Skip to main content
x

तळपदे, चंद्रकांत रामराव

     चंद्रकांत रामचंद्र तळपदे यांनी आपल्या ८९ वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात शिक्षण मिळविण्यासाठी वेचलेली सुरुवातीची पंचवीस वर्षे वगळता उर्वरित आयुष्य वेगवेगळ्या माध्यमातून ज्ञानप्रसार करण्यात व्यतीत केले. डॉ. तळपदे यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेतून डॉ. माताप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एम.एस्सी., पी.एच.डी.पर्यंतचे शिक्षण, उच्च श्रेणी मिळवून पूर्ण केले. १९३८ ते १९४१ सालांदरम्यान एल्फिन्स्टन महाविद्यालयात अध्यापन केल्यावर दादाजी धाकजी कंपनीत सल्लागार म्हणून, सौराष्ट्रमधील खारगोडा, राजस्थानमधील सांबारलेक या ठिकाणी काम केले. १९४५ साली अफगाणिस्तानमध्ये सल्लागार म्हणून काम करण्याची संधी त्यांना शासनातर्फे मिळाली. वर्षभराने अफगाणिस्तानहून परत आल्यावर फर्गसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. वसतिगृहाचे रेक्टर, केमिस्ट्री असोसिएशन, आर्ट सोसायटी या संस्थांचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे ते जातीने लक्ष पुरवीत असत. महाविद्यालयातील खेळांच्या सामन्यांच्यावेळी, विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी ते जातीने मैदानात हजर राहत असत.

     डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील कीर्ती महाविद्यालयाच्या उभारणीत डॉ. तळपदे यांचा फार मोठा वाटा आहे. १९५४ ते १९७५ या कालावधीत ते कीर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य व रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. पंचवीस विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून एम.एस्सी. पदवी प्राप्त केली, तर एका विद्यार्थ्याने पीएच.डी. मिळवली. त्यांचे पंचवीस संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

     विद्यार्थ्यांच्या सहवासात, अध्यापन करीत असताना, रसायनशास्त्राविषयी त्यांचे सतत मनन, चिंतन चालू राहिले. त्यामधूनच प्रेरणा मिळून त्यांनी विज्ञान साहित्याची मराठीत निर्मिती करून अणुशक्ती, मूलतत्त्वे असे विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले.

     ‘अणुशक्ती’, ‘नोबेल पारितोषिकाचे मानकरी’ (रसायनशास्त्र भाग १ ते ५), ‘रसायनशास्त्राचे कारागीर’ (भाग १ ते ८) यांसारख्या त्यांच्या पुस्तकांनी मराठी विज्ञान साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यांना दोन वेळा महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला होता. डेक्कन व्हर्न्याक्यूलर ट्रान्सलेशन सोसायटीने पारितोषिक देऊन त्यांना गौरविले होते.

     विज्ञानकथा हाही प्रकार त्यांनी हाताळला. त्यांच्या विज्ञानकथा ‘नवल’, ‘हंस’ या मासिकांतून प्रसिद्ध  झाल्या. मराठी विज्ञान परिषदेच्या ‘विज्ञान पत्रिके’तून ते सातत्याने लिहीत असत.

     ‘सौराष्ट्रातील पर्जन्यसूक्त’ हा त्यांचा शेवटचा लेख परिषदेने जून १९९८ च्या अंकात छापला होता. मराठी विज्ञान परिषदेच्या मंचावरून त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे दिली. १९७५ साली हैद्राबाद येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनात त्यांचा परिषदेतर्फे सत्कार करण्यात आला होता.

गार्गी लागू

तळपदे, चंद्रकांत रामराव