Skip to main content
x

साठे, रवींद्र मोरेश्वर

वींद्र मोरेश्वर साठे यांचा जन्म पुण्यातल्या संगीतप्रेमी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव शकुंतला होते. त्यांचे वडील आकाशवाणीवर निवेदक होते. ते हार्मोनिअमही वाजवत. वयाच्या आठव्या वर्षीच रवींद्र साठे हे सुधीर फडके यांची गाणी सुरेलपणे म्हणत. त्यांनी मुकुंदराव गोखले यांच्याकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. बालपणातच साठ्यांना आकाशवाणीवर गाणे गायची संधी मिळाली.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून रवींद्र साठे यांनी पदवी मिळवली. पुढे त्यांनी ध्वनिमुद्रणाच्या अभ्यासक्रमासाठी पुणे येथील ‘फिल्म इन्स्टिट्यूट’मध्ये ध्वनिमुद्रण विभागात प्रवेश घेतला. तेथून त्यांनी ध्वनिमुद्रण आणि ध्वनियांत्रिकीतील पदवी मिळवली. दरम्यान ‘रोटरॅक्ट’ने आयोजित केलेल्या सुगम संगीत स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी पं. नागेश खळीकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली.
रवींद्र साठे यांनी १९७२ साली विजय तेंडुलकर लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकात नट व गायकाची भूमिका साकारली. सदर भूमिकेसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. ते १९७२ ते १९९२ या काळात पाच आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत सहभागी झाले, तसेच त्यांनी अकरा देशांत दौरे केले. त्यानंतर त्यांना चित्रपटांत गाणी गाण्यासाठी आमंत्रणे मिळाली.
रवींद्र साठे १९७४ साली मुंबई दूरदर्शनवर ध्वनिमुद्रक म्हणून काम करू लागले. त्या वेळेस त्यांनी कुशल ध्वनिमुद्रणतंत्रज्ञ म्हणून नाव कमावले. मुंबई दूरदर्शनवर कार्यरत असताना त्यांना सुहासिनी मुळगावकरांमुळे ‘अमृतमंथन’ या कार्यक्रमात संस्कृत श्लोक गाण्याची संधी मिळाली. डॉ. जब्बार पटेल यांच्या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सामना’ या चित्रपटातील ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या अविस्मरणीय गाण्याने रवींद्र साठे यांचा आवाज घराघरांत पोहोचला. साठ्यांनी १९८१ साली नोकरी सोडली आणि चित्रपटसृष्टीत स्वतंत्रपणे ध्वनिमुद्रक म्हणून ते काम करू लागले. त्यांना १९८१ साली ‘उंबरठा’ या चित्रपटाच्या ध्वनिमुद्रणासाठी सर्वोत्कृष्ट ध्वनिमुद्रकाचा पुरस्कार मिळाला.
गजानन वाटवे यांच्या गाण्यांच्या दोन भागांतल्या ध्वनिफितींचा संच रवींद्र साठे यांच्या आवाजामुळे १९८५ मध्ये लोकप्रिय ठरला. ‘गगनी उगवला सायंतारा’, ‘मोहुनिया तुज संगे’, ‘मी निरांजनातील वात’  या गाण्यांना त्यांच्या आवाजामुळे उजाळा मिळाला. गजानन वाटवे व सुधीर फडके यांना आदर्श मानणार्‍या रवींद्र साठे यांनी आपल्या गायनाने स्वतंत्र ठसा उमटवला. आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘ओंजळीत स्वर तुझेच’ या २००१ सालच्या ध्वनिफितीतील गीतांचे गायनही रवींद्र साठे यांनी केले. ‘जैत रे जैत’, ‘सर्वसाक्षी’, ‘सवत’, ‘आक्रीत’, ‘उंबरठा’, ‘सिंहासन’, ‘अत्याचार’, ‘गारंबीचा बापू’ या काही चित्रपटांमध्ये त्यांनी गायलेली गाणी गाजली.
स्वामी समर्थ, मोरया गोसावी यांच्यावरील भक्तिरचना, अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, भगवद्गीता, रामरक्षा, ‘म्यूझिक टुडे’ची प्रार्थना, तसेच चिन्मयानंद परिवारासाठी त्यांनी केलेले संस्कृत गायन अतिशय लोकप्रिय ठरले. उत्तरा केळकर, रंजना जोगळेकर यांच्याबरोबर रंगमंचीय कार्यक्रमांतही साठ्यांनी गाणी सादर केली.
गजानन वाटवे, मधुकर गोळवलकर, सी. रामचंद्र, दत्ता डावजेकर, स्नेहल भाटकर, राम कदम, श्रीनिवास खळे, यशवंत देव, भास्कर चंदावरकर, हृदयनाथ मंगेशकर, आनंद मोडक, अशोक पत्की, अजय-अतुल अशा जवळपास चार दशकांतील संगीत दिग्दर्शकांसाठी साठ्यांनी गाणी गायली. हिंदी भाषेत हरिप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांनी संगीतबद्ध केलेल्या दहा देवतांच्या दहा ध्वनिफितींना रवींद्र साठे यांनी आवाज दिला. रशिया येथील भारत महोत्सवात पं. रविशंकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘स्वरमिलन’ या दीड तासाच्या कार्यक्रमात रशियन आणि भारतीय कलाकारांची सोबत रवींद्र साठे यांनी केली.
मराठी, हिंदी, गुजराती, ओरिसा, हरियानवी, आसामी अशा विविध भाषांमधील १७५ हून अधिक चित्रपटांसाठी रवींद्र साठे गायले आहेत. भक्तिगीते, श्लोक आणि स्तोत्रे यांच्या २५० हून अधिक ध्वनिफिती त्यांच्या आवाजाने समृद्ध झाल्या आहेत. ‘जैत रे जैत’ (१९७८), ‘पश्चात्ताप’ (१९९१), ‘एक होता विदूषक’ (१९९२), ‘रावसाहेब’ (१९९५),  ‘तू तिथे मी’ या व यांसारख्या एकूण नऊ चित्रपटांच्या पार्श्वगायनासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकाचे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. ‘नर्मदा तारा वेहेता पाणी’ या गुजराती चित्रपटाच्या पार्श्वगायनासाठीही त्यांचा २००३ साली सन्मान करण्यात आला. गायनातील योगदानाबद्दल त्यांना ‘नांदेड स्वामी समर्थ’ पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार, स्वरानंदचा ‘माणिक वर्मा’ पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानाचा ‘चैत्रबन’ तसेच शाहीर साबळे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

 — सुलभा तेरणीकर, अमोल ठाकुरदास

साठे, रवींद्र मोरेश्वर