Skip to main content
x

सगणे, शांताराम कोंडाप्पा

     शांताराम कोंडाप्पा सगणे यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या लहानशा गावी झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पारनेर व अहमदनगर येथे झाले. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात एम.ए.ची पदवी घेतली.

       १९६४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर त्यांची निवड उपजिल्हाधिकारी या पदावर झाली.

        १९६४ ते १९८६ या कालावधीत  शांताराम सगणे  यांनी उपजिल्हाधिकारी, मराठवाड्याचे विशेष विकास अधिकारी, नांदेड नगर परिषद प्रशासक अशा विविध पदांवर काम केले. १९७४ मध्ये त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत  पदोन्नती मिळाली. १९७५ ते १९७८ या कालावधीत शांताराम सगणे यांची नेमणूक नांदेड नगर परिषदेचे प्रशासक या पदावर करण्यात आली. आपल्या या कार्यकालात त्यांनी कर्तव्यदक्षपणे सुयोग्य निर्णय घेऊन नांदेड शहराचा कायापालट केला. त्यांच्या या प्रशासकीय कार्याची सर्वत्र प्रशंसा करण्यात आली.

        १९७८ मध्ये औरंगाबाद विभागाचे उपायुक्त, १९७९ ते १९८४ या काळात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्याच्या नागरी विकास मंत्रालयाचे उपसचिव, जनसंपर्क विभाग संचालक या  विविध पदांवर सगणे यांनी काम केले. १९८४ मध्ये ते इंग्लंडमध्ये झालेल्या ‘ग्रामीण विकास आणि उपयोजन’ या विषयावरील प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते.

        १९८६ मध्ये सगणे यांच्यावर वाहतूक आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या कार्यकालात त्यांनी वाहतूक विभागाचे आधुनिकीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. बँकांमार्फत वाहनांचा कर भरणा करणे, दुचाकी वाहनांकरिता एकमुठी वाहनकर, इलेक्ट्रॉनिक टॅक्सी मीटर, दुचाकी वाहन चालकांसाठी शिरस्त्राण (हेल्मेट) घालणे सक्तीचे करणे, धोकादायक वस्तूंचे वहन करणाऱ्या वाहनांवर बोधचिन्ह लावणे अशा विविध अभिनव उपक्रमांचा अवलंब त्यांनी केला.

          १९८९ ते १९९२ या कालावधीत सगणे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी या पदावर कार्यरत होते.

          जानेवारी १९९२ मध्ये सगणे यांची नेमणूक बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त या पदावर करण्यात आली. या पदावर असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

         नांदेड महानगरपालिकेने १९९७ मध्ये ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधलेल्या जलतरण तलावाला शांताराम सगणे यांचे नाव देऊन त्यांच्या कामाचा गौरव केला. १९९६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने सगणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार’ सुरू केला.

- प्रभाकर करंदीकर

सगणे, शांताराम कोंडाप्पा