Skip to main content
x

रानडे, विद्यानंद महादेव

        विद्यानंद महादेव रानडे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फलटण येथे झाला. त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात काम करण्याचा वारसा वडील आणि आजोबा यांच्याकडून लाभला. त्यांचे आजोबा गोविंद रामचंद्र रानडे हे फलटण संस्थानामध्ये अभियंता म्हणून काम करत असताना १९१०च्या सुमारास त्यांनी फलटणच्या जलव्यवस्थेची आखणी केली. लोखंडी पाईपच्या सहाय्याने नैसर्गिकरीत्या विहिरीचे पाणी (पंपाशिवाय) संपूर्ण फलटणला पुरविले गेले. पुढील पन्नास ते साठ वर्षे ही योजना कार्यरत होती.

        रानडे यांचे वडील महादेव रानडे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता होते. नीरा कालव्याच्या सर्वेक्षणाचे तसेच सिंचन व्यवस्थापनाचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. आजोबा आणि वडील यांच्याकडून अभियांत्रिकी सेवेत येण्याची प्रेरणा विद्यानंद रानडे यांना मिळाली. विद्यानंद रानडे यांचे प्राथमिक शिक्षण बारामती आणि अहमदनगर येथे झाले.

          फलटणमधील मुधोजी हायस्कूलमधून ते मॅट्रिक झाले. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून इंटर सायन्सपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर १९६० मध्ये त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामधून स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदवी घेतली. यावेळी ते पुणे विद्यापीठात प्रथम वर्गात दुसरे आले. त्यानंतर काही काळ त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. हे काम करत असतानाच त्यांनी १९६२मध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवेची परीक्षा दिली. या परीक्षेत ते राज्यात पहिले आले आणि प्रथम वर्ग अधिकारी म्हणून महाराष्ट्र अभियांत्रिकी विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली. थोड्याच कालावधीत रानडे यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची जाणीव त्यांच्या वरिष्ठांना झाली. १९६२ ते १९७८ या कालावधीत ते कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. या काळात  एक मोठा प्रकल्प, ९ मध्यम प्रकल्प आणि २० लघु प्रकल्पांचे  सर्वेक्षण, आराखडा, नियोजन बांधकाम या सर्व बाबी त्यांनी पूर्ण केल्या. १९७६ मध्ये त्यांची नियुक्ती भीमा नदीवरील उजनी हे धरण नियोजनापेक्षा एक वर्ष आधी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली. हे काम त्यांनी १९७८ पर्यंत हाताळले. या कालावधीत त्यांनी आपल्या कामामुळे तत्कालीन पाटबंधारे मंत्री शंकरराव चव्हाण यांचा विश्‍वास संपादन केला.

           १९७८ ते १९८१ या कालावधीत त्यांची नियुक्ती वॉटर अ‍ॅण्ड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिस या केंद्राच्या सरकारच्या संस्थेत नवी दिल्ली येथे करण्यात आली. या कार्यकालात त्यांनी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गोवा, ओरिसा, बिहार आणि प. बंगाल राज्यांतील मोठ्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून जलसंधारण प्रकल्पांसाठी अर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक असे प्रकल्प अहवाल तयार केले.

           १९८१ ते १९८२ या काळात रानडे यांच्यावर वॉटर अ‍ॅण्ड पॉवर कन्सल्टन्सी सर्व्हिस, दिल्लीतर्फे या फिलिपिन्समधील मनिला येथे नॅशनल इरिगेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनला तेथील कालवे बांधकामाचा आराखडा तयार करण्यासाठी वरिष्ठ तांत्रिक सल्लागार ही जबाबदारी सोपवण्यात आली.

           १९८३ ते ८८ या कालावधीत रानडे अधिक्षक अभियंता म्हणून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा व वैतरणा धरणांचे जलविद्युतगृहांचे काम केले.

           उपसचिव म्हणून राज्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या नियोजन व संनियंत्रण केले. दरम्यान फेब्रुवारी ते जून १९८८ या काळात युटाह स्टेट युनिव्हर्सिटी फिनिक्स व शिकागो येथे वॉटर रिसोर्सेस सिस्टीम अ‍ॅनेलेसिस या विषयाचे प्रशिक्षण घेताना पाटबंधारे विभागातील १० अभियंत्यांचे नेतृत्त्व केले.

           नोकरीच्या संपूर्ण काळात श्री.प.र.गांधी (सेवा निवृत्त सचिव पाटबंधारे विभाग) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. १९८९मध्ये पदोन्नती मिळाल्यावर मराठवाड्यातील जायकवाडी, मालजगाव, निम्न तेरणा, निम्न दुधना, ऊर्ध्व पैनगंगा या मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीच्या कामाची जबाबदारी पाच वर्षे पार पाडली. त्यानंतर एक वर्ष नागपूर येथून पेंच, गोसीखुर्द या मोठ्या व बऱ्याच मध्यम प्रकल्पांच्या उभारणीचे काम त्यांनी पाहिले. १९९ मध्ये महाराष्ट्र शासनाचे सचिव, लाभक्षेत्र विकास पाटबंधारे विभाग या पदावरून रानडे निवृत्त झाले. नोकरीत असतानाच गुजरातमधील पानम प्रकल्प आणि इंडोनेशियातील एका प्रकल्पावर जागतिक बॅकेचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. भीमा-सीना या नद्यांना जोडणाऱ्या १९ कि. मी. लांबीच्या पाणीपुरवठा कालव्याचा आराखडा तयार  करण्याचे काम त्यांनी केले.

            रानडे यांनी जागतिक बँकेच्या जलव्यवस्थापन प्रकल्पासाठी, तसेच जगभरातील विविध देशांतील जलव्यवस्थापन प्रकल्पासाठी सल्लागार म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. १९८९ ते १९९१ या कालावधीत त्यांनी जागतिक बँकेच्या सहकार्याने चाललेल्या माजलगाव येथील जलप्रकल्पासाठी कालवा बांधणीचा आदर्श आराखडा तयार केला. १९९२मध्ये रानडे यांनी जागतिक बँकेच्या सहकार्याने ब्राझील येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘माजलगाव पाटबंधारे प्रकल्प आणि महाराष्ट्र शासनाची पुनर्वसन योजना’ या विषयावरील शोधनिबंधाचे वाचन केले. जलसंधारण आणि व्यवस्थापन या विषयवरील रानडे सातत्याने लेखन करत असतात. १९९२मध्ये त्यांचे रिझर्वायर्स अ‍ॅण्ड एन्व्हॉर्नमेंट (जलसाठे आणि पर्यावरण) हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित झाले.

              १९९३मध्ये  तिरुअनंतपुरम येथे झालेल्या चौथ्या राष्ट्रीय जल परिषदेत रानडे यांनी जायकवाडी धरण परिसरातील पक्ष्यांची वसतिस्थाने आणि पर्यावरण यांच्या संवर्धनाचा अभ्यास या विषयावरील शोधनिबंधांचे सादरीकरण केले. २०००मध्ये जळगाव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ठिबक आणि तुषार सिंचन परिषदेत रानडे यांनी मोकाट-सिंचन ते ठिबक-सिंचन या बदलामुळे निर्माण झालेली समानता आणि समृद्धी या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण केले.

             नोकरीच्या काळात व विशेषत: सेवानिवृत्तीनंतर पाण्याच्या क्षेत्रात कशाप्रकारे योगदान द्यावे याबाबत जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांना केलेल्या सुयोग्य मार्गदर्शनामुळे रानडे त्यांना सल्लागार आणि गुरू मानतात. त्यांच्यामुळे ग्लोबल वॉटर पार्टनरशिप आणि दक्षिण आशियायी तांत्रिक सल्लागार समिती या संस्थांमध्ये काम करण्याची संधी रानडे यांना मिळाली. डॉ. चितळे यांच्या सल्ल्याने रानडे यांनी अप्पर भीमा नदी पाणलोट क्षेत्राचे व्यवस्थापक म्हणून काम करत असताना ‘व्हीजन फॉर डेव्हलपमेंट ऑफ अप्पर भीमा बेसीन बाय २०२५’ या महत्त्वपूर्ण नियोजन आराखड्याचे लेखन केले. या नियोजन आराखड्याचे सादरीकरण त्यांनी २००२मध्ये काठमांडू येथे झालेल्या पहिल्या दक्षिण आशियायी जल परिषदेमधे केले. अशाप्रकारे एकाच खोऱ्याच्या जलव्यवस्थापनाचा संर्वंकश अभ्यास करून विकासाचे परिप्रेक्ष तयार करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयत्न होता.

               २००३ व २००४मध्ये रानडे यांना स्टॉकहोम स्वीडन येथील ‘वर्ल्ड वॉटर विक’ वॉटर फेस्टीवल आणि २००५ व २००६मध्ये ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथील ‘इंटरनॅशनल रिव्हर फेस्टीव्हल’मध्ये शोध निबंध वाचण्यासाठी व पोस्टर प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित करण्यात आले. २००४ मध्ये मॉस्को रशिया येथे झालेल्या कार्यशाळेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. २००५ मध्ये झेंगझाऊ, चीन येथे दुसऱ्या आंतराष्ट्रीय ‘यलो रिव्हर फोरम मध्ये’ भारताच्या नदीजोड प्रकल्पावरील शोधनिबंधवाचन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.

             ‘रानडे यांनी आजवर पन्नासहून अधिक शोधनिबंधांचे वाचन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये केले आहे. तसेच विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांमध्ये तांत्रिक विषयावर ३५० पेक्षा अधिक भाषणे दिली आहेत. ‘पाणलोट क्षेत्र विकास तंत्र आणि मंत्र’ हे पुस्तक त्यांनी २००४ मध्ये लिहून प्रसिद्ध केले. तर विविध मासिके आणि वर्तमानपत्रांमध्ये पाण्यासंबंधी सुमारे ८० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.

            आजवर सात पाटबंधारे प्रकल्पांसाठी रानडे यांनी लवाद म्हणून काम पाहिले असून एका जलविद्युत प्रकल्पाच्या ‘डिस्प्युट रिसोल्युशन बोर्ड’चा सभासद म्हणून ते गेली आठ वर्षे काम पाहत आहेत. सुमारे ३०० कोटी रु. खर्चाच्या तारळी दगडी धरणाच्या कामावर गुणवत्ता नियंत्रण सल्लागार म्हणून त्यांनी सुमारे सहा वर्षे काम पाहिले. इथोपिया देशाच्या ७०००० हेक्टर सिंचन प्रकल्पाच्या संपूर्ण कालवा वितरण व्यवस्थेची संकल्पचित्रे रानडे यांनी तेथे राहून तयार केली. मार्च२००६ ते नोव्हेंबर२००९ या कालावधीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यातील सिंचन अनुशेष निर्मूलन समितीवर पाटबंधारे तज्ज्ञ म्हणून त्यांनी सहभाग घेतला. गोदावरी खोऱ्यातील पाण्याचे समन्यायी वाटप या विषयावरील समितीचे अध्यक्षापदही त्यांनी भूषवले. या समितीचा अहवाल डिसेंबर २०१०मध्ये शासनाला सादर करण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील जागतिक बँक प्रकल्पांच्या धरण सुरक्षा समितीचे सल्लागार म्हणून ते २००६ पासून काम पाहत आहेत.

- संध्या लिमये

रानडे, विद्यानंद महादेव