Skip to main content
x

शेकटकर, दत्तात्रेय बालाजी

      त्तात्रेय बालाजी शेकटकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे झाला. जबलपूर विद्यापीठात १९६१मध्ये बी.कॉम.चे शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये (एन.सी.सी.) दाखल झाले. पुढे डेहराडूनच्या भारतीय सैनिकी प्रबोधिनीमधून (आय.एम.ए.) रीतसर शिक्षण घेऊन ते सैन्यात दाखल झाले. भारतीय सैन्यातल्या मराठा रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर ३० जून १९६३ रोजी त्यांची नेमणूक झाली. प्रारंभीचे एक वर्ष त्यांनी बेळगाव येथील मराठा प्रशिक्षण केंद्र आणि मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये व्यतीत केले. सैन्यात कार्यरत झाल्यानंतर वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी ‘वेपन ट्रेनिंग - ७.२ सेल्फ लोडिंग रायफल’ हे शस्त्र चालवण्याबद्दलचे पुस्तक लिहिले.

     शेकटकर यांनी आपल्या सैन्यजीवनातल्या चाळीस वर्षांपैकी विविध पदांवरून, विविध कालावधीतील जवळपास बावीस वर्षे भारताच्या ईशान्य भागात कार्यरत होते.  नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशांत भारताविरोधी काम करणार्‍या बंडखोर तत्त्वांच्या विरुद्ध सैन्याने केलेल्या कारवाईत ते अग्रणी होते. या कामगिरीसाठी त्यांना १९८१ मध्ये ‘विशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. १९७१च्या ऑगस्टपासून भारत - पाक  सीमेवर सांबा येथे ते कार्यरत होते. भारत-पाक युद्ध झाल्यानंतर भारताने जिंकलेल्या युद्धक्षेत्रातच १९७३ पर्यंत त्यांची नियुक्ती होती. घुसखोरांवर कारवाई करणे, सीमारेषेवर नियंत्रण ठेवणे यांसाठी ते कार्यरत होते. पंजाबमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेतही त्याचा सहभाग होता. काश्मीरमधल्या नियंत्रणरेषेच्या संरक्षणार्थ तैनात असलेल्या सहाव्या मराठा बटालियनचे १९८१ ते १९८४ या कालावधीत त्यांनी संचालन केले. काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या विरोधातील अनेक कारवायांमध्ये त्यांनी बटालियनचे नेतृत्व केले. बंडखोरांना व अतिरेक्यांना सामूहिक शरणागती पत्करायला लावण्याच्या तंत्राचा प्रारंभ जनरल ऑफिसर कमांडिंग शेकटकर यांनी सुरू केला. या पद्धतीने जवळपास बाराशे अतिरेक्यांना शरण आणण्यात ते यशस्वी झाले होते. काश्मीरमधल्या बंडखोरांविरुद्धच्या अशा कारवायांमधले त्यांच्या कर्तृत्वासाठी १९९७मध्ये त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. बंडखोरांविरुद्ध लढून कारवाई करण्यात त्यांना दीर्घ अनुभव आहे.

     शेकटकर यांना दहशतवादाविरुद्धच्या युद्धाचे आणि मनोवैज्ञानिक तज्ज्ञ मानले जाते. या युद्धपद्धती संदर्भात लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांचे व लेखांचे ते लेखक अथवा सहलेखक आहेत.

     लेफ्टनंट जनरल पदावर असताना चौथ्या कॉर्पसचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून फेब्रुवारी १९९९ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्या वेळी ईशान्य भारतातल्या आसाम आणि अन्य भागांतील उल्फा अतिरेकी, देशद्रोही बंडखोरांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. भारताच्या ईशान्य भागातील अन्य देशांसोबतच्या सीमारेषांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्यही त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.

     ४ एप्रिल २००० रोजी आसाममधील शिवसागर येथे एकाच वेळी सर्वाधिक पाचशे छत्तीस बंडखोरांनी आपली हत्यारे व दारूगोळ्यासह शरणागती पत्करली होती. आसाममधल्या या सैनिकी कारवाईचे प्रमुखपद त्यांनी सांभाळले. त्यांनी देशद्रोह्यांविरुद्ध केलेल्या एकूण कार्यवाहीसाठी त्यांना २००२मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.

     भारतीय सैन्याचे सैनिकी कार्यवाही विभागाचे अतिरिक्त महासंचालकपद  (अ‍ॅडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) त्यांनी १९९४-१९९५ या कालावधीत सांभाळले. त्यानंतर १९९७-१९९८ मध्ये ‘संरक्षण क्षेत्राच्या भविष्यकालीन व्यवस्थापन विभागा’च्या अतिरिक्त महासंचालकपदीही (अ‍ॅडिशनल डायरेक्टर  जनरल ऑफ पर्स्पेक्टिव्ह प्लॅनिंग) त्यांनी काम केले.

     परराष्ट्रांसोबत होणार्‍या शांतता करारांसंदर्भातल्या कार्यवाहीतही शेकटकर यांचा सहभाग होता. पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कारकिर्दीपासून या संदर्भात भारत-चीनमध्ये शांतता कराराचे प्रयत्न सुरू झाले. त्यासंदर्भातल्या कार्यवाहीतही शेकटकर सहभागी होेते. नरसिंह राव पंतप्रधान असताना झालेल्या भारत-चीन करारासाठी नेमलेल्या संयुक्त समितीत सैनिकी मुख्यालयाचे प्रतिनिधी या नात्याने ते कार्यरत होते. या शांतता कराराची अंमलबजावणी करण्यासंदर्भात नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे ते सदस्य होते. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य समितीचेही ते सदस्य होते.

     १९६७मध्ये त्यांनी मिझोराम येथे संरक्षणविषयक महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अन्य ठिकाणीही संरक्षणविषयक शिक्षण देण्याचे काम केले. १९७६मध्ये वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेसच्या स्टाफ कॉलेजमधून त्यांनी संरक्षणशास्त्रातील पदवी घेतली. पुढे १९८६मध्ये सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट मधूनही त्यांनी शिक्षण घेतले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी १९९०मध्ये डिफेन्स स्टडीजमध्ये एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. १९९२ मध्ये त्यांनी स्टॅ्रटेजिक स्टडीजमध्ये एम.ए. पदवी संपादन केली. पर्यावरण तसेच शस्त्रास्त्र व्यवस्थापन या विषयांंतही पदविका मिळविल्या आहेत. २००० मध्ये महू येथील इन्फन्ट्री स्कूलचे ते प्रमुख होते.

     सैनिकी खात्यातून निवृत्त झाल्यावर २००४ ते २००६ या कालावधीत पुणे विद्यापीठातल्या (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज) संरक्षण व कूटनैतिक अभ्यास विभागाचे ते प्रमुख प्राध्यापक होेते. २००९मध्ये व्यवस्थापन विज्ञानात त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. आजही लेफ्ट. जन. शेकटकर देशभरात सातत्याने संरक्षणविषयक जनजागृती करून एका अर्थाने अव्याहत देशसेवा करीत आहेत.

- पल्लवी गाडगीळ

शेकटकर, दत्तात्रेय बालाजी