Skip to main content
x

सातवळेकर, श्रीपाद दामोदर

     श्रीपाद सातावळेकर यांचा जन्म कोलगाव, सावंतवाडी येथे झाला. प्रामुख्याने कोलगाव, औंध, हैद्राबाद, पीठापुरम, कांगडी, लाहोर व पारडी या ठिकाणी त्यांचे वास्तव्य व कार्य झाले.

     गाढा संस्कृताभ्यासक, प्रगल्भ वैदिक, प्रेरक साहित्यिक, कृतिशील राष्ट्रभक्त आणि प्रतिभाशाली चित्रकार असे विविध आयाम असलेले गेल्या शतकातील एक शतायुषी व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित श्रीपाद सातवळेकर!

     पंडितजीचे घराणे वैदिकाचे असल्याने वेदाचे आणि व्याकरणशास्त्राचे त्यांचे अध्ययन घरीच झाले. त्यांचे चित्रकलेचे शिक्षण मात्र मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झाले.

     भारतीय संस्कृतीतील अत्यंत मौलिक गोष्टी म्हणजे चार वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता यांच्या निर्दोष, सटीप व सानुवाद आवृत्त्या लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजेत, हे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी उभ्या केलेल्या स्वाध्याय मंडळाने वेदप्रसार आणि वैदिक विचारांचे प्रबोधन या दृष्टीने मोठी मौलिक कामगिरी बजावली. ‘संस्कृत स्वयं शिक्षक’ या मालिकेच्या २४ भागांमुळे संस्कृताचे दालन सर्वसामान्य जिज्ञासूंना खुले झाले. संशोधकाची वृत्ती आणि प्रसारकाची जिद्द अंगी बाळगून त्यांनी जी आजीवन वेदसेवा केली, तिचे फलित म्हणजे पारतंत्र्याच्या काळातील एक पिढी भारतीयांच्या सांस्कृतिक संचिताबद्दल अभिमान आणि आस्था बाळगणारी तयार झाली.

     पंडितजींनी दीर्घकाळ चालविलेली ‘पुरुषार्थ’ (मराठी), ‘वैदिकधर्म’ (हिंदी), ‘वेदसंदेश’ (गुजराती), ‘अमृतलता’ (संस्कृत) ही नियतकालिके तसेच राष्ट्रीय दृष्टिकोनातून केलेले वेदविषयक लेखन, व्याख्यान इ. कार्य हे पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रीय अस्मिता रुजविण्यास, ती परिपुष्ट करण्यास आणि राष्ट्रभक्तीचा स्फुलिंग चेतविण्यास कारणीभूत ठरले. हैद्राबादहून प्रसिद्ध झालेले त्यांचे ‘वैदिक राष्ट्रगीत’ हे पुस्तक जप्त करून सरकारने त्याच्या प्रती जाळून टाकल्या होत्या. १९०८ साली ‘विश्ववृत्ता’त प्रकाशित झालेल्या ‘वैदिक प्रार्थनांची तेजस्विता’ या लेखामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेतही लेखन केले होते. त्यांचे एकूण ४०९ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत.

     राष्ट्रीय शिक्षणाच्या हेतूने पंडितजींनी हैद्राबाद येथे विवेकवर्धिनी शाळा तसेच कन्याशाळा व व्यायाम शाळा सुरू केली. पुढे त्यांनी प्रत्यक्ष ‘राज्यकारणा’त भाग घेतला. सातारा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, अन्याय्य कायदेभंगाचा पुरस्कार करणार्‍या सातारा जिल्हा परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष, जमखिंडीच्या संस्थान प्रजापरिषदेचे अध्यक्ष म्हणून पंडितजींनी संस्मरणीय कामगिरी केली. औंध संस्थानात ग्रामराज्यसंस्थापनेचा आराखडा आखून तो बॅ. अप्पासाहेब पंतांकडून राबविला. पंडितजींचे घर म्हणजे अनेक क्रांतिकारकांचे, भूमिगत कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान असे.

     या सर्वांबरोबरच पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाचा एक चमकदार पैलू म्हणजे चित्रकार सातवळेकर! चित्रकला शिक्षक, औंध संस्थानाचे चित्रकार आणि व्यावसायिक चित्रकार अशा या प्रवासातील त्यांची प्रामुख्याने तैलरंगातील निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे उपलब्ध आहेत. औंध, मद्रास, हैद्राबाद, पीठापुरम, जयपूर, जोधपूर व लाहोर येथील संग्रहालयांत त्यांची चित्रे आहेत. लाहोरात त्या वेळी सातवळेकर स्टूडिओ प्रसिद्ध होता. फोटोग्राफर म्हणूनही त्यांनी मोठा नावलौकिक मिळविला होता. पंडितजींच्या चित्रकलेत वास्तवता, सौंदर्य व रेखीवपणा यांचा उत्कृष्ट मिलाफ आढळतो, असे कलासमीक्षक त्याविषयी गौरवाने म्हणतात.

     पंडितजींचे आचरण म्हणजे साधेपणा, स्वावलंबन शुचिता व सात्त्विकता यांचा मूर्तिमंत परिपाठ होता. पंडितजींच्या या बहुपेडी कार्याचा गौरव राज्यकर्ते, विद्वान आणि सामान्य नागरिक या सर्वांनी हौसेने, कौतुकाने आणि कृतज्ञतेने केला. ब्रह्मर्षी, महामहोपाध्याय इ. पदव्यांनी त्यांना गौरविले. राष्ट्रपतींकडूनही त्यांचा सन्मान झाला. पंडितजींचे प्रकांड पांडित्य, प्रचंड साहित्यसंसार आणि लोकांचा वैचारिक पिंड घडविण्याची क्षमता लक्षात घेता, त्यांच्या चरित्रकाराने त्यांना दिलेली ‘वेदव्यास’ ही उपाधी सार्थ ठरते.

- भाग्यलता पाटसकर

सातवळेकर, श्रीपाद दामोदर