Skip to main content
x

सावंत, सुरेश

          हाराष्ट्रात जन्मलेले व मराठी मातृभाषा असलेले सुरेश सावंत भारतीय आणि मराठी माध्यमापेक्षाही परदेशातच व्यंगचित्रकार म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत. हंगेरी, जपान आणि अमेरिका येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय कार्टून कॉन्फरन्समध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धांतून त्यांनी विविध पुरस्कार मिळवलेले आहेत. यांमध्ये २००५ साली सन्मान्य आंतरराष्ट्रीय कार्टून स्पर्धेमध्ये ‘युनोच्या येत्या सहस्रकातील विकास योजनांच्या निशाण्या’ या विषयावरील व्यंगचित्रांच्या स्पर्धेत त्यांना मिळालेल्या प्रथम पारितोषिकाचा मुद्दाम उल्लेख करावा लागेल. त्यांच्या या व्यंगचित्राने सर्वांची निरपवाद वाहवा तर मिळवलीच; पण जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामधील पाठ्यपुस्तकांमधून ते मुद्रित करण्यात आले.

          अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सुरेश सावंतांचा जन्म कोकणात (सिंधुदुर्ग येथे) झालेला असला तरी त्यांचे बालपण व पुढचे आयुष्य पूर्णपणे मुंबईत गेले. त्यांना उपजतच चित्रकलेची आवड होती. त्यांना बालपणापासूनच वर्तमानपत्रे, नियतकालिके वाचण्याचा आणि विशेषत: त्यांमधली व्यंगचित्रे पाहण्याचा नाद होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या चित्रांनी तेव्हापासूनच त्यांना भाळून टाकले होते. ठाकर्‍यांची फ्री प्रेस जर्नलमध्ये येणारी, ‘नवयुग’, ‘आवाज’ आदी दिवाळी अंकांतून येणारी आणि नंतर त्यांच्याच ‘मार्मिक’ या साप्ताहिकातली व्यंगचित्रे यांनी मोहित होऊन, ती निरखून पाहण्यातून त्यांचे व्यंगचित्रकलेचे शिक्षण होत गेले. हे सारे ते महाविद्यालयामध्ये बी.ए.च्या वर्गात असताना घडत होते; पण जन्मजात असलेल्या व्यंगचित्रकलेच्या ओढीने ते व्यंगचित्रकार बनले. त्यांच्या एका मित्राने खुद्द ठाकरे यांची त्यांच्याशी ओळख करून दिली आणि सावंतांचे पहिले व्यंगचित्र १९६१ च्या जुलै महिन्यात ‘मार्मिक’मध्ये छापून आले. सावंत यांनी योग्य वेळी बी.ए. पदवी प्राप्त करून घेतली तरी पुढील सर्व आयुष्यभर व्यंगचित्रकाराचा पेशा अंगीकारला आणि त्यामध्ये उत्तम यश संपादन केले. या सर्व यशप्राप्तीनंतर आजही त्यांचे बाळासाहेब हे सर्वांत आवडते आणि आदरणीय व्यंगचित्रकार आहेत.

          त्यांनी प्रथम नोकरी केली ती ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये. तिथे लक्ष्मण, मारिओ मिरांडा या नामवंत व्यंगचित्रकारांना भेटण्याची, त्यांच्या सहवासात राहण्याची त्यांना संधी मिळाली. त्या बरोबरीने, अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व्यंगचित्रकारांच्या कामाशी आणि खुद्द त्यांच्याशी परिचय होण्याचा त्यांना लाभ झाला. हा सावंतांच्या दृष्टीने फार मोठा लाभ होता. त्यातून त्यांना खूप शिकायला मिळाले.

          सुरेश सावंतांनी ‘टाइम्स’मध्ये २४ वर्षे काम केले. या प्रदीर्घ अवधीत त्यांनी राजकीय, अर्थशास्त्रीय, सामाजिक विषयांवरची व्यंगचित्रे काढली ती सुटी, तशीच चित्रमालेच्या रूपाने. ही अनेक प्रकारची चित्रे ‘इकॉनॉमिक टाइम्स’, ‘इव्हनिंग न्यूज’, ‘फिल्मफेअर’, ‘धर्मयुग’, ‘इलस्ट्रेटेड वीकली’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ या सर्व टाइम्सच्या प्रकाशनांतून प्रसिद्ध झाली. एवढ्या विपुल निर्मितीबरोबरीने त्यांनी ‘SHRESH’ या सहीने ‘ब्लिट्झ’मध्येही व्यंगचित्रे काढली. यामुळे ते अनेक संपादक, वृत्तपत्रकार यांच्या संपर्कात आले. या सर्वांचे सावंतांच्या व्यंगचित्रनिर्मितीला मोठे साहाय्य झाले, हे तर खरेच; पण ‘इकॉनॉमिक टाइम्स’चे त्या वेळचे संपादक डॉ. हॅनन इझिकल या आपल्या विषयातील थोर जाणकार, ज्ञानी असूनदेखील विनयशील, भिडस्त असलेल्या गृहस्थांशी होणार्‍या संवादांमधून आपले व्यंगचित्रकार म्हणून व्यक्तिमत्त्व घडवायला जी मोठी मदत झाली तिची सावंत आजही कृतज्ञतेने आठवण काढतात.

          सावंतांनी १९८९ मध्ये ‘टाइम्स’मधील नोकरी सोडून स्वतंत्र व्यवसाय थाटला आणि रीडर्स डायजेस्ट, फ्री प्रेस जर्नल इ.साठी ते काम करू लागले. यांमध्ये जर्मनीमधून प्रकाशित होणार्‍या ‘थर्ड वर्ल्ड डेव्हलपमेंट’ मासिकासाठी केलेली व्यंगचित्रे होती. त्यांमधून ‘विटी वर्ल्ड’ (Witty World)) या मासिकाची अमेरिकेतून आवृत्ती प्रसिद्ध करण्याची योजना होती. तिचे भारतातील संपादकत्व स्वीकारण्याची  जो झाबो या हंगेरियन अमेरिकन व्यंगचित्रकारांनी सावंतांना विनंती केली. सावंतांनी ती मान्य केली.

          सुरेश सावंत यांची अनेक चित्रे आजमितीला अक्षरश: जगभरच्या म्युझियममध्ये आणि व्यक्तिगत गॅलरीमध्ये झळकत आहेत. अविकसित देशांतील बालकांवरील ‘युनो’च्या विशेष प्रकाशनांत सावंतांच्या चित्रांचा समावेश केला गेलेला आहे.

          दूरदर्शनवरील ‘भारतातील विख्यात व्यंगचित्रकार’ या वीस मिनिटांच्या मालिकेत सुरेश सावंतांवर एक एपिसोड बनवला गेला आहे.बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट्स या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत.

- वसंत सरवटे

सावंत, सुरेश