध्ये श्री उमदीकर महाराजांकडून अनुग्रह मिळाल्यापासून १९५७ पर्यंत त्यांनी गुरुसेवेचे अखेरपर्यंत व्रत अखंड व एकनिष्ठेने आचरिले. लौकिक व पारमार्थिक जीवनात सद्गुरूंचे पदोपदी मार्गदर्शन लाभावे अशा आशयाचे विचार त्यांनी १९०६ ते १९१३ या काळात लिहिलेल्या सर्व पत्रांत आढळतात. महाराजांशी संबद्ध प्रत्येक वस्तू त्यांना प्रिय होती. नोव्हेंबर १९५५ मध्ये प्रा. सोनोपंत दांडेकरांचे निंबाळ येथे प्रवचन झाले. ते गुरुदेवांना फार आवडले. ‘प्रवचन चालू असताना देवाचे रूप माझ्यासमोर सतत होते,’ असे ते नमूद करतात. गुरुदेवांची ग्रंथसंपदा इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत आहे.

डॉ. नरेंद्र कुंटे

रानडे, रामचंद्र दत्तात्रेय