Skip to main content
x

साळगावकर, रतन भालचंद्र

वाडकर हंसा

     मराठी चित्रपटसृष्टीतील ज्या नावाजलेल्या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्षावर हिंदी चित्रपटसृष्टीला ‘भूमिका’सारखा चित्रपट रंगवावासा वाटतो, त्या चित्रपटात  नावाजलेल्या अभिनेत्री स्मिता पाटील अभिनय करतात आणि तो चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतो, त्या अभिनेत्री म्हणजे हंसा वाडकर. हंसा वाडकर यांचा जन्म मुंबईत झाला. वडील भालचंद्र साळगावकर आणि आई सरस्वती साळगावकर यांनी त्यांचे नाव रतन असे ठेवले. वयाच्या सहाव्या वर्षी घरच्या अडचडणींमुळे त्यांना आपल्या वडिलांच्या गावी म्हणजे सिंधुदुर्गात जावे लागले. इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण तेथे घेतल्यावर त्या वयाच्या नवव्या वर्षी आपल्या कुटुंबीयांसमवेत पुन्हा मुंबईला आल्या. या वास्तव्यात त्या भागवतबुवांकडे गाणे शिकल्या. मुंबईत आल्यावर पुढील शिक्षणासाठी त्यांना आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दाखल केले. या दरम्यान त्या अजमल हुसेन खाँसाहेब यांच्याकडे गाणे शिकल्या. इंग्रजी दोन इयत्ता झाल्यावर घरच्या परिस्थितीमुळे त्यांची  इच्छा असूनही शिक्षण सोडावे लागले व आपली आत्या इंदिरा यांच्या सांगण्याप्रमाणे चित्रपटात कामे करावी लागली. अभिनयाचे प्राथमिक धडे हंसा वाडकर यांना आपल्या आत्याकडून - इंदिराबाईंकडून मिळाले.

     बापूसाहेब पेंढारकर यांनी ललितकला कंपनीची स्थापना केल्यावर मामा वरेरकरांच्या कथेवर त्यांच्याच दिग्दर्शनाखाली ‘विजयाची लग्ने’ या चित्रपटासाठी नायिका म्हणून रतन साळगावकर यांची निवड केली होती. घरच्यांनी आडनाव लावायला विरोध केल्यामुळे त्यांनी आपल्या आत्याचे ‘वाडकर’ हे नाव लावले. मामा वरेरकरांनी, हसर्‍या चेहर्‍याची म्हणून त्यांचे नाव हंसा असे ठेवले व त्या रतन साळगावकरच्या हंसा वाडकर झाल्या. ‘विजयाची लग्ने’ या चित्रपटातील भूमिका यशस्वीपणे साकारल्यावर हंसा वाडकर यांना नंदू खोटे यांच्या ‘आत्मना’ या चित्रपटात काम मिळाले. परंतु हा चित्रपट अर्धाच राहिला. पुढे त्यांनी गोल्डन ईगल मुव्हिटोनचा ‘एअर मेल’ नावाचा चित्रपट केला.

     वयाच्या १५ व्या वर्षी हंसा वाडकर ६ सप्टेंबर १९३७ रोजी जगन्नाथ बंदरकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. लग्न करून सुखाचा संसार करण्याची त्यांची इच्छा मात्र पूर्ण होऊ शकली नाही. चित्रपटसृष्टीला रामराम ठोकायचा असूनही हंसा वाडकर यांना नवर्‍याच्या आततायी व हव्यासी स्वभावामुळे चित्रपटांमधून काम करावेच लागले. या काळात त्यांना बॉम्बे टॉकीजच्या ‘दुर्गा’ या चित्रपटात भूमिका मिळाली. या चित्रपटातील वेडसर मुलीची भूमिका त्यांनी अत्यंत तन्मयतेने रंगवली. येथेच त्यांनी ‘नवजीवन’, ‘आझाद’ या चित्रपटांमध्ये कामे केल्यावर तीन वर्षांचा उरलेला करार फाडून टाकला व त्या या कंपनीतून बाहेर पडल्या. या करारातून मुक्त झाल्यावर त्यांना प्रभातमधून बोलावणे आले. ‘संत सखू’ या चित्रपटातील सखू ही व्यक्तिरेखा साकारण्याचे काम हंसा वाडकर यांच्यावर सोपवण्यात आले होते. राजाभाऊ नेने यांच्या दिग्दर्शनाखाली हंसाबाईंनी उभी केलेली सात्त्विक, सोज्ज्वळ व सोशिक प्रवृत्तीची सखू त्यांच्या अंगभूत अभिनयगुणांनी उठून दिसली. प्रभातमध्ये केलेल्या या एकाच चित्रपटाच्या करारातून मुक्त झाल्यावर हंसा वाडकर यांनी नॅशनल स्टुडिओच्या ‘अपना पराया’, ‘मेरे गाव’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

     मुलीच्या जन्मानंतर चित्रपटसृष्टीतून निवृत्त होण्याची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीमुळे हंसा वाडकर यांना प्रभातच्या ‘रामशास्त्री’मध्ये काम करावे लागले. गजानन जागीरदार आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित या चित्रपटात त्यांनी एका सर्वसामान्य दासीचे काम केले, तसेच या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदाच नृत्येही सादर केली.

     राजकमलच्या स्थापनेनंतर बाबूराव पेंटर यांनी हंसा वाडकर यांना ‘लोकशाहीर रामजोशी’ या चित्रपटातील बया या तमासगिरिणीच्या भूमिकेसाठी बोलावून घेतले. ‘संत सखू’, ‘रामशास्त्री’ या चित्रपटातील भूमिकांपेक्षा संपूर्णपणे वेगळी असणारी, किंबहुना परस्परविरोधी धाटणीच्या या भूमिकेला नकार दिलेल्या हंसा वाडकर यांना बाबूराव पेंटर यांच्या आग्रहास्तव ही भूमिका स्वीकारावी लागली. आग्रहास्तव स्वीकारलेली ही भूमिकाही हंसाबाईंनी तितक्याच ताकदीने रंगवली. या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्यांनी अनसूयाबाई कवठेकर यांची शिकवणी लावली व लावणी नृत्यातील पदन्यास शिकून घेतले. या परिश्रमांचा त्यांना पुढील काळातील अनेक भूमिका साकारताना उपयोग झाला. त्यांनी रंगवलेली बयेची भूमिका जयराम शिलेदार या नायकासोबत उठावदार झाल्यावर हंसा वाडकर यांच्या नावाचा आधीच असलेला दबदबा अधिक वाढला व त्यांच्या वाट्याला येणार्‍या भूमिकांमध्येही वाढ झाली. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ‘पाटलाचं पोर’, ‘नवरा बायको’, ‘पंढरीचा पाटील’, ‘वंशाचा दिवा’ आदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्यावर त्यांनी नवर्‍याच्या आग्रहाखातर माणिक स्टुडिओशी करार केला आणि त्यांना ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटातील खलप्रवृत्तीची तमासगिरीण, मोगरी साकारण्याची जबाबदारी स्वीकारावी लागली. या चित्रपटानंतर त्यांना ‘पारिजातक’मधील रुक्मिणीची भूमिका मिळाली. एकीकडे तमासगिरिणीच्या, त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजत असतानाच शांत, सोज्ज्वळ स्वभावाच्या रुक्मिणीची भूमिकाही त्यांनी तितक्याच यथार्थपणे, समर्थपणे वठवली. राजा परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली केलेल्या दोन चित्रपटांनंतर पुन्हा एकदा त्यांच्या वाट्याला आली ती ‘नायकिणीचा सज्जा’तील तमासगिरिणीची भूमिका. यानंतर त्या पुन्हा प्रभातशी करारबद्ध झाल्या व ‘संत जनाबाई’ म्हणून पडद्यावर आल्या.

     चित्रपटातील कारकिर्द ऐन भरात असतानाच, तसेच चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा बोलबाला असतानाही त्यांनी नाटकांमध्ये कामे करण्याचे ठरवले आणि ‘लग्नाची बेडी’ (रश्मी), ‘बेबंदशाही’ (येसूबाई) या नाटकांमध्ये कामे केली.

     या काळात त्यांच्या नावावर आणखी एक चित्रपट जमा झाला, तो म्हणजे ‘सांगत्ये ऐका’. पुण्यातील विजयानंद टॉकीजमध्ये १३१ आठवडे चाललेल्या या चित्रपटाने हंसा वाडकर यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. पण त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या त्या ‘धर्मकन्या’ या चित्रपटातील भूमिकेसाठी.

     आपल्या वैयक्तिक आयुष्यात घडणार्‍या चढ-उतारांनी न डगमगता, आपल्या वाट्याला आलेल्या भूमिकांशी एकनिष्ठ राहत, आपल्या कलेचा व त्यामुळे आपल्याला मिळालेल्या लौकिकाचा आब राखत जीवन जगण्याची कसोशी हंसा वाडकर या अभिनेत्रीने सातत्याने आपल्या आयुष्यात केली, असे दिसते. पण ते सातत्य संपले ते कर्करोगाच्या निमित्ताने. त्याआधीच १९७० मध्ये त्यांनी आपले चित्रमय जीवन आपल्या ‘सांगत्ये ऐका’ या आत्मचरित्रात शब्दबद्ध करून ‘आत्मचरित्र’ या साहित्यप्रकारात मोलाची भर घातलेली आहे.

- डॉ. अर्चना कुडतरकर

संदर्भ
१) वाडकर हंसा, 'सांगत्ये ऐका', राजहंस प्रकाशन, पुणे; आ. ९ वी; २००१.
साळगावकर, रतन भालचंद्र