Skip to main content
x

रत्नासामी, पॉल

       डॉ. पॉल रत्नासामी यांचा जन्म मद्रास येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ विद्यालय, त्रिची येथे झाले (१९५३-१९५७). १९६२ साली त्यांनी मद्रास येथील लॉयला महाविद्यालयामधून बी.एस्सी. पदवी संपादन केली व तेथूनच १९६४ साली ते एम.एस्सी. झाले. प्रा. येडनमल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मद्रास विद्यापीठातून १९६७ साली पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यानंतर ते न्यूयॉर्क येथील क्लार्कसन तंत्रशास्त्र महाविद्यालयात दोन वर्षे संशोधनाकरिता राहिले. त्यानंतर ते बेल्जियम येथील लिव्हान विद्यापीठात प्रोफेसर फ्रिप्लाट यांच्याबरोबर संशोधन करत होते. त्यांच्या संशोधनाचा (१९६९-१९७२) विषय उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) होता. त्यानंतर त्यांनी १९७२ ते १९७९ या काळात शास्त्रज्ञ म्हणून डेहराडून येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम’ या संशोधन संस्थेमध्ये कार्य सुरू केले. पेट्रोलियम शुद्ध करणार्‍या प्रक्रियेत वापरल्या जाणार्‍या उत्प्रेरकावर संशोधन करून त्यांनी त्या प्रक्रिया सुलभ व सुरक्षित करून आपली कर्तबगारी सिद्ध केली. मध्यंतरी एका वर्षाकरता सीनियर हमबोल्ट फेलो ही मानाची शिष्यवृत्ती मिळवून ते जर्मनीमध्ये म्युनिच विद्यापीठात प्रो.कनोझिगर यांच्याबरोबर संशोधनकार्यात व्यग्र होते.

     त्यानंतर ते पुणे येथील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एन.सी.एल.) येथे नोकरीस आले, त्यांनी या प्रयोगशाळेत उत्प्रेरकावर संशोधन करण्यास प्रारंभ केला. आज या प्रयोगशाळेतील उत्प्रेरक या विषयातील संशोधनकार्यास सर्व जगात मान्यता मिळाली आहे. त्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात डॉ. पॉल रत्नासामी यांचेच.

     झिओलाइट हे निसर्गात सापडणारे खनिज आहे. त्यामध्ये अ‍ॅल्युमिनिअम सिलिकेटबरोबर इतर अल्कली मूल्ये असतात व त्यामुळेच त्याच्यामध्ये इतर मूल्ये शोषून घेण्याची क्षमता असते. अशा प्रकारच्या संयुगाचा उपयोग त्याच्या विशिष्ट रासायनिक गुणधर्मामुळे उत्प्रेरक म्हणून होतो.

     डॉ. पॉल रत्नासामी यांनी प्रयोगशाळेत अशा प्रकारचे झिओलाइट बनविण्यास प्रारंभ केला. या झिओलाइटमध्ये ‘एमजी’ अथवा ‘सीए’सारखी इतर मूल्ये घालून त्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये बदल घडवून त्यांच्या उपयोगात विविधता आणली. त्यांच्या या संशोधनाचा विस्तार खूप मोठा होता. त्यांनी आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये १६० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. त्यांनी एकंदर १२५ एकस्वे दाखल केली असून त्यांतील ३५ एकस्वांना (पेटंट) आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पेट्रोरसायन उद्योगात आघाडीवर असलेल्या अनेक परराष्ट्रीय कंपन्यांचे त्याकडे लक्ष जाऊन त्यांनी हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी विकत घेतले आहे. त्यापोटी प्रयोगशाळेच्या गंगाजळीत परकीय चलनाच्या रूपात लक्षणीय भर पडली आहे. त्यांनी हे संशोधन करीत असताना वीस विद्यार्थ्यांना पीएच.डी. करिता मार्गदर्शन केले. डॉ. पॉल रत्नासामी यांना बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांमधील प्रमुख असे : १९८२ साली ‘वास्विक पुरस्कार’, १९८४ साली ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार’, १९८९ साली ‘के.जी. नाईक सुवर्णपदक’, १९८९ साली ‘बंगर गौरव पुरस्कार’, १९९२ साली ‘ओमप्रकाश भसीन पुरस्कार’, १९९४ साली इंडियन नॅशनल अकॅडमीचे ‘विश्वकर्मा पदक’, २००१ साली ‘पद्मश्री’ इत्यादी. डॉ. माशेलकरांनंतर १९९५ ते २००२ सालापर्यंत ते राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एन.सी.एल.) संचालक होते. २००२ साली या संस्थेच्या संचालक पदावरून ते निवृत्त झाले तरी आजतागायत ते संशोधनकार्यात मग्न असून सध्या ते ‘श्रीनिवास रामानुजन संशोधन प्राध्यापक’ या पदावर काम करीत आहेत (२००४ ते २००९). थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्स, यासह अनेक मान्यवर संस्थांचे ते सभासद आहेत.

डॉ. श्रीराम मनोहर

रत्नासामी, पॉल