Skip to main content
x

तांबे, यशवंत श्रीपाद

     मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यशवंत श्रीपाद तांबे यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांचे शिक्षण इंदौर आणि मुंबई येथे झाले. मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएल.बी. झाल्यानंतर त्यांनी १९३०मध्ये नागपूर येथे वकिलीस सुरुवात केली. सुरुवातीस जिल्हा न्यायालयात आणि नंतर १९३६ मध्ये नागपूर उच्च न्यायालय स्थापन झाल्यानंतर त्या न्यायालयात, असा २४ वर्षांचा वकिलीचा अनुभव मिळाल्यानंतर ८ फेब्रुवारी १९५४ रोजी नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्यपुनर्रचना झाल्यानंतर  न्या.तांबे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले.

      मुंबई उच्च न्यायालयातील आपल्या सुमारे दहा वर्षांच्या कारकिर्दीत न्या. तांबे यांनी १९६०, १९६२, १९६३ आणि १९६५ मध्ये कार्यवाहक सरन्यायाधीश म्हणून काम पाहिले. पहिल्या वेळी सरन्यायाधीश चैनानी काही कारणाने अनुपस्थित असल्याने, तर दुसऱ्या व तिसऱ्या वेळी ते कार्यवाहक राज्यपाल म्हणून काम पाहत असल्याने. १९६५मध्ये न्या.तांबे कार्यवाहक सरन्यायाधीश झाले, ते सरन्यायाधीश चैनानी यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे. अखेर ५फेब्रुवारी१९६६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे कायम सरन्यायाधीश म्हणून न्या.तांबे यांची नियुक्ती झाली. ३०जुलै१९६६ रोजी ते आपल्या पदावरून निवृत्त झाले. एक अतिशय सहृदय व मनमिळाऊ तसेच निर्भीड आणि कार्यक्षम न्यायाधीश म्हणून न्या.तांबे यांचा लौकिक होता.

        - शरच्चंद्र पानसे

तांबे, यशवंत श्रीपाद