उत्पात, ज्ञानोबा विठ्ठल
ज्ञानोबा विठ्ठल उत्पात यांचा जन्म पंढरपूरला झाला. त्यांच्या आईचे नाव सत्यभामा होते. विठ्ठलभक्तीसाठी प्रसिद्ध असलेले पंढरपूर हे त्यांचे गाव आणि आध्यात्मिक विचारधारा जपणारे, पंढरपूरच्या विठ्ठलाची सेवा करणारे, भजन आणि कीर्तनाची परंपरा जपणारे असे त्यांचे कुटुंब आहे. प्रसिद्ध कीर्तनकार वा.ना. उत्पात हे ज्ञानोबांचे चुलतबंधू आहेत.
ज्ञानोबांवर लहानपणापासून घरातच कीर्तन, भजन आणि संगीताचे संस्कार झाले. ज्ञानोबा उच्चविद्या विभूषित होते. ते एम.ए.,बी.एड. झाले आणि सोलापूर जिल्ह्यातील मोडलिंब या गावी, माध्यमिक शाळेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. मोडलिंब हे तमाशा आणि संगीतबारीसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. इथल्या कलाकेंद्रात सादर होणार्या लावण्यांनी ज्ञानोबांतील सर्जनशील कलावंताला लेखनाची प्रेरणा दिली. त्यांच्या लोकसंगीत, तमाशा आणि लावणीच्या आवडीने त्यांना लावणी क्षेत्रातील श्रेष्ठ रचनाकार बनविले. उत्पातांनी जवळजवळ चाळीस वर्षे लावणीची सेवा केली. जुन्यातली जुनी लावणी ज्ञानोबांकडे हमखास मिळे. ‘मराठी पारंपरिक लावणी संग्रह’ आणि ‘घुंगूरचाळा’ अशी दोन लावणीची पुस्तके त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत. ‘घुंगूरचाळा’ या पुस्तकात त्यांच्या स्वतःच्या लावण्या आहेत. शेकडो जुन्या आणि नव्या लावण्यांचे पाठांतर आणि त्यांचे मूळ चालींसह गायन हे ज्ञानोबांच्या व्यक्तिमत्त्वाचे खास वैशिष्ट्य होते.
स्वातंत्र्यानंतर तमाशात मोठा बदल झाला. तो अधिकाधिक व्यावसायिक बनला. प्रेक्षकांची अभिरुचीही बदलली. त्यात चित्रपट, नाटकाच्या प्रभावाने नवेनवे बदल होत गेले. लावणीचे सादरीकरण, व्यावसायिक मागणी आणि वाढती लोकप्रियता अशा बदलत्या सांस्कृतिक संक्रमणाच्या काळात ज्ञानोबांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
ज्ञानोबांकडे जुन्या लावण्यांचा खजिना तर होताच; पण त्यांनी स्वतः रचलेल्या लावण्यांची संख्याही थोडी नाही. ‘चला जेजुरीला जाऊ’ ही चित्रपटात गाजलेली त्यांची लावणी प्रसिद्ध आहे. ‘माडीवरती उभी राहिली, वाट पाहिली काल, वाटलं होतं तुम्ही याल’ ही ज्ञानोबांची लावणी तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजली आहे. ज्ञानोबांच्या लावणीत शृंगार होताच; पण त्यातल्या शृंगाराला शालीनता आणि विद्वत्तेची जोड असायची, त्यामुळेच त्यांची लावणी अश्लील न होता प्रासादिक झाली. ‘नुसतं हसून चालायचं नाही, राया मी तुमच्याशी बोलायची नाही’ किंवा ‘तुमच्या आवडीचा शालू नेसले, चोळी किणखापी लाल, तुमच्यासाठी तयार ठेवले नरम गुलाबी गाल’ अशा ज्ञानोबांच्या कितीतरी प्रसिद्ध लावण्या सांगता येतील. ज्ञानोबांनी लावणी वाङ्मयातील सर्व प्रकारांत लेखन केले. चौकाची लावणी, बालेघाटी लावणी, नगरी छक्कड, फटका, स्फुट लावणी असे लावणीचे विविध प्रकार त्यांनी लिहिले आणि सादर केले.
तमाशातल्या कलावंतिणीने शाहिराला लावणी लिहून मागावी व ती बोर्डावर सादर करावी, हा प्रकार शाहीर पठ्ठे बापूराव यांच्यानंतर लुप्त झाला होता; पण ती परंपरा ज्ञानोबा उत्पातांनी जतन केली. आजही महाराष्ट्रातील अनेक तमाशा फडांत, संगीत नाट्यगृहांत, संगीत पार्ट्यांत ज्ञानोबांच्या लावण्या गायल्या जातात. ज्ञानोबांची लावणी जुन्या परंपरेतील आहे व त्यांच्या लावणी रचनेला आधुनिकतेचा स्पर्श आहे. त्यांनी लावणीला दिलेल्या चाली मोहक व आकर्षक आहेत. साहित्य आणि संगीताचा सुरेख संगम त्यांच्या लावणीत पाहायला मिळतो.
शाहीर राम जोशी, होनाजी, सगनभाऊ आणि पठ्ठे बापूराव या पारंपरिक शाहिरांचा प्रभाव ज्ञानोबांच्या लावणीत स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे भाषासौंदर्य, शृंगाराची उधळण आणि प्रासादिकता हे सारेच गुण ज्ञानोबांच्या लावणीरचनेत एकवटल्याचा प्रत्यय येतो. ज्ञानोबा उत्पातांच्या लावणीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लावणीत अभिनयाची भावगर्भता आहे. नृत्यानुकूल लावण्यांची रचना करून त्यांना ज्ञानोबांनी दिलेल्या नादमधुर चाली आजही लावणी रसिकांच्या मनांचा ठाव घेतात.
ज्ञानोबा उत्पातांच्या लोकसंगीतातील या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुणे महानगरपालिकेने त्यांचा ‘पठ्ठे बापूराव’ पुरस्कार देऊन गौरव केला, तर भुसावळ येथील दलित साहित्य अकादमीने त्यांना ‘राम जोशी लावणी जतन’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. कॅलिफोर्निया विद्यापीठाने आपल्या संग्रहालयात त्यांच्या जुन्या लावण्यांच्या ध्वनिफिती ठेवून त्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान केला. त्यांचे वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी पंढरपूर येथे निधन झाले.