Skip to main content
x

शितूत, शांताबाई दामोदर

      चिपळूण मध्येे जन्मलेल्या शांताबाईंचे माहेरचे आडनाव निमकर होते. वडील मामलेदार असल्याने घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती. मराठी सातवी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर १९४० मध्ये दामोदर शितूत यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. पण त्यांचे वास्तव्य माहेरीच होते.

      समाजासाठी, महिलांसाठी आपण काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी १९४२ मध्ये महिला मंडळाची स्थापना केली. महिलांनी आपल्या पायावर उभे राहावे, निर्भीड बनावे यासाठी त्यांचा प्रयत्न असे. त्यासाठी त्या महिलांच्या हिंदी, इंग्रजी विषयाचे वर्ग घ्यायच्या, शिवणकाम, भरतकाम शिकवायच्या. महिलांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांनी लघुउद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. बचत गटाची सुरुवात केली. त्याचबरोबर त्या महिलांना पोहायला घेऊन जात. विविध कार्यक्रमांसाठी सहलीला त्या भारतभर घेऊन जात.

      महिला मंडळातर्फे १९५४ मध्ये शांताबाईंनी बालक मंदिराची सुरुवात स्वतःच्या घरीच केली. मादाम मॉन्टेसरी यांनी मांडलेल्या पूर्व - प्राथमिक शिक्षणासाठी मॉन्टेसरी पद्धतीनुसार सुरू झालेल्या भारतातील पहिल्या आठ बालक मंदिरांपैकी ही एक, ज्याचा उल्लेख भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या आत्मचरित्रात आहे. पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे तीन ते पाच वर्षांच्या मुलांची शाळा, ‘खेळातून शिक्षण’ ही संकल्पना नवीन असल्याने खूप गाजली. सुरुवातीला महिला मंडळाच्या बायकांना घेऊन घरोघर जाऊन शांताबाई मुलांना शाळेत घेऊन यायच्या. पालकांनाही ही संकल्पना आवडल्याने फारसा विरोध होत नसे, उलट आनंदाने लोक मुलांना पाठवायचे. स्वतः कमी शिकलेल्या बायका एकत्र येऊन शाळा चालवायच्या त्याचे कौतुक व्हायचे. सुरुवातीला महिलांनी बिनपगारी काम केले. नंतर १९५५ मध्ये केन्द्रीय सामाजिक कल्याण समितीची मान्यता मिळाल्यानंतर पगारासाठी व मुलांच्या खाऊसाठी पैसे मिळायला लागले.

      शांताबाईंनी लहान मुलांसाठी पुण्यावरून रिक्षा आणली; पण काही लोक त्रास द्यायचे, दगड मारायचे त्यामुळे रिक्षा बंद केली. पण त्याचा फायदा असा झाला की शांताबाईंनी गावाच्या वेगवेगळ्या भागात बालक मंदिराची सुरुवात करण्याचे ठरविले. यातूनच पुढे सहा बालक मंदिराची सुरवात झाली. त्यात मुख्य वस्तीबरोबरच कोलेखाजण येथे, चांभारवस्तीमध्ये, वडारवस्तीमध्ये, महारवस्तीमध्ये अशा बहुजन समाजातील मुलांसाठी सुद्धा बालक मंदिराची सुरुवात केली. त्याकाळी अशा प्रकारे काम करताना शांताबाईंना अनेक विरोध व अडचणींना सामोरे जावे लागले. याचबरोबर रावतळे या खेडेगावात गावातील पहिलीच शाळा सुरू केली. तिथेच त्यांनी २५ वर्षे शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले.

      शांताबाई कामासाठी गावात मोटार लावलेल्या सायकलवर फिरत. तेव्हा काही लोक त्यांना त्रास देत. पण त्यांनी जे व्रत घेतले त्यापासून त्या कधीही डगमगल्या नाहीत. अन्य महिलांसाठी निर्भीडपणाचा आदर्श निर्माण केला. 

      बालक मंदिराची जागा ही शांताबाईंच्या भावाच्या नावाने होती. भावाच्या निधनानंतर भावजयीने जागा विकायला काढल्याने अडचण निर्माण झाली. त्यावेळी १९६० मध्ये शांताबाई आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन मुंबईला गेल्या व भावजयीला समजावून १०,००० रुपयांना जागा विकत घेतली आणि त्या ठिकाणी सरकारी मदत व गावकऱ्यांच्या साहाय्याने दुमजली मोठी इमारत बांधली. त्यात वरच्या मजल्यावर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह व खाली बालक मंदिर सुरू केले.

     आजही त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महिलांच्या निबंध स्पर्धेचे आयोजन त्यांचे शिष्य करतात.

- विवेक वि. कुलकर्णी

शितूत, शांताबाई दामोदर